|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 06:05 | सूर्यास्त : 18:43
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 28.74° C

कमाल तापमान : 29.57° C

तापमान विवरण : clear sky

आद्रता : 69 %

वायू वेग : 3.45 Mps

स्थळ : Mumbai, IN

29.57° C

Weather Forecast for
Thursday, 25 Apr

28.05°C - 31°C

sky is clear
Weather Forecast for
Friday, 26 Apr

28.2°C - 30.91°C

few clouds
Weather Forecast for
Saturday, 27 Apr

27.87°C - 30.83°C

sky is clear
Weather Forecast for
Sunday, 28 Apr

28.13°C - 31.48°C

few clouds
Weather Forecast for
Monday, 29 Apr

28.77°C - 33.14°C

sky is clear
Weather Forecast for
Tuesday, 30 Apr

29.13°C - 32.78°C

sky is clear
Home » युवा भारती » जनसंपर्क : नवे क्षितिज!

जनसंपर्क : नवे क्षितिज!

‘मीडिया’- सध्या तरुणांच्या सर्वाधिक आकर्षणाचा विषय. प्रसारमाध्यमातील दिसणारे ग्लॅमरस जग आणि एकाच वेळेस कोट्यावधी लोकांशी प्रत्यक्ष संवाद साधण्याची ताकद यामुळे महत्त्वाकांक्षी आणि सळसळत्या रक्ताच्या तरुणाईला अशा मीडियाचे आकर्षण वाटणे, हे अगदी साहजिकच आहे. पण, या सो कॉल्ड ‘मीडिया’ शब्दामागील आपले आकर्षण हे प्रिंट व इलेक्ट्रॉनिक माध्यमांपुरतेच मर्यादित असते.प्रत्यक्षात २१ व्या शतकातील प्रसारमाध्यमांचं जग आणि त्याची व्याप्ती ही कल्पनातीत आहे.दृक्‌श्राव्य माध्यमे ही आपल्या परिचयाची असली, तरी यापेक्षा वेगळ्या, पडद्यामागे काम करणार्‍या माध्यमांच्या दुनियेशी आपला क्वचितच संपर्क येतो.अशा पडद्यामागच्या माध्यमविश्‍वाचे नाव म्हणजे जनसंपर्क! माध्यमांच्या जगतात करीअर करू इच्छिणार्‍या युवकांसाठी हे क्षेत्र व्यापक संधी घेऊन वाट बघत आहे.
व्यावसायिक जनसंपर्काचा उगम
ढोबळमानाने जनसंपर्काची व्याख्या ही लोकांशी जवळीक निर्माण करण्यासाठी सुयोग्य संवाद साधण्याची कला,या अर्थाने प्राचीन काळापासून वापरण्यात येते.भारतात जनसंपर्काचे जनक नारद मुनी यांना मानले जाते. प्राचीन भारतीय मान्यतेनुसार सर्व शास्त्रांचे ज्ञाते आणि देव, दानव व मानव या सगळ्यांमध्ये सुसंवाद निर्माण करणारे, विविध समाचार समाजहिताच्या उद्देशातून जनसामान्यांत पोहोचविणारे महर्षी नारद यांनी निर्माण केेलेली जनसंपर्क ही कला असे म्हणता येईल. जगभरात अगदी भाषा आणि लिपीचा उगम झाला त्या काळापासून जनसंपर्काचा वापर प्रभावी संवादयंत्रणांच्या माध्यमातून करण्यात येत आहे. सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात जनसंपर्काचा वापर समाज उपयोगाचे उत्तम माध्यम या उद्देशातून करण्यात आल्याचे लक्षात येते. अगदी भारतीय स्वातंत्रलढ्यात म. गांधींनी जनसंपर्काच्या माध्यमातून आंदोलने,सत्याग्रह या लोकचळवळीचा उपयोग करून सर्वव्यापक स्वातंत्र्यलढा उभा केला. विलायती कपड्यांना ‘स्टेटस् सिंबल’ समजून ज्या काळात लोकांनी खादीला नाकारणे सुरू केले त्याच खादीला लोकांच्या मनात रुजवून आज जगातील लोकप्रिय ब्रॅण्ड म्हणून मान्यताप्राप्त करून दिली.म.