Home » छायादालन, ठळक बातम्या, नागरी, रा. स्व. संघ, राष्ट्रीय » उगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य

उगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य

=डॉ. मोहनजी भागवत यांचे प्रतिपादन,

RSS Chief Mohan Bhagwat participated in a function on the ocassion of Guru Purnima in Patna on Sunday, July 21,2013. Express Photo BY Prashant Ravi

नागपूर, १९ नोव्हेंबर – कुठल्याही संस्थेच्या संपूर्ण प्रवासात तिच्या उगमाची आठवण ठेवणे, त्याचे भान बाळगणे हे संस्था यशस्वी होण्यासाठी महत्त्वाचे असते. लक्ष्य व उद्देशाचे स्मरण कायम असेल तरच चांगल्या गोष्टी घडतात. पण संस्थेच्या सत्त्वाची आठवण अनुकूल परिस्थितीत तेथील प्रत्येक कर्मचार्‍याला वारंवार करून देण्याची व्यवस्था असावी. कारण सत्त्वाच्या पाठबळावरच भविष्यातील उभारणी असते. साधन, संपत्तीचे महत्त्व नसते. महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेत ही जाणीव प्रकर्षाने जाणवते, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी केले.
महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था पुणे यांच्यावतीने सीताबाई नरगुंदकर नर्सिंग महिला महाविद्यालयाच्या नूतन वास्तूचे उद्घाटन हिंगणा येथे डॉ. मोहनजी भागवत यांच्या हस्ते रविवारी झाले. यावेळी ते मार्गदर्शन करीत होते. कार्यक्रमाला इंडियन एक्सप्रेस समूहाचे अध्यक्ष व कार्यकारी संचालक विवेक गोयनका विशेषत्वाने उपस्थित होते.
यावेळी व्यासपीठावर संस्थेचे कार्याध्यक्ष प्रमोद गोर्‍हे, उपकार्याध्यक्ष एन. डी पाटील, महापौर नंदा जिचकार, खा. विकास महात्मे, नागपूर प्रकल्पाचे अध्यक्ष मिलिंद कुकडे, सचिव डॉ. पीव्हीएस शास्त्री, विश्‍वस्त राजेंद्र जोग, संचालक जयंत इनामदार, प्राचार्या रूपा वर्मा उपस्थित होत्या.
याप्रसंगी डॉ. मोहनजी भागवत म्हणाले, कोणत्या कष्टातून आपल्याला संपत्तीचा वारसा लाभला हे लक्षात ठेवले तर पिढ्यान्‌पिढ्या लक्ष्मी घरात टिकते. नाही तर सात पिढ्यांनंतर निघून जाते. सत्त्व आहे, तिथे बल, तेज, लक्ष्मी टिकून राहते. सत्त्व असेल तर वैभव येते. सत्त्वाच्या आधारावर यशस्वी वाटचाल होते. महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेने स्थापनेची पहिली शंभर वर्षे पूर्ण केली तरी संस्थेच्या पूर्वसुरींची आठवण नव्या पिढीला होत आहे, ही आनंदाची बाब आहे. संस्था स्थापनेनंतर अनेक प्रश्‍न, समस्या पुढे येतात, दबाव येतो. हे सर्व सांभाळून पुढे जावे लागते. स्थापनेच्यावेळी भासणारी निधीची चणचण भरून निघते. पण गौरवप्राप्तीसाठी स्थिर मनाने केंद्रस्थानी लक्ष ठेवावे लागते. प्रगतीच्या वाटेवर उगमाचा विसर पडून, मत्सर येता कामा नये. संस्थेची वृत्ती ही लाभाची नसावी तर सेवेची असावी. या महत्त्वाकांक्षेने काम चालले पाहिजे. याची जाणीव सर्वांना असली पाहिजे आणि नसेल तर ती सोय कार्यक्रम, वाचनातून केली पाहिजे. स्मरण करून देणे याची काळजी घेतली पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.
