Home » छायादालन, ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » आता बहुपत्नीत्वाविरुद्ध पुढचा लढा : शायरा बानो

आता बहुपत्नीत्वाविरुद्ध पुढचा लढा : शायरा बानो

नवी दिल्ली, २२ ऑगस्ट –
तिहेरी तलाकविरुद्धची न्यायालयीन लढाई यशस्वीपणे जिंकल्यानंतर शायरा बानो यांनी आता मुस्लिम समाजातील आणखी एक प्रथा संपुष्टात आणण्याचा निर्धार केला आहे. अर्थात या समाजात असलेल्या बहुपत्नीत्व प्रथेविरोधात लढाई लढणार असल्याचे शायरा बानो यांनी आज मंगळवारी जाहीर केले.
माझी लढाई तिहेरी तलाकपुरती मर्यादित नाही. मुस्लिम महिलांसाठी अजून बरेच काही करायचे आहे. मुस्लिम समाजातील बहुविवाह प्रथा संपुष्टात आणण्यासाठी मी लवकरच न्यायालयीन लढाई लढणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मी आता बहुपत्नीत्व प्रथेविरोधात लढा देणार आहे. तथापि, अशा समस्या निकाली काढण्यासाठी कोणीतरी पुढे येण्याची गरज आहे, असे त्या म्हणाल्या. मुस्लिम महिलांसाठी आजचा दिवस ऐतिहासिक आहे. मी न्यायालयाच्या तिहेरी तलाकवरील निकालाचे स्वागत करते. मुस्लिम समाजातील महिलांची स्थिती समजून घ्यायला हवी आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा आदर करून सरकारने संसदेत कायदा करावा, असे आवाहनही त्यांनी केले. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे आता मुस्लिम महिलेला कोणीही तीन वेळा तलाक म्हणून बेघर करू शकणार नाही. या समाजात अजूनही बहुविवाह आणि निकाह हलालसारख्या प्रथा अस्तित्वात आहेत. त्या रोखण्याची गरज आहे, असे त्या म्हणाल्या.
खरे श्रेय शायरा बानोचेच
तिहेरी तलाकवरील सवोच्च न्यायालयाच्या ऐतिहासिक निकालाचे खरे श्रेय शायरा बानो यांनाच जाते. कारण, या प्रथेविरोधात शायरा यांनीच सर्वप्रथम न्यायालयात धाव घेतली होती. तीन तलाकची प्रथा बंद व्हावी म्हणून त्यांनी संघर्ष केला. शायराला तिच्या नवर्‍याने टेलिग्रामद्वारे तलाक दिला होता. तिला दोन मुले आहेत. पण, गेल्या वर्षभरापासून ती मुलांना पाहण्यासाठी तळमळत आहे. तिला मुलांशी फोनवरही बोलू दिले जात नाही. त्यामुळेच शायराने तिहेरी तलाकच्या विरोधात न्यायालयात धाव घेतली होती. निकाह हलाला आणि बहुविवाह पद्धतीलाही त्यांचा विरोध आहे. निकाह हलालात महिलेला पहिल्या पतीसोबत पुन्हा राहायचे असेल, तर आधी दुसर्‍या पुरुषाशी विवाह करावा लागतो. त्याच्याशी घटस्फोट घेतल्यानंतरच तिला पहिल्या पतीसोबत राहण्याची परवानगी मिळते. ही प्रथा बंद करण्यात यावी, अशी मागणी शायराने याचिकेत केली होती. शायरासोबतच्या या संघर्षात आफरीन रेहमान, आतिया साबरी, गुलशन परवीन आणि इशरत जहॉं आदी महिलांचेही योगदान आहे.
शाह बानो प्रकरण
मुस्लिम महिलांच्या समस्यांना सर्वप्रथम शाह बानो प्रकरणाने वाचा फोडली होती. शाह बानो नावाच्या ६२ वर्षीय मुस्लिम महिलेला ५ मुले होती. १९७८ मध्ये तिच्या नवर्‍याने तिला तलाक दिला. नवर्‍याकडून पोटगी मिळावी म्हणून तिने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. ७ वर्षं गेली. सर्वधर्मीयांना लागू होणार्‍या कायद्याच्या कलम १२५ नुसार शाह बानोला पोटगी देण्याचा ऐतिहासिक निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. त्याला मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डासह देशभरातील अनेक संघटनांनी विरोध केला. त्याविरोधात आंदोलन करण्याची धमकी दिली. त्यामुळे तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी संसदेत कायद्यात बदल करून मुस्लिम महिलांना पोटगी नाकारली होती. (वृत्तसंस्था)

Short URL: https://vrittabharati.in/?p=34851

Posted by on Aug 24 2017. Filed under छायादालन, ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in छायादालन, ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (40 of 2477 articles)


नवी दिल्ली, २२ ऑगस्ट - त्रिवार तलाकप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने आज ऐतिहासिक निकाल दिला आहे. हा मुस्लिम महिलांचा विजय असला तरी ...

×