गांधींच्या या योजनाबद्ध जनसंपर्क यंत्रणेच्या माध्यमाने काय किमया झाली,ही आपल्याला परिचयाची आहे. पुढे सुभाषचंद्र बोस, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, डॉ. हेडगेवार यांनी ठरावीक सामाजिक व राष्ट्रीय उद्देशातून जनसंपर्काचा कौशल्यपूर्ण वापर केला. पण, स्वातंत्र्योत्तर काळात जनसंपर्काला एक कला म्हणून मान्यता मिळाली आणि जागतिक स्तरावर विविध उद्योजकांनी,राजकीय व्यक्तींनी व्यावसायिक दृष्टीने जनसंपर्काचा उपयोग व्यापक प्रमाणात प्रत्येक क्षेत्रात केला.‘‘आपले मत लोकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी आणि आपल्या मताला प्रतिष्ठा आणि लोकमत प्राप्त करून देण्यासाठीची गरज यातूनच जनसंपर्काची निर्मिती झाली.’’ अमेरिकेसारख्या देशात १८ व्या शतकात झालेल्या औद्योगिक बदलानंतर अमेरिकन कोळसा व्यापारी आणि मजदूर युनियन यांच्यातील वाद सलोख्याने मिटविण्यासाठी न्यूयॉर्क टाईम्सचे वार्ताहर आय व्ही ली यांनी पुढाकार घेतला आणि पुढे या कार्याला ‘जनसंपर्क’ नावाने समाजात मान्यता मिळवून दिली.लोकांच्या मनावर आणि मतावर प्रभाव पाडून आपल्या कार्याला जनसमर्थन मिळावे, यासाठी करण्यात येणारे प्रयत्न आणि त्यातून तयार झालेली विविध प्रभावी प्रसिद्धिमाध्यमे व संवादयंत्रणा हा जनसंपर्काच्या विकासाचा पायंडा ठरला आहे. आज २१ व्या शतकात जनसंपर्क ही एक शास्त्रशुद्ध कला म्हणून प्रसिद्ध झाली आहे. जनसंपर्काला कला मानण्यात आले. कारण समाजात विविध प्रकारचे कार्य करणार्‍या संस्था, कॉर्पोरेट कंपन्या, अथवा प्रत्यक्ष व्यक्ती म्हणून कार्य करणारे प्रतिष्ठित महानुभाव या सर्वांना त्यांचे कार्य लोकांपर्यंत सकारात्मकरीत्या पोहोचविणे गरजेचे झाले. आपल्याला अपेक्षित असलेले लोकमत निर्माण करण्यासाठी प्रभावी जनसंपर्काची आवश्यकता भासली. हे सर्व कार्य जनसंपर्कातील तज्ज्ञ मंडळी आज प्रभावीपणे करीत आहे. यासाठी लागणारे कौशल्य, लोकांच्या मनाचा, भावनांचा अभ्यास, लक्ष्यीत जनतेच्या मतावर आणि मनावर प्रभाव निर्माण करण्याची कला,हा शास्त्रशुद्ध कलेचाच भाग आहे. यातूनच समाजात अपेक्षित प्रतिमानिर्माण अर्थात इमेज बिल्डिंग करता येते. यामुळे जनसंपर्क शास्त्रशुद्ध कलेचा भाग बनते.
जनसंपर्काचे प्रभावी कार्य
माध्यमांच्या दुनियेत प्रत्येक व्यक्ती रममाण होतेे. या माध्यमात दाखविल्या जाणार्‍या जाहिराती, वृत्त, विविध संवादात्मक मालिका या सगळ्यांचा प्रत्यक्ष प्रभाव आपल्या मानसिकतेवर, विचारप्रक्रियेवर पडतो. आज अत्याधुनिक माध्यमांच्या जगतात जनसंपकर्र् हा एक प्रतिष्ठित आणि प्रचलित माध्यम व्यवसाय म्हणून नावारूपास आला आहे. अनेकांना भुरळ पाडणार्‍या देशी-विदेशी बहुराष्ट्रीय कंपन्या,प्रतिष्ठित कलावंत यांना लोकप्रिय करण्यामागे जनसंपर्क यंत्रणा कार्य करते. जाहिराती, प्रचार, प्रसारमाध्यमे आणि प्रत्यक्ष लोकसंवाद यातून लोकांच्या मनात भावनिक ओढ निर्माण करण्याची कला या माध्यमातून साकार झाली आहे. जगभरात ‘द टेस्ट ऑफ इंडिया’ या नावाने प्रसिद्ध झालेला अमूल हा ब्रॅण्ड, ‘देश की धडकन धक धक’ म्हणत लोकांच्या हृदयात स्थान मिळविणारी हीरो होंडा, अथवा कोट्यावधी लोकांच्या हृदयाचा ठाव घेणारे अमिताभ, शाहरूख, सलमान आणि जगभरातील अशी हजारो प्रतिष्ठाने व लक्षावधी लोक आज जनसंपर्काच्या माध्यमातून आपला ब्रॅण्ड अथवा प्रतिमा निर्माण करण्यात यशस्वी झाले आहेत.
