Home » किशोर भारत » खंडू व खंडाळे गुरुजींचा खट्याळ संवाद

खंडू व खंडाळे गुरुजींचा खट्याळ संवाद

chinu_cartoonगुरुजी- खंडू, ए खंडू अरे तुझं लक्ष कुठे आहे? अन् काय रे सारखा बाहेर काय बघतोस सांग बरं?
खंडू- गुरुजी माझी मैत्रीण भेटायला येणार आहे. घरी आई येऊ देत नाही ना!
गुरुजी- बरं ते राहू दे, मला सांग कालचं होमवर्क केलंस का? दाखव चटकन.
खंडू- त्याचं काय आहे गुरुजी, मी होमला गेलो की, आई वर्कच सांगते. मग मला केव्हा वेळ मिळणार तुम्हीच सांगा ना? होमवर्क करायला?
गुरुजी- खंड्या, अरे खरं सांग होमवर्क केलं नाही. मूर्ख कुठला. बरं आता गणितातील प्रश्‍न विचारतो, एक हौद १॥ तासात अर्धा भरतो, तर पूर्ण हौद भरायला किती तास लागतील? सांग पटकन.
खंडू- सर, हौद जर गळका असेल, तर कधीच भरणार नाही.
गुरुजी- अरे गाढवा, मी कुणाच्या घरच्या हौदाबद्दल नाही विचारलं अन् काय रे, मध्येच सर काय म्हणालास? तुला उत्तर येत नाही हेच खरं.
खंडू- गुरुजी आता चांगले प्रश्‍न विचारा बरं.
गुरुजी- बरं, आता दारूचे दुष्परिणाम सांग. नीट उत्तर दे.
खंडू- गुरुजी माझे बाबा रोज दारू पिऊन येतात तेव्हा मी त्यांना पैसे मागितले तर ते चटकन देतात. हा चांगला परिणाम आहे ना?
गुरुजी- अरे मूर्खा, सारं जग म्हणतं दारू पिणं वाईट आहे.
खंडू- गुरुजी मी मूर्ख नाही. मला वाटतं बाबा रोजच दारू पिऊन यायला हवेत. मला रोज पैसे मिळावेत. गुरुजी तुम्ही नेहमी मूर्ख म्हणता, गाढवापेक्षा हे विशेषण मला आवडलं.
गुरुजी- खंडू आता सोपा प्रश्‍न विचारतो. हं सांग बरं उंदीर कुठे राहतात? याचं उत्तर लहान मुलगा पण सांगू शकेल.
खंडू- गुरुजी, आत्ता धावत घरी जाऊन, माझ्या लहान भावाला आणू का! तो उत्तर बरोबर सांगेल. मी सांगतो ना. पण गुरुजी एवढं साधं तुम्हाला माहीत नाही? अहो, उंदीर आमच्या घरात राहतात. आई म्हणते, हे उंदीर मेले घरात खूप त्रास देतात रात्री.
गुरुजी- अरे गाढवा, उंदीर बिळात राहातात. पण रात्री निजानीज झाली की, घरात धुडगूस घालतात आमच्याकडेपण.
खंडू- गुरुजी तुम्ही रात्रभर जागेच असता का? तरीच वर्गात डुलक्या घेता. मूर्ख असलो तरी खरं तेच सांगतो.
गुरुजी- खंड्या, मूर्खासारखं बडबडू नकोस. बरं आता मला सांग, रात्री लवकर का झोपावं? अरे, अकलेच्या कांद्या आता तरी नीट उत्तर दे.
खंडू- गुरुजी माझे बाबा रात्री घरी आले की, आई सांगते, खंडू आता लवकर झोप, दिवसभर उनाडक्या केल्यास असशील, झोप.
गुरुजी- खंड्या, गाढवा कुठल्याच प्रश्‍नाचं उत्तर तू बरोबर देत नाहीस. घरच्यांचं तुझ्याकडे लक्ष नसतं का!
खंडू- अभ्यास सोडून, माझ्या सगळ्या कारवाईवर, विचारलेल्या प्रश्‍नांची उत्तरे बरोबर न देण्याबद्दल, घरात सारखी बोलणी खावी लागतात. मला योग्य वाटतं तसं मी वागतो. शेवटी कंटाळू ते माझा नाद सोडतात.
गुरुजी- आता मला सांग, खंड्या, सारखा बाहेर काय बघतोस, हं सांग सकाळी लवकर का उठायचं. सांग.
खंडू- गुरुजी, सांगितलं असतं, पण मी लवकर उठतच नाही, मग काय उत्तर देऊ. तुम्ही चांगले प्रश्‍न विचारा मग बघा मी कशी धडाकेबाज उत्तरं देतो. तुम्ही लवकर उठता?
गुरुजी- गाढवा मलाच प्रश्‍न विचारतोस, ऐक मी सकाळी उठून दूध आणतो, बायकोला चहा करून देतो.
खंडू- काय येडचाप प्रश्‍न विचारला, माझं मुळी लग्नच झालं नाही. म्हणून उत्तर बरोबर देता आलं नही. बरोबर ना?
गुरुजी- अरे गाढवा, आता या प्रश्‍नाचं तरी बरोबर उत्तर दे, हं सांग चार विद्वान पुरुषांची नावं.
खंडू- माझे बाबा, माझे आजोबा, आईचे बाबा व आजोबा. सोपा प्रश्‍न विचारलात गुरुजी. बघा उत्तर बरोबर देतो. पूज्य महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, लालबहादूर शास्त्री व सुभाषचंद्र बोस. हे उत्तर खरं. माझे बाबा वगैरे जे सांगितलं ते साफ चुकलं क्षमा कराल ना मला?
गुरुजी- आता कशी शहाण्यासारखी उत्तरं दिलीस. शाब्बास.
खंडू- आयला, गुरुजी तुमच्या तोंडून मूर्ख, महामूर्ख, गाढवा हे शब्द जाऊन, मला शहाणा म्हणालात? माझ्यामुळे गुरुजी तुमची बरीच प्रगती झाली. हे मला खूप आवडलं. तुमच्या पाया पडतो गुरुजी, चांगला आशीर्वाद द्या.
कुमुदिनी पिंपळखरे
नागपूर

Short URL: https://vrittabharati.in/?p=5221

Posted by on May 26 2013. Filed under किशोर भारत. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in किशोर भारत (1 of 2 articles)


जंगल म्हणजे काय? असे विचारल्यास वृक्ष, झुडप, पक्षी व त्यात वन्यप्राणी म्हणजे जंगल असे अनेक जण सांगतील. पण, जंगल हे ...

×