Home » उ.प्रदेश, छायादालन, ठळक बातम्या, राज्य » उत्तरप्रदेशात स्पष्ट बहुमत द्या

उत्तरप्रदेशात स्पष्ट बहुमत द्या

  • अलाहाबादेतील विशाल सभेत मोदींचे आवाहन
  • भाजपाच्या निवडणूक प्रचाराचा शंखनाद

अलाहाबाद, [१३ जून] – उत्तरप्रदेशचा विकास करण्यासाठी विधानसभा निवडणुकीत भाजपाला स्पष्ट बहुमताने निवडून द्या, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज येथे एका विशाल जाहीर सभेत केले. भाजपा राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीच्या निमित्ताने येथील परेड ग्राउंडवर आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह, ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, डॉ. मुरलीमनोहर जोशी, केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह, संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर, जलसंसाधन मंत्री उमा भारती, सुक्ष्म-लघु आणि मध्यम उद्योगमंत्री कलराज मिश्रा, संस्कृती आणि पर्यटन मंत्री डॉ. महेश शर्मा, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान, राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे, उत्तरप्रदेश भाजपाचे अध्यक्ष खा. केशवप्रसाद मौर्य यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. या जाहीर सभेच्या माध्यमातून भाजपाने उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा श्रीगणेशा केला.
उत्तरप्रदेशचा आजपर्यंत विकास झाला नाही, यासाठी राज्यातील समाजवादी पार्टीचे सरकार जबाबदार आहे, असा आरोप करीत मोदी म्हणाले की, ‘या राज्याचा विकास झाला तर भारत जगात पहिल्या स्थानावर गेलेला असेल. सपाच्या राज्यात गुंडागर्दी, भाई-भतिजावाद, भ्रष्टाचार फोफावला. राज्यातील कायदा सुव्यवस्था धोक्यात आली. त्यामुळे राज्यात विकासाची अग्नी पेटवून त्यात गुंडाराज, भाई-भतिजावाद, भ्रष्टाचार आणि अहंकार यांची आहुती टाका, त्यामुळे विकासाचा यज्ञ यशस्वी होईल.’
ज्या-ज्यावेळी देशावर संकटे आली, त्या-त्या वेळी उत्तरप्रदेशच देशाच्या मदतीला धावून आला, त्यामुळे आता उत्तरप्रदेशवर संकट आहे, तर आम्ही त्याच्या मदतीला धावून जावू. विकासापासून वंचित उत्तरप्रदेशचा परिपूर्ण आणि सर्वांगीण विकास घडवू, असे मोदी म्हणाले.
३० वर्षानंतर प्रथमच देशात पूर्ण बहुमताचे सरकार आले, स्थिर सरकारमुळे निर्णय घेण्याची क्षमता वाढते, याचे श्रेय उत्तरप्रदेशातील जनतेचेच आहे, यामुळेच केंद्र सरकारमध्ये उत्तरप्रदेशचा दबदबा आहे. पंतप्रधान, गृहमंत्री, संरक्षणमंत्री उत्तरप्रदेशचे आहेत, असे मोदी यांनी सांगितले. मोदींनी यावेळी समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टीवर जोरदार हल्ला चढवला. मायावती यांच्या भ्रष्टाचारावर मुलायमसिंह निवडणुकीच्या वेळी हल्ला चढवत होते, तर समाजवादी पार्टीच्या गुंडाराजवर मायावती टीका करीत होत्या, पण निवडून आल्यावर दोघांनीही एकमेकांवर कोणतीही कारवाई केली नाही. दोघांत जुगलबंदी