Home » छायादालन, ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » अशोक सिंघल यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार

अशोक सिंघल यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार

=पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतले अंत्यदर्शन=
ashok-singhal antya darshan by modiनवी दिल्ली, [१८ नोव्हेंबर] – विश्‍व हिंदू परिषदेचे ज्येष्ठ नेते आणि रामजन्मभूमी आंदोलनातील अग्रणी अशोक सिंघल यांच्या पार्थिवावर आज बुधवारी राजधानी दिल्लीतील निगमबोध घाटावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आला. अनेक मान्यवरांसह हजारोंच्या संख्येतील लोकांनी ‘जय श्रीराम’ आणि ‘मंदिर वही बनायेंगे’च्या घोषणा देत आपल्या लाडक्या नेत्याला अखेरचा निरोप दिला.
दुपारी तीनच्या सुमारास झेंडेवाला परिसरातील केशवकुंज या रा. स्व. संघाच्या मुख्यालयातून अशोक सिंघल यांची अंत्ययात्रा निघाली. सजविलेल्या ट्रकवर सिंघल यांचे पार्थिव ठेवण्यात आले होते. फुलांनी सुशोभित ट्रकवर सिंघल यांचे भव्य छायाचित्र लावण्यात आले होते. अंत्ययात्रेत हजारोंच्या संख्येत लोक सहभागी झाले. संघ कार्यालयापासून निगमबोध घाटापर्यंतच्या संपूर्ण मार्गावर ठिकठिकाणी अशोक सिंघल यांचे होर्डिंग्ज लावण्यात आले होते. रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या संख्येतील लोक रामजन्मभूमी आंदोलनातील आपल्या या लाडक्या वीराला निरोप देण्यासाठी उपस्थित होते. अंत्ययात्रेच्या मार्गात सिंघल यांच्या पार्थिवावर ठिकठिकाणी पुष्पवृष्टी करण्यात आली. अंत्ययात्रेत महिला आणि पुरुषांची अनेक भजनी मंडळी सहभागी झाली होती. ट्रक आणि कारसह गाड्यांचा मोठा ताफा अंत्ययात्रेत होता. निगमबोध घाटावर अंत्ययात्रा पोहोचायला जवळपास दोन तास लागले. घाटावरही अनेक लोकांनी सिंघल यांना श्रद्धांजली वाहिली. निगमबोध घाट यावेळी फुलांनी सुशोभित करण्यात आला होता. सायंकाळी ५.३० च्या सुमारास सिंघल यांच्या पुतण्याने त्यांच्या पार्थिवाला अग्नी दिला. यावेळी रामनामाचा गजर करण्यात आला.
यावेळी रा. स्व. संघाचे सरकार्यवाह भय्याजी जोशी, सहसरकार्यवाह कृष्णगोपाल, भाजपाचे ज्येष्ठ नेते व मार्गदर्शक लालकृष्ण अडवाणी, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह, संघटनमंत्री रामलाल, केंद्रीय मंत्री उमा भारती, अनंतकुमार, रविशंकर प्रसाद, डॉ. हर्षवर्धन, पीयूष गोयल, बाबुल सुप्रियो, हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर, राज्यपाल ओमप्रकाश कोहली, विहिंपचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष डॉ. प्रवीण तोगडिया, विहिंपचे अध्यक्ष राघव रेड्डी, चंपत राय, योगगुरू बाबा रामदेव, बिहार भाजपाचे नेते सुशीलकुमार मोदी, सी. पी. ठाकूर, खा. साक्षी महाराज, खा. योगी आदित्यनाथ, खा. रमेश विधुडी, खा. प्रवेश वर्मा, खा. रमेश पोखरियाल निशंक, शिवसेनेचे खा. चंद्रकांत खैरे, भाजपा नेते शाहनवाज हुसैन, श्याम जाजू, भूपेंद्र यादव, संबित पात्रा, मुरलीधर राव, बनवारीलाल पुरोहित, अभाविपचे राष्ट्रीय संघटनमंत्री सुनील आंबेकर, मणिंदरजितसिंग बिट्टा, हेमंत जांभेकर, सुनील मानसिंहका आणि श्रीकांत आगलावे यांच्यासह संघ परिवारातील विविध संघटनांचे पदाधिकारी आणि अनेक मान्यवर उपस्थित होते.
अशोक सिंघल यांचे मंगळवारी दुपारी गुडगावच्या मेदांता मेडिसिटी रुग्णालयात निधन झाले होतेे. रात्रीच त्यांचे पार्थिव आर. के. पुरम् येथील विहिंपच्या कार्यालयात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. रात्री सिंघल यांचे पार्थिव केशवकुंजला आणण्यात आले. रात्रीपासूनच सिंघल यांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी लोकांची रीघ लागली होती. आज बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केशवकुंज कार्यालयात जाऊन सिंघल यांचे अंत्यदर्शन घेतले आणि त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. गृहमंत्री राजनाथसिंह, परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज, नगर विकास मंत्री व्यंकय्या नायडू, साध्वी ऋतंभरा यांच्यासह अनेक मान्यवरांनी सिंघल यांचे अंत्यदर्शन घेतले.
रविवारी शोकसभा
अशोक सिंघल यांना श्रद्धांजली वाहाण्यासाठी रविवार, २२ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजता इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियममध्ये शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=25558

Posted by on Nov 18 2015. Filed under छायादालन, ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in छायादालन, ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (1213 of 2477 articles)


पंतप्रधान मोदी यांची भूमिका पॅरिस हल्ला चिंताजनक नवी दिल्ली, [१८ नोव्हेंबर] - फ्रान्सची राजधानी पॅरिसवर झालेला दहशतवादी हल्ला लक्षात ...

×