ओबामांचे शाही स्वागत

  • शिष्टाचार बाजूला ठेवून पंतप्रधानांची विमानतळावर हजेरी
  • आजच्या प्रजासत्ताक दिनाचे मुख्य अतिथी

Prime Minister receives President Obama on his arrival in New Delhiनवी दिल्ली, [२५ जानेवारी] – उद्या सोमवारी साजर्‍या होणार्‍या भारतीय प्रजासत्ताक दिनाचे मुख्य अतिथी असलेले अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांचे आज रविवारी येथील पालम विमानतळावर आगमन झाल्यानंतर शिष्टाचाराला फाटा देत स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओबामा यांना आलिंगन देऊन त्यांचे शाही स्वागत केले.
आपल्या एअरफोर्स वन या विशेष विमानाने सकाळी ९ वाजून ४० मिनिटांनी ओबामा यांचे पत्नी मिशेल यांच्यासह आगमन झाले. यावेळी स्वत: मोदी त्यांच्या स्वागतासाठी सामोरे गेले. हस्तांदोलन केल्यानंतर मोदी यांनी ओबामा यांना आलिंगन दिले. यानंतर, आपल्या विशेष ‘बिस्ट’ कारमधून अमेरिकन दाम्पत्य आयटीसी मौर्या हॉटेलकडे रवाना झाले. याच आलिशान हॉटेलमध्ये ओबामा दाम्पत्याचा तीन दिवस मुक्काम राहणार आहे. यापूर्वी २०१० मध्ये ओबामा भारत भेटीवर आले असता, तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग आणि त्यांची पत्नी गुरशरण कौर यांनी ओबामा आणि त