अनेकदा आपल्याविषयी होणारे लोकांचे गैरसमज, अपप्रचार या सगळ्यांचा सतत भडिमार आजच्या स्पर्धात्मक युगात होत असतो. मात्र, यातून लोकांपर्यंत सत्य पोहोचविणे आणि आपली प्रतिष्ठा कायम ठेवणे यासाठी सातत्याने जनसंपर्क कार्य करते. या यंत्रणेच्या याच कौशल्यामुळे याची गरज प्रभावी पत्रकारितेचे माध्यम म्हणून वाढते आहे.
जनसंपर्क क्षेत्रातील संधी
भारतात आजघडीला जनसंपर्क क्षेत्रात १.५ लक्षांपेक्षा जास्त व्यक्ती काम करीत आहेत, तर अमेरिकेसारख्या देशात हीच संख्या दोन लक्ष आहे. जगातील जवळजवळ सर्वच मोठ्या बहुराष्ट्रीय कंपन्या भारतात आपले स्थान निर्माण करण्यासाठी धडपडत आहेत.याशिवाय प्रचंड लोकसंख्या आणि त्यात विविध वयोगटातील, विविध भूभागातील लोक यामुळे प्रत्येकाचा लक्ष्यीत ग्राहक हा त्या त्या ब्रॅण्डच्या गरजेनुसार वेगवेगळा आहे. अशा परिस्थितीत प्रभावी जनसंपर्क हे एकमात्र माध्यम अचूकपणे लोकांपर्यंत पोहोचते. शिवाय या माध्यमातून निर्माण होणारी विश्‍वासार्हता आणि भावनिक स्थान त्या ब्रॅण्डला फार खोलवर लोकांच्या मनात रुजविते. याचे उत्तम उदाहरण म्हणजे कोलगेट! या ब्रॅण्डचा प्रभाव हा लोकांच्या मनात इतका रुजला आहे की, आपण नकळतच दुकानात मंजनऐवजी ‘कोलगेट’ द्या, अशी मागणी करायला लागलो. याच प्रकारे लोकांच्या मनात स्थान प्राप्त करण्याच्या या स्पर्धेत प्रत्येकाला प्रभावी जनसंपर्क आणि त्यासाठी जनसंपर्क क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींची गरज मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. मात्र, जनसंवाद अथवा पत्रकारिता या विषयात पदवीप्राप्त विद्यार्थ्यांचा कल हा प्रिंट व इलेक्ट्रॉनिक माध्यमांकडे असल्याने जनसंपर्काच्या क्षेत्रात अशा लोकांची सतत कमतरता भासते. आज विविध कंपन्या, संस्था आणि सरकारी यंत्रणेत सातत्याने जनसंपर्क तज्ज्ञ लोकांची मागणी वाढती आहे.देशभरात जनसंपर्काच्या कार्याची वाढती गरज लक्षात घेऊन दोन हजारांवर पी. आर.एजन्सीज अर्थात स्वतंत्र जनसंपर्क व्यावसायिक कोट्यवधींचा व्यवसाय करीत आहेत.
जनसंपर्काच्या क्षेत्रात आज जनसंपर्क अधिकारी, ब्रॅण्ड व्यवस्थापक, जनसंपर्क प्रतिनिधी,माध्यम प्रतिनिधी अशा विविध पदांसाठी सतत मागणी असते.विशेष म्हणजे पत्रकारितेत काम करणारी अनुभवी व्यक्ती जनसंपर्काच्या क्षेत्रात आपल्या अनुभवाच्या व प्रतिष्ठित लोकांशी निर्माण झालेल्या मैत्रीपूर्ण संबंधांमुळे या क्षेत्रात आज काम करताना दिसतात; तसेच जनसंपर्कात काम करण्याचा अनुभव असलेली व्यक्ती पुढे पत्रकारितेत उत्तम करीअर करताना दिसते. यामुळेच जनसंवादाची ही दोन्ही माध्यमे एकमेकांना पूरक आहेत.कल्पकता,आव्हान स्वीकारण्याची वृत्ती आणि उत्तम संवादकौशल्य असलेल्या युवकांना जनसंपर्क हे क्षेत्र एक उत्तम करीअर म्हणून निवडता येईल. पत्रकारिता करण्यासाठी उत्सुक युवकांनी आता जनसंपर्कासारख्या नावीन्यपूर्ण क्षेत्रात करीअर करण्याचा नक्कीच विचार करायला पाहिजे.
विकास मार्कंडेय

Posted by : | on : 7 Jan 2013
Filed under : युवा भारती
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g