Home » चतुरस्त्र : मृणाल काशीकर, सखी, स्तंभलेखक » स्वयंसिद्ध बनण्यासारखं सौंदर्य नाही!

स्वयंसिद्ध बनण्यासारखं सौंदर्य नाही!

 •चतुरस्त्र : मृणाल काशीकर•

व्यक्तिमत्व स्त्रीचं – भाग : १२
MRINAL PERSONALITY ARTICLE12आयुष्यात असं पहिल्यांदा झालं, शंभर सव्वाशे मुलांसमोर बिनधास्त तासंतास बोलणारी मी… आणि मला खरच शब्द फुटेना… ही तर छोटीशी चिमुरडी मुलं, म्हणूनच खूपच आत्मविश्वासाने गेले होते मी… आणि मग त्यांचे माझ्या डोळ्यात डोळे घालून पाहणारे चेहरे पाहिले, आणि चक्क दोन मिनिट ब्लँक झाले मी. खूप धीर गोळा करून एक गोष्ट सांगायला सुरु केली… त्यांच्या हसऱ्या चेहेऱ्यामध्ये मला माझीच चिमुरडी लेक दिसू लागली आणि मी हळू हळू त्यांच्यात आणि त्यांना गोष्ट सांगण्यात रंगून गेले.
प्रसंग फार जुना नाही, अगदी ताजाच आहे. गेल्या वर्षीचा. एका मैत्रिणीने मला आणि माझ्या मैत्रिणीला पुण्याजवळच्या एका अपंग मुलांच्या रहिवासी शाळेत त्या मुलांशी गप्पा-गोष्टी करायला बोलावलं होतं, पाहुणे म्हणून!! मला किती आनंद झाला होता की आपल्याला पाहुणे म्हणून बोलावलं आहे… पण तिथे पोचल्यावर मी किती लहान आहे हे मला पाचच मिनिटात कळून चुकलं. कारण, आपल्या मनामध्ये अपंग मुलं म्हणजे आपल्यापेक्षा कमी असं कितीही नाही म्हटलं तरी एक समज असतो. काही अंशी मनात आपण त्यांची कुठेतरी कीव करतो, की देवानं यांच्याबरोबर असं करायला नको होतं. पण, त्या छोट्या छोट्या वय वर्षे ३-१७ या वयोगटातील मुलांनी माझे कान पिळले… कारण, डोळे उघडले म्हणावं तर डोळे उघडेच होते माझे, आणि डोळे असून आंधळे समज घेवून जगत होते मी! नसलेल्या गोष्टींचं दुःख करत बसायची सवयच झाली होती जणू मला… पण, माझ्या मैत्रिणीचे आभार!, जिने मला पाहुणी म्हणून बोलावलं. मला योग्य दृष्टीकोन मिळाला. एकाहून एक सुंदर हसरे चेहरे भेटले, ज्यांच्या मी आजतागायत प्रेमात आहे.
इतके हसरे चेहरे, लंगडत, किंवा घसरत, पाय ओढत चालणाऱ्या अपंग मुलांना सोप व्हावं म्हणून बांधलेल्या रॅम्प (ramp) वर देखील एकमेकाशी शर्यत लावणारी, पण त्याच बरोबर ज्याला आधाराची गरज पडेल त्याला आपला हात पुढे करणारी मुलं… त्यांना काय मी कोणता इन्स्पिरशनल व्हीडीओ दाखवू? त्यांना खरच गरज आहे का मनोबल वाढवायची? दैनंदिन कामासाठी सुद्धा संघर्ष आहे, पण तरीही या सर्व प्रतिकूल परिस्थितीवर मात करून काही बनण्याची, शिकण्याची, जिद्द आहे. त्यासाठी कुठून आणतात ही मुल-मुली इतका आत्मविश्वास आणि निर्धार!!! खरंच मला आता माझे जे काही किरकोळ प्रॉब्लेम होते तेदेखील खुपच नगण्य वाटू लागले… किंबहुना ते प्रॉब्लेम नव्हतेच… थोडा अजून प्रयत्न केला तर साध्य होतील अशा गोष्टी होत्या.
