Home » आंतरराष्ट्रीय, आशिया, छायादालन, ठळक बातम्या » ऐतिहासिक सीमा करारावर स्वाक्षरी

ऐतिहासिक सीमा करारावर स्वाक्षरी

=बांगलादेशकडून भारताला मिळणार ७,११० एकर जमीन : पंतप्रधान मोदींच्या दौर्‍याची फलश्रुती=
Narendra Modi-shaikh hasina Bangladesh Visitढाका, [६ जून] – गेल्या ४१ वर्षांपासून रखडलेल्या ऐतिहासिक भू-सीमा करारावर भारत आणि बांगलादेश यांनी आज शनिवारी स्वाक्षरी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दोन दिवसांच्या बांगलादेश दौर्‍याची आणि भाजपाप्रणीत रालोआ सरकारची ही आजवरची सर्वात मोठी उपलब्धीच मानली जात आहे. या करारामुळे बांगलादेशच्या ताब्यात असलेला ७,११०.०२ एकर इतका भूभाग भारताला मिळणार आहे.
संसदेच्या अर्थसंकल्पी अधिवेशनाच्या दुसर्‍या टप्प्यात या ऐतिहासिक करारावरील विधेयकाला मंजुरी मिळाली होती. दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंध मजबूत करण्यासोबतच एकमेकांच्या देशातील कैदी व अतिरेकी परस्परांना सोपविण्याचा मार्गही या करारामुळे आता मोकळा झाला आहे. काही वादग्रस्त मुद्यांमुळे गेल्या ४१ वर्षांपासून हा करार रखडला होता. पण, रालोआ सरकारने त्यात काही महत्त्वाच्या दुरुस्त्या करून, संसदेच्या दोन्ही सभागृहात त्या मंजूरही करून घेतल्या.
पंतप्रधानपदी आरूढ झाल्यानंतर नरेंद्र मोदी प्रथमच सध्या बांगलादेशच्या दौर्‍यावर गेले आहेत. ढाका विमानतळावर मोदी यांचे स्वागत करण्यासाठी स्वत: पंतप्रधान शेख हसीना उपस्थित होत्या. नरेंद्र मोदी यांनी १९७१ च्या मुक्ती लढ्यातील शहीदांना नमन करून आपल्या बांगलादेश दौर्‍याचा प्रारंभ केला. नरेंद्र मोदी आणि शेख हसीना यांच्यात विविध मुद्यांवर सविस्तर चर्चा झाल्यानंतर या करारावर स्वाक्षरी करण्यात आली आणि दस्तावेजांचे आदानप्रदानही झाले. यावेळी पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी प्रामुख्याने उपस्थित होत्या. आजचा दिवस दोन्ही देशांसाठी ऐतिहासिक असाच आहे, असे ट्विट मोदी यांनी या करारानंतर केले आहे.
१९७४ च्या भारत-बांगलादेश भू-सीमा करारावर स्वाक्षर्‍या करण्यात आल्याने भारताच्या ताब्यात असलेली एकूण १७,१६०.६३ एकर जमीन बांगलादेशला मिळणार असून, बांगलादेशच्या ताब्यातील ७११०.०२ एकर जमीन भारताला मिळणार आहे. याशिवाय, ६.१ किलोमीटर लांबीची रेखांकित नसलेली सीमाही आता रेखांकित केली जाणार आहे. या करारासोबतच दोन्ही देशांमधील नागरिकांचा संपर्क वाढविणे आणि व्यापारी संबंध मजबूत करण्यासह एकूण १९ करारांवर स्वाक्षर्‍या करण्यात आल्या.
आता सीमेचे व्यवस्थापन करणे आणखी सोपे होणार आहे. सुरक्षा बळकट करण्यासोबतच मादक द्रव्य आणि नकली नोटांची तस्करीही रोखणे शक्य होणार आहे, असे भारताचे परराष्ट्र सचिव एस. जयशंकर यांनी सांगितले.
यानंतर आयोजित संयुक्त पत्रपरिषदेत नरेंद्र मोदी आणि शेख हसीना यांनी द्विपक्षीय संबंध आणखी मजबूत करण्यासोबतच नद्यांचा विकास करण्यावरही भर दिला. यावेळी दोन्ही देशांनी दहशतवाद आणि संगठित गुन्हेगारीचा संयुक्तपणे मुकाबला करण्यासाचा निर्धारही व्यक्त केला. नरेंद्र मोदी यांनी बांगलादेशातील ऊर्जासंकटावर मात करण्यासाठी ११०० मेगावॅट विजेचा पुरवठा करण्याची घोषणा केली.
कोलकाता-ढाका-आगरतळा बससेवा सुरू
भारत आणि बांगलादेशातील जनसंपर्क वाढविण्याच्या उद्देशाने नरेंद्र मोदी आणि शेख हसीना यांनी कोलकाता-ढाका-आगरतळा आणि ढाका-शिलॉंग-गुवाहाटी बससेवेलाही हिरवी झेंडी दाखविली. या बससेवेमुळे ईशान्येकडील तीन राज्यांशी पश्‍चिम बंगालचा संपर्क प्रस्थापित होणार आहे. बसला हिरवी झेंडी दाखविण्यापूर्वी मोदी आणि हसीना यांनी या दोन्ही बससेवांचे प्रतिकात्मक तिकीट एकमेकांना दिले.
साडी डिप्लोमसी
द्विपक्षीय संबंध आणखी मजबूत करण्याच्या उद्देशाने शेख हसीना यांनी पंतप्रधान मोदी यांना त्यांच्या आईसाठी खास जामदानी साडी भेट दिली. बांगलादेशात ढाकाई जामदानी साडी सर्वात महागडी भेट समजली जाते. बांगलादेशच्या भेटीवर येणार्‍या विदेशी पाहुण्यांना ती भेट देण्यात येते. विशेष म्हणजे, या साडीची निवड स्वत: हसीना यांनी केली आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=22718

Posted by on Jun 7 2015. Filed under आंतरराष्ट्रीय, आशिया, छायादालन, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in आंतरराष्ट्रीय, आशिया, छायादालन, ठळक बातम्या (1668 of 2483 articles)


पुणे, [६ जून] - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाने मार्च महिन्यात घेतलेल्या दहावीच्या निकालाची तारीख अखेर जाहीर झाली ...

×