Home » आंतरराष्ट्रीय, आशिया, छायादालन, ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » उद्‌ध्वस्त नेपाळला भूकंपाचा पुन्हा धक्का

उद्‌ध्वस्त नेपाळला भूकंपाचा पुन्हा धक्का

  • २५ ठार, हजारो जखमी
  • उत्तर भारतही हादरला
  • बिहारमध्ये १६ जणांचा बळी, ३८ जखमी

nepal bhukamp12mayकाठमांडू, नवी दिल्ली, [१२ मे] – १५ हजारावर लोकांचा बळी घेणार्‍या २५ एप्रिल रोजीच्या महाविनाशी भूकंपात जवळजवळ उद्‌ध्वस्त झालेल्या नेपाळला आज मंगळवारी पुन्हा एकदा शक्तिशाली भूकंपाचा हादरा बसला. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता ७.४ इतकी होती. नेपाळच्या विविध भागांमध्ये आलेल्या भूकंपात अनेक इमारती जमीनदोस्त झाल्या. त्याखाली दबून २५ पेक्षा जास्त जणांचा बळी गेला असून, हजारो लोक जखमी झाले आहेत. संपूर्ण उत्तर भारतालाही सहा पेक्षा जास्त तीव्रतेच्या भूकंपाचा धक्का बसला. त्याची सर्वाधिक झळ बिहारला बसली असून, या राज्यात १६ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. उत्तरप्रदेशातही एकाचा बळी गेला आहे. दरम्यान, भारतात मदत व बचाव कार्य तातडीने हाती घेण्याचे आदेश देतानाच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेपाळलाही तत्काळ मदतीचा हात दिला आहे.
गेल्या महिन्यातील भूकंपातून नेपाळ अजूनही सावरलेला नाही. ढिगारे उपसण्याची आणि त्याखालून मृतदेह बाहेर काढण्याची मोहीम सुरूच असताना १७ दिवसानंतर हा देश पुन्हा एकदा उद्‌ध्वस्त झाला आहे. काही ठिकाणी भूस्खलन झाले. तर काही भागांमध्ये इमारतींचे ढिगारे झाले. दुपारी १२ वाजून ३९ मिनिटांनी ७.४ तीव्रतेचा धक्का बसताच भीतीने लोक घराबाहेर पडले आणि सैरावैरा पळत सुटले. चीन-नेपाळ सीमेवरील कोडारी गावाजवळ जमिनीखाली १९ किलोमीटर आत भूकंपाचा केंद्रबिंदू होता. एव्हरेस्ट शिखराच्या बेसकॅम्पपासून जवळच असलेले हे ठिकाण काठमांडूच्या पूर्वेस ५२ किमी अंतरावर आहे. पहिला धक्का सुमारे ३० सेकंदपर्यंत जाणवला. त्यानंतर काही विशिष्ट अंतराने एकापाठोपाठ आणखी सहा धक्के बसले. त्यातील दुसर्‍या धक्क्याची तीव्रता ६.२, तिसर्‍या धक्क्याची ५.४, चौथ्याची ५ आणि पाचव्या धक्क्याची तीव्रता ४.८ इतकी होती. त्यानंतरचे दोन्ही धक्के ४.५ इतक्या तीव्रतेचे होते.
नेपाळमध्ये सर्वाधिक नुकसान सिंधूपाल चौकात झाले. या भागात भूकंपामुळे २० जणांचा बळी गेला आहे. नेपाळच्या संसदेचे अधिवेशन सुरू असताना बसलेल्या या भूकंपाच्या धक्क्यामुळे संसदेतील फर्निचर, पंखे आणि अध्यक्षांच्या आसनापुढील माईकही हलत होता. हा प्रकार पाहून सर्वच सदस्य सभागृहाबाहेर धावत सुटले. क्षणातच वीजही गेल्याने सभागृहात काळोख पसरला होता. भूकंपानंतर लगेच पंतप्रधान मोदी यांच्या सूचनेवरून गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी नेपाळला लागेल ती सर्व मदत देण्याचे जाहीर केले. यानंतर काही वेळातच भारतीय हवाई दलाचे सुसज्ज विमान काठमांडूकडे रवाना झाले. दरम्यान, नेपाळला भूकंपाचे आणखी धक्के बसू शकतात, तथापि त्यांची तीव्रता फार कमी राहील, असे हवामान खात्याने जाहीर केले आहे.
उत्तर भारतालाही धक्के
संपूर्ण उत्तर भारतालाही सहा पेक्षा जास्त तीव्रतेचा धक्का बसला. राजधानी दिल्ली, हिमाचल प्रदेश, पंजाब, हरयाणा, उत्तरप्रदेश, बिहार, झारखंड, ओडिशा, आसाम, पश्‍चिम बंगाल आणि मध्यप्रदेशमध्ये दुपारी १२ वाजून ३८ मिनिटांनी जमीन हादरली. अनेक जण जीव मुठीत घेऊन घर आणि कार्यालयाबाहेर धावत सुटले. खबरदारीचा उपाय म्हणून दिल्ली आणि कोलकात्यातील मेट्रो वाहतूक काही काळासाठी बंद करण्यात आली. बिहारला या भूकंपामुळे सर्वाधिक नुकसान झाले. नेपाळच्या सीमेला लागून असलेल्या बिहारच्या भागात १६ जणांचा मृत्यू झाला असून, ३८ जण जखमी झाले आहेत. उत्तरप्रदेशातही एकाचा बळी गेला असून, अन्य दोन जण जखमी झाले आहेत. केंद्रीय गृहमंत्रालयानेही या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तान आणि इंडोनेशियातही भूकंपाचे धक्के बसले आहेत. अफगाणिस्तानातील भूकंप ६.९ रिश्टर स्केल तीव्रतेचा असल्याने हे धक्के भारतापर्यंत पोहोचल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. तथापि, या देशांमध्ये कोणतीही प्राणहानी झाली नाही.
उच्चस्तरीय बैठकीत आढावा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भूकंपानंतर लगेच उच्चस्तरीय बैठक बोलावली आणि देशातील स्थितीसोबतच नेपाळमध्ये झालेल्या नुकसानीचाही आढावा घेतला. स्थिती हाताळण्यासाठी संबंधित यंत्रणांनी दक्ष राहण्याचे आदेश त्यांनी जारी केले आहेत.

Short URL: https://vrittabharati.in/?p=22528

Posted by on May 12 2015. Filed under आंतरराष्ट्रीय, आशिया, छायादालन, ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in आंतरराष्ट्रीय, आशिया, छायादालन, ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (1712 of 2484 articles)


सुषमा स्वराज सर्वोत्कृष्ट मंत्री नितीन गडकरीही उतरले पसंतीला इंडिया टीव्ही, सी-व्होटरचा सर्व्हे नवी दिल्ल्ली, [१२ मे] - याच आठवड्यात ...

×