स्त्री सशक्तीकरणावर मार्गदर्शन करताना ते म्हणाले, आज परिस्थिती बदलली असली तरी त्यांच्या सशक्तीकरणाची गरज आहेच. त्यांना स्वातंत्र्य देऊन त्यांच्यात आत्मविश्‍वास निर्माण करावा लागेल. प्राचीन काळी ही पद्धती होती. मधल्या काळात त्याकडे दुर्लक्ष झाले. एकीकडे आपण तिची पूजा केली, तर दुसरीकडे तिला दास्यत्वाखाली ठेवले. तत्कालीन गरज ओळखून महापुरुषांनी मार्ग सांगितले. त्यात महात्मा फुले आणि महर्षी कर्वे यांची नावे घेता येतील. महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी नि:स्वार्थ भावनेने समाजाचा विरोध पत्करून नेटाने महिला सशक्तीकरणाचे काम केले. देशातील लोकसंख्येत निम्मा वाटा महिलांचा आहे. त्यामुळे समाजाची प्रगती साधायची असेल तर महिला सशक्त होणे आवश्यक आहे. आज स्त्रियांच्या बाबतीत परिस्थिती तीच असली तरी दृष्टिकोन बदलण्याची गरज आहे.
प्रत्येक स्त्री सारखी नाही. प्रांत, वर्ग, आर्थिक परिस्थिती यांच्या दृष्टीने महिला वर्गाची सरसकट समान मोजदाद करता येणार नाही. या विचारातून स्त्री सशक्तीकरण व्हावे. मूळ काम हे महिला सशक्तीकरण असले तरी ते त्या-त्या वर्गाची दिशा घेऊन चालविले तर अधिक उत्तम होईल. जसे सेवा हा गुण महिलांमध्ये उपजतच आहे. यातून संस्कारांचे जतन होते. हे संस्कार पुढील पिढीपर्यंत पोचतात. त्यामुळे अशा तिच्या या गुणाला न्याय देणारे अभ्यासक्रम तयार करायला हवे, असेही डॉ. भागवत म्हणाले.
कार्यक्रमात नर्सिंग महाविद्यालयाच्या उभारणीत योगदान देणार्‍या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यात वृषाली देवधर, शिरीष देवधर, समीर गलगलीकर, गुरुनाथ मोडक, सुनील वाडीतेल व सुनील पाटील यांचा समावेश होता. कार्यक्रमाची सुरुवात आश्रमगीताने झाली. संचालन कविता गोमासे यांनी केले.
प्रसारमाध्यमांनी प्रेरणा घ्यावी : विवेक गोयनका
महर्षी शिक्षण संस्थेच्या अध्यक्ष, पदाधिकारी आणि कर्मचार्‍यांच्या संस्थेच्या काम करण्याचा पद्धतीपासून प्रसारमाध्यमांनी प्रेरणा घेण्याची आवश्यकता यावेळी विवेक गोयनका यांनी व्यक्त केली. त्यांनी महर्षी शिक्षण संस्थेशी जुळलेल्या सर्व सदस्यांचे भरभरून कौतुक केले. आजच्या काळात अशा संस्थेचे आपण सदस्य आहोत, याचा अभिमान येथील प्रत्येकाने बाळगला पाहिजे, असेही ते म्हणाले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=35014

Posted by on Nov 21 2017. Filed under छायादालन, ठळक बातम्या, नागरी, रा. स्व. संघ, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in छायादालन, ठळक बातम्या, नागरी, रा. स्व. संघ, राष्ट्रीय (6 of 2479 articles)


हैदराबाद, २० नोव्हेंबर - एनर्जी ड्रिंक्समुळे किडनी खराब होण्याची आणि रक्तदाब वाढण्याची शक्यता असते. तसेच त्याचे हृदयावर प्रतिकूल परिणाम होतात, ...

×