सुरू आहे, आणि दोघेही मिळून उत्तरप्रदेशची लूट करत असल्याचा आरोप मोदी यांनी केला. उत्तरप्रदेशसारख्या एवढ्या मोठ्या राज्याची बरबादी आणि विनाश मी पाहू शकत नाही, कारण मी उत्तरप्रदेशचा खासदार आहे, तुम्ही मला सेवेची संधी दिली आहे, याकडे लक्ष वेधत मोदी म्हणाले की, पाच वर्षात व्यक्तिगत स्वार्थाचे कोणतेही काम केले तर तुम्ही मला काढून टाका. उत्तरप्रदेशच्या विकासासाठी मला मां गंगा, यमुना आणि सरस्वती यांचा आशीर्वाद हवा आहे, असे नमूद करत मोदी म्हणाले की, संगमाच्या या भूमीतून आम्हाला नेहमीच नवीन प्रेरणा आणि ऊर्जा मिळते. स्वातंत्र्यानंतर उत्तरप्रदेशातील १५२९ गावात वीज नव्हती. याचे मला अतिशय दु:ख होते. या गावात १ हजार दिवसात वीज पोहाचवण्याचा आमचा निर्धार होता, पण त्याआधीच १३५२ गावात वीज पोहोचवण्यात आम्ही यशस्वी झालो. संपूर्ण देशाचे पोट भरण्याची ताकद असलेल्या उत्तरप्रदेशातील शेतकर्‍यांची स्थिती आज अतिशय खराब आहे. त्यामुळे देशातील शेतकर्‍यांच्या कल्याणासाठी आमच्या सरकारने अनेक निर्णय घेतल्याचे मोदी यांनी सांगितले. कॉंग्रेस सरकारने ५० वर्षात केले नाही, तेवढे काम आम्हाला ५ वर्षात करायचे आहे, असे मोदी म्हणाले. आतापर्यत ज्या-ज्या राज्यात भाजपाला संधी मिळाली, त्या-त्या राज्यांचा विकास झाला, याकडे लक्ष वेधत मोदी म्हणाले की, आसाममध्ये नुकतेच परिवर्तन झाले, भाजपाला स्पष्ट बहुमत मिळाले. परिवर्तनाचे आसामसारखे संकेत उत्तरप्रदेशातही तुमच्या उत्साहाने दिसत आहेत. आपल्या सरकारच्या उपलब्धीचाही मोदी यांनी यावेळी उल्लेख केला. विकासाच्या मार्गावर चालण्याचा आणि आपले भाग्य बदलण्याचा निर्धार राज्यातील जनतेने करावा, आणि भाजपाला स्पष्ट बहुमताने निवडून द्यावे, असे आवाहन मोदी यांनी केले.
परिवर्तनाची ज्योत आणि उंचावलेले मोबाईल
भाषणाच्या सुरुवातीलाच मोदींनी अशी काही वातावरणनिर्मिती केली की उपस्थित जनता अगदी थक्क होऊन गेली. मोदींनी रॅलीत उपस्थित लोकांना आपापले मोबाईल बाहेर काढून टॉर्च सुरू करण्यास सांगितले. संध्याकाळी लक्षावधी टॉर्चरूपी ‘ज्योती’च्या प्रकाशामुळे नयनरम्य दृष्य तयार झाले. सर्वांनी हात उंचावून व मोबाईलची बॅटरी ऑन करून आसमंत उजळवून टाकला. देशातील कोट्यवधी नागरिकांनी हे अनुपम दृष्य डोळ्यात साठवून ठेवले. संपूर्ण हिंदुस्थानला प्रकाश दाखवा, या प्रकाशामुळे झोपलेले जागे होतील, ही ज्योत परिवर्तनाचा संकेत देत आहे, असे पंतप्रधानांनी म्हणताच उपस्थित नागरिकांनी प्रचंड जल्लोष केला.

Short URL: https://vrittabharati.in/?p=28588

Posted by on Jun 14 2016. Filed under उ.प्रदेश, छायादालन, ठळक बातम्या, राज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in उ.प्रदेश, छायादालन, ठळक बातम्या, राज्य (241 of 2477 articles)


नवी दिल्ली, [१३ जून] - भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांना दुसरा कार्यकाळ मिळेल की नाही, याबाबत तर्कवितर्क ...

×