Home » क्रीडा, छायादालन, ठळक बातम्या » ऑस्ट्रेलियाच जगज्जेता!

ऑस्ट्रेलियाच जगज्जेता!

=फॉकनर सामना, तर स्टार्क मालिकावीर=
worldcup15मेलबर्न, [२९ मार्च] – बांगलादेशविरुद्धच्या सामन्यावर निसर्गाने फिरविले पाणी, न्यूझीलंड संघाकडून साखळी फेरीत झालेला पराभव या सार्‍याचे उट्टे काढीत मायकेल क्लार्कच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलिया संघाने अखेर पुन्हा एकदा जगज्जेते होण्याचा मान पटकावला. विश्‍वचषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडचे आव्हान सात गडी आणि १०१ चेंडू राखून लीलया मोडून काढत ऑस्ट्रेलियाने चषकावर पाचव्यांदा आपले नाव कोरण्याचा ऐतिहासिक पराक्रम केला. ऑस्ट्रेलियाचे गोलंदाज मिचेल स्टार्क आणि जेम्स फॉकनर अनुक्रमे स्पर्धा व सामनावीर पुरस्काराचे मानकरी ठरले.
ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मायकेल क्लार्क, स्टिव्हन स्मिथ यांची अर्धशतकी फलंदाजी, न्यूझीलंडच्या ग्रॅण्ट इलियटने केलेला निकराचा प्रयत्न, जॉन्सन व फॉकनर या ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी टिपलेले प्रत्येकी तीन बळी, तसेच ऑस्ट्रेलियाच्या एका फलंदाजासह एकूण सहा फलंदाजांना धावांचे खातेही उघडता न येणे, ही या महत्त्वाच्या अंतिम सामन्यातील काही प्रमुख वैशिष्ट्ये ठरली. भारताप्रमाणेच ऑस्ट्रेलियाने पहिल्यांदा मायदेशात चषक पटकावण्याची किमया करून दाखविली आहे.
भव्यदिव्य मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर झालेल्या या निर्णायक सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. कर्णधार मॅकल्लम (शून्यावर बाद) याने घेतला हा निर्णय तो स्वत: आणि त्याचे फलंदाज सार्थकी लावू शकले नाही आणि त्यांचा डाव ४५ षटकांत १८३ धावांवर आटोपला. १८४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने ३३.१ षटकांत आपले फक्त तीनच फलंदाज गमावून व १८६ धावा काढून विजयाचा जल्लोष केला. ऑस्ट्रेलियाला मिळालेल्या सहज विजयामुळे या महामुकाबल्याची हवाच निघून गेली आणि सामना एकतर्फी निकाली लागला.
क्लार्क आणि स्टिव्हन स्मिथ यांनी तिसर्‍या गड्यासाठी १८.५ षटकांत केलेल्या ११२ धावांच्या भक्कम भागीदारीमुळेच ऑस्ट्रेलियाला हा विजय सहज मिळविता आला. स्मिथने त्याआधी पॉवरप्लेनंतर सलामीवीर वॉर्नरसोबत दुसर्‍या गड्यासाठी १०.४ षटकात ६१ धावा जोडून विजयाचा पाया मजबूत केला होता.
ऑस्ट्रेलियाचा कर्णधार क्लार्कने आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळताना चांगली फलंदाजी केली. त्याने ७२ चेंडू खेळून काढीत १० चौकार आणि एक षटकाराच्या साह्याने ७४ धावा केल्या आणि कर्णधाराला साजेसा डाव खेळून आपल्या संघाच्या विजयात मोठा वाटा उचलला. अंतिम सामन्यात आपले अर्धशतक साजरे करताना स्मिथने ७१ चेंडूंमध्ये ५६ धावा केल्या. यात तीन चौकारांचा समावेश होता. त्याआधी सलामीवर फिंच शून्यावर बाद झाला असताना वॉर्नरने स्मिथच्या साथीने संयमी फलंदाजी करीत ४६ चेंडूंमध्ये ४५ धावा ठोकल्या. यात सात चौकार होते. फलंदाजीप्रमाणेच न्यूझीलंडची गोलंदाजीही आज निष्प्रभ ठरली. हेन्रीने ४६ धावांत दोघांना टिपले, तर बोल्टने ४० धावा देत एकाला बाद केले.