मैत्रिणींनो, तुम्हाला वाटेल आज मी कोणती गोष्ट सांगते आहे की काय; पण, मागचे काही आठवडे आपण जे या सदरामधून एकमेकींशी शेअर करतो आहे, आत्मविश्वास कसा वाढवावा, स्वतःला कमी समजण्यामुळे त्रास करून घेवू नये, आदी. त्याबद्दलच मला हा प्रसंग आज तुम्हाला सांगावासा वाटला. आपण धडधाकट जन्माला आलो, याबद्दल कधी देवाचे आभार मानताना दिसत नाही, उलट जे आपल्याला कमी आहे त्याच्याबद्दल तक्रार करत असतो… मीच का… मलाच का देवाने गोरा रंग दिला नाही, माझे डोळे मोठेच आहेत, माझी मान जरा लांबच आहे, मला उंची का कमी दिली….आणि खूप काही. ज्यांना जन्मतःच एखादा, किंवा त्याहून जास्त अवयवच नाहीत, त्यांनी तर मग सतत रडतच बसल पाहिजे. पण, ते दृश्य तुम्हाला कधीच दिसणार नाही. त्यांच्या चेहऱ्यावर मागमूसही नाही आयुष्यात काही कमी असण्याचा. दिसेल ते मात्र प्रचंड निरागस, मनमोकळ हसू, आणि प्रेम!!! हां, आहे ती फक्त नॉर्मल तुमच्या आमच्या सारखच जगण्याची धडपड!! ती देखील आपण त्यांना नॉर्मल समजत नाही, तसं जगू देत नाही म्हणून करावी लागणारी धडपड!! आपल्याला हात किंवा पाय नाही म्हणून त्यांना दुःख नसेल का होत? असेलच… पण, ते दुःख कुरवाळत बसत नाहीत. कधी कधी जन्मतः धडधाकट असून देखील पुढे अपघाती व्यंग येत… तरी प्रचंड जिद्दीने पुन्हा आपल्या बळावर उभा राहण्याचा प्रयत्न!, मैत्रिणीनो याला म्हणतात आत्मविश्वास!!!
आपला रंग- रूप, आवाज, भाषा, घरची परिस्थिती, याचा कमीपणा ज्यांना वाटत असेल त्यांना माझी एकच विनंती आहे. एकदा तरी डोळे खरोखरीचे उघडून पहा आजूबाजूला, तुम्हाला अशा अनेक व्यक्ती दिसतील की ज्यांना व्यंगामुळे सर्वसामान्य जीवन जगण्यासाठी पण संघर्ष आहे. आणि आपल्याला संघर्ष नाही तरी आपण रडतो, कुथतो. छोटया-छोट्या गोष्टींमुळे, प्रसंगांमुळे आपला आत्मविश्वास गमावून बसतो. जे मिळाल आहे देवाकडून ते विसरून, जे नाही त्याची खंत करण्यात आयुष्य घालवतो. मैत्रिणींनो, जे आज आपल्याकडे आहे त्याचा विचार जास्त महत्वाचा. सुंदर जास्त फॅशनेबल चप्पल मिळू शकत नाही म्हणून दुःख करत बसण्यापेक्षा देवाने पाय दिलेत याचा विचार करा आणि त्यावर कसा उभ राहता येईल त्याचा विचार करा. स्वयंपूर्ण आणि स्वयंसिद्ध बनण्यासारखं सौंदर्य नाही!! हेच सुंदर हसू अजून देखील माझ्या डोळ्यासमोर ताजं आहे आणि त्या निरागस हास्याबद्दल मला कमालीचा आदर आहे.

 ई-मेल- mrinal.propathconsultants@gmail.com
(लेखिका लीगल आणि HR कन्सल्टंट असून मॅनेजमेण्ट इन्स्टिट्यूटसमध्ये अध्यापन करतात.)

Short URL: https://vrittabharati.in/?p=22421

Posted by on May 5 2015. Filed under चतुरस्त्र : मृणाल काशीकर, सखी, स्तंभलेखक. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in चतुरस्त्र : मृणाल काशीकर, सखी, स्तंभलेखक (73 of 120 articles)


•चौफेर : अमर पुराणिक• कोणतंही सेवा कार्य म्हंटलं की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच नाव सर्वप्रथम पुढे येतं. कोणतीही नैसर्गिक आपत्ती असो ...

×