Home » आंतरराष्ट्रीय, आशिया, छायादालन, ठळक बातम्या » उत्तर भारतासह पाक, अफगाणात शक्तिशाली भूकंप

उत्तर भारतासह पाक, अफगाणात शक्तिशाली भूकंप

  • पाकमध्ये शंभरावर ठार, अनेक जखमी
  • हिंदूकूश पर्वतरांगेत होता केंद्रबिंदू
  • ७.७ रिश्टर स्केल इतकी तीव्रता
  • अनेक इमारतींची पडझड, प्रचंड नुकसान

Earthquake in Afghanistanनवी दिल्ली/इस्लामाबाद, [२६ ऑक्टोबर] – राजधानी दिल्लीसह संपूर्ण उत्तर भारत आणि पाकिस्तान तसेच अफगाणिस्तान आज सोमवारी दुपारच्या सुमारास भूकंपाच्या शक्तिशाली धक्क्याने हादरला. रिश्टर स्केलवर ७.७ इतकी तीव्रता असलेल्या भूकंपामुळे पाकिस्तानात सर्वाधिक नुकसान झाले असून, या देशात आतापर्यंत शंभरावर लोकांचे बळी गेले, तर असंख्य नागरिक जखमी झाले आहेत. अफगाणमधील हिंदूकूश पर्वतीय भागात या भूकंपाचा केंद्रबिंदू होता. उत्तर भारतातील बहुतांश भागांमध्ये सुमारे दोन मिनिटेपर्यंत भूकंपाचे धक्के जाणवत होते. यामुळे लोकांनी भयभीत होऊन घराबाहेर धाव घेतली आणि सुरक्षित ठिकाण गाठले.
या भूकंपाचे ठिकाण उत्तर अफगाणिस्तानमधील बदकशान प्रांताची राजधानी असलेल्या फैझाबाद शहराच्या आग्नेयकडे सुमारे ८२ किमी अंतरावर आणि जमिनीखाली तब्बल १९६ किलोमीटर खोलात होते. या भूकंपाची तीव्रता इतकी जास्त होती की, यामधून उत्सर्जित झालेली ऊर्जा हिरोशिमा या जपानी शहरावर दुसर्‍या महायुद्धाच्या काळात टाकण्यात आलेल्या अणुबॉम्बच्या ५० पट असल्याचे मत एका ज्येष्ठ भारतीय शास्त्रज्ञाने व्यक्त केले.
राजधानी दिल्लीसोबतच, पंजाब, उत्तराखंड, राजस्थान, बिहार, जम्मू-काश्मीर, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, यासह अनेक राज्यांमध्येही भूकंपाचे जोरदार झटके बसले. अनेक घरांना तडा गेल्या, घरातील पंखे आणि कपाटे हलू लागल्याने लोक अक्षरश: भयभीत झाले. कार्यालयांमधूनही लोक बाहेर धावत सुटले. काश्मिरातील भूकंपात लष्कराचे दोन जवान जखमी झाले आहेत. तथापि, भारताच्या कोणत्याही भागातून जीवितहानीचे वृत्त प्राप्त झाले नाही.
पाकिस्तानच्या वायव्य सरहद्दीतील स्वात प्रांतात तसेच बाजौर या आदिवासी भागात भूकंपामुळे मोठी हानी झाली. या भागांमध्ये शेकडो इमारती आणि घरांची पडझड झाली असून, त्याखाली दबून शंभरावर लोकांचा मृत्यू झाला आहे, तर अनेक जण जखमी झाले आहेत. पेशावरसह अन्य शहरांमधील रुग्णालयांमध्ये जखमींना भरती करण्यात आले असून, त्यातील अनेकांची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
भूकंपामुळे पडझडीची माहिती मिळताच, पोलिस आणि अग्निशमन दलासोबतच लष्कराचे सैनिकही मदत व बचाव कार्यासाठी तैनात झाले. विविध रुग्णालयांमधील डॉक्टरांच्या पथकानेही धाव घेतली. इमारतींच्या ढिगार्‍याखालून शंभरावर मृतदेह बाहेर काढण्यात आले असून, अजूनही मदत व बचाव कार्य सुरू आहे. अफगाणची राजधानी काबुल आणि पाकची राजधानी इस्लामाबादेतही भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले.
पंतप्रधानांनी घेतला मदतीसाठी पुढाकार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भूकंपात बळी गेलेल्या नागरिकांप्रति दु:ख व्यक्त केले. सोबतच, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या दोन्ही देशांना मदतीसाठी भारत तत्पर असल्याचे जाहीर केले. अफगणिस्तान, पाकिस्तानसह भारताच्या काही भागाला भूकंपाचा तीव्र झटका बसला आहे. प्रत्येकजण सुरक्षित राहावा, यासाठी मी प्रार्थना करीत आहे. भूकंपाबद्दलची सर्व माहिती घेतली आहे. दोन्ही देशांना लागणार्‍या मदतीसाठी भारत तयार आहे, असे पंतप्रधानांनी ट्विटरवर म्हटले आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=25354

Posted by on Oct 27 2015. Filed under आंतरराष्ट्रीय, आशिया, छायादालन, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in आंतरराष्ट्रीय, आशिया, छायादालन, ठळक बातम्या (1279 of 2483 articles)


=दिल्लीत भव्य स्वागत= नवी दिल्ली, [२६ ऑक्टोबर] - सुमारे १५ वर्षांपूर्वी अनावधानाने पाकिस्तानच्या सीमेत प्रवेश करणारी आणि तेव्हापासून तिथेच राहिलेली ...

×