त्याआधी स्टार्क (२-२०), फॉकनर (३-३६), जॉन्सन (३-३०) व मॅक्सवेल (१-३७) यांच्या गोलंदाजीपुढे न्यूझीलंडचा डाव गडगडला. न्यूझीलंडच्या अकरापैकी पाच फलंदाजांना हा जागतिक दर्जाचा अंतिम सामना असताना भोपळाही फोडता आला नाही. रॉस टेलर व ग्रॅण्ट इलियट यांनी २२.५ षटकांमध्ये चौथ्या गड्यासाठी केलेल्या १११ धावांची भागीमुळे न्यूझीलंडला सन्मानजनक धावसंख्या उभी करता आली. त्याआधी गप्टिल (१५) व विल्यम्सन (१२) यांनी दुसर्‍या गड्यासाठी १०.३ षटकांत ३२ धावांची भागीदारी केली होती. टेलरने आज ४० (७२ चेंडू, २ चौकार), तर इलियटने ८३ (८२ चेंडू, ७ चौकार, एक षटकार) धावांचे योगदान दिले.
मैदान मोठे होते म्हणून की काय या अंतिम सामन्यात फक्त चारच षटकार ठोकले गेले. त्यातही यजमान ऑस्ट्रेलियाच्या एका फलंदाजाला एकच षटकार ठोकण्यात यश आले. चौकार मात्र भरपूर लागले. न्यूझीलंडच्या डावात फक्त १२ आणि ऑस्ट्रेलियाच्या डावात २० चौकारांची नोंद झाली.
धावफलक
न्यूझीलंड : ४५ षटकांत सर्वबाद १८३.
– गप्टिल त्रि. गो. मॅक्सवेल १५, मॅकल्लम त्रि. गो. स्टार्क ०, विल्यम्सन झे. व गो. जॉन्सन १२, टेलर झे. हॅडिन गो. फॉकनर ४०, इलियट झे. हॅडिन गो. फॉकनर ८३, ऍण्डरसन त्रि. गो. फॉकनर ०, रोंची झे. क्लार्क गो. स्टार्क ०, व्हेट्टोरी त्रि. गो. जॉन्सन ९, साऊदी धावबाद ११, हेन्री झे. स्टार्क गो. जॉन्सन ०, बोल्ट नाबाद ०, अतिरिक्त १३.
– गडी बाद क्रम : १-१, २-३३, ३-३९, ४-१५०, ५-१५०, ६-१५१, ७-१६७, ८-१७१, ९-१८२, १०-१८३.
– गोलंदाजी : स्टार्क ८-०-२०-२, हेझलवूड ८-२-३०-०, जॉन्सन ९-०-३०-३, मॅक्सवेल ७-०-३७-१, फॉकनर ९-१-३६-३, वॉटसन ४-०-२३-०.
ऑस्ट्रेलिया : ३३.१ षटकांमध्ये ३ बाद १८६.
– वॉर्नर झे. इलियट गो. हेन्री ४५, फिंच झे. व गो. बोल्ट ०, स्मिथ नाबाद ५६, क्लार्क त्रि. गो. हेन्री ७४, वॉटसन नाबाद २, अतिरिक्त ९.
– गडी बाद क्रम : १-२, २-६३, ३-१७५.
– गोलंदाजी : साऊदी ८-०-६५-०, बोल्ट १०-०-४०-१, व्हेट्टोरी ५-०-२५-०, हेन्री ९.१-०-४६-२, ऍण्डरसन १-०-७-०.
चाहत्यांच्या आभारासाठी आज विशेष कार्यक्रम
विश्‍वचषक स्पर्धेतील ऑस्ट्रेलियाच्या विजयासाठी भरपूर समर्थन देणार्‍या चाहत्यांचे आभार मानण्यासाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने उद्या सोमवारी शहरातील फेडरेशन चौक येथे एका विशेष समारंभाचे आयोजन करण्याची घोषणा केली आहे. विजेत्या संघातील खेळाडू चषकसह तेथे उपस्थित राहणार आहेत. यावेळी कर्णधार मायकेल क्लार्क आणि प्रशिक्षक डॅरेन लेहमन स्पर्धेतील आपले अनुभव कथन करणार आहेत.
ऑस्ट्रेलियाने आतापर्यंत पटकाविलेल्या चषकाची थोडक्यात माहिती अशी –
प्रतिस्पर्धी विजय वर्षे स्थळ
इंग्लंड ७ धावांनी १९८७ कोलकाता
पाकिस्तान ८ गड्यांनी १९९९ लंडन
भारत १२५ धावांनी २००३ जोहान्सबर्ग
श्रीलंका ५३ धावांनी २००७ ब्रिजटाऊन
न्यूझीलंड ७ गड्यांनी २०१५ मेलबर्न
(ऑस्ट्रेलियाने १९७५, १९९६ साली उपविजेतेपद पटकाविले आहे)

Short URL: https://vrittabharati.in/?p=21831

Posted by on Mar 30 2015. Filed under क्रीडा, छायादालन, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in क्रीडा, छायादालन, ठळक बातम्या (1836 of 2479 articles)


=नवा व्हिडीओ जारी= नवी दिल्ली, [२९ मार्च] - स्टिंगच्या माध्यमातून इतर राजकीय पक्षांची शिकार करणार्‍या आम आदमी पार्टीचे नेते अरविंद ...

×