Home » अमेरिका, आंतरराष्ट्रीय » दहशवादाला थारा देऊ नका, अन्यथा परिणाम भोगा

दहशवादाला थारा देऊ नका, अन्यथा परिणाम भोगा

– ट्रम्प यांचा पाकला गर्भित इशारा
– अफगाणात शांततेसाठी भारताची भूमिका महत्त्वपूर्ण,
वॉशिग्टन, २२ ऑगस्ट –
दहशतवाद्यांना थारा देऊन त्यांच्यासाठी सुरक्षित स्वर्ग बनू देऊ नका, अन्यथा तुम्हाला परिणाम भोगावे लागतील आणि ते परिणाम निश्‍चितच थोडेथोडके नसतील, अशा कडक शब्दात अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला गर्भित इशारा दिला आहे. सोबतच अफगाणिस्तानात शांतता प्रस्थापित करण्यासाठी भारताची भूमिका महत्वपूर्ण असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले.
अशा प्रकारे अमेरिकेने पाकिस्तानवर दहशतवादाच्या मुद्यावरून पुन्हा एकदा आसूड ओढला आहे. भारतासोबत असलेले मैत्रीचे संबंध ट्रम्प यांनी पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे. त्यामुळे पाकिस्तान आणि चीनच्या अडचणी वाढल्या आहेत. त्यांनी सोमवारी फोर्ट मायर येथे अमेरिकन सैनिकांशी संवाद साधला. या कार्यक्रमात बोलताना दहशतवाद्यांना थारा देणार्‍या पाकिस्तानचा ट्रम्प यांनी चांगलाच समाचार घेतला.
ते म्हणाले की, पाकिस्तान म्हणजे दहशतवाद्यांसाठी स्वर्ग आहे. पाकिस्तानने नेहमीच दहशतवादाला पाठीशी घातले आहे. अमेरिकेने घोषित केलेल्या २० दहशतवादी संघटना पाकिस्तान आणि अफगाणिस्थानमध्ये सक्रिय आहेत. पाकिस्तानात दहशतवादी कारवाया अशाच सुरू राहिल्या तर अमेरिका यापुढे शांत बसणार नाही आणि याचे परिणाम पाकिस्तानला भोगावे लागतील, असा दम ट्रम्प यांनी पाकिस्तानला दिला. याशिवाय भारताशी असलेले संबंधही अधिक घट्ट करण्याचे संकेत ट्रम्प यांनी दिले. भारताने अफगाणिस्तानमध्ये अमेरिकेला मदत करायला हवी, अशी अपेक्षाही ट्रम्प यांनी व्यक्त केली.
पाकचे लोक स्वत: दहशतवादाने पीडित आहेत. मात्र, दुसरीकडे दहशतवाद्यांसाठी पाक सुरक्षित स्वर्ग बनला आहे. दहशतवादाविरोधात लढण्यासाठी पाकने आपली कटिबद्धता पूर्ण करावी, असे ट्रम्प यांनी पाकला सुनावले. त्यामुळे पाकच्या समस्यांत आता भर पडणार आहे.
ट्रम्प यांनी आज आपली नवे अफगाण धोरण जाहीर केले. यामध्ये भारताबरोबर संबंध अधिक दृढ करण्याबरोबरच अफगाणिस्तानला आणखी मदतीचे आश्‍वासन दिले. भारताबरोबर अमेरिकेचा अब्जावधी डॉलरचा व्यापार आहे. आता भारताने आम्हाला अफगाणिस्तानात मदत करावी, असा आशावाद ट्रम्प यांनी व्यक्त केला.
आमच्या पूर्वीच्या नेत्यांनी इराकमध्ये केलेल्या चुकांची पुनरावृत्ती होणार नाही.
दहशतवादी हे ठग, अपराधी आणि गुन्हेगार आहेत. घाईगडबडीत घेतलेला कोणताही निर्णय अल-कायदा व इसिससारख्या दहशतवादी संघटनांना लाभ मिळवून देऊ शकतो. पाकिस्ताननेही अफगाणिस्तानमध्ये आम्हाला मदत केल्यास त्याचा त्यांना लाभ होऊ शकतो, असे ट्रम्प म्हणाले.
अफगाणिस्तानातून अमेरिकन सैन्य माघारी घेणे घाईचे ठरेल आणि त्यामुळे इसिस आणि अल-कायदा सारख्या दहशवादी गटांना वाव मिळेल, असे सांगत त्यांनी अफगाणिस्तानातून सैन्य माघारी घेण्याच्या शक्यतेला पूर्ण विराम दिला.
गेल्या १६ वर्षांपासून अमेरिकेचे सैन्य अफगाणिस्तानात तळ ठोकून आहे. अमेरिकेच्या प्रत्येक निवडणुकीत अफगाणिस्तानातील अमेरिकेचे न संपणारे युद्ध हा वादाचा मुद्दा ठरतो. त्यामुळे ट्रम्प यांनी जाहीर केलेल्या या धोरणाकडे संपूर्ण जगाचे लक्ष वेधले आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=34836

Posted by on Aug 24 2017. Filed under अमेरिका, आंतरराष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in अमेरिका, आंतरराष्ट्रीय (7 of 351 articles)


►पंतप्रधान मोदींचा अमेरिका दौरा, नवी दिल्ली, २३ जून - डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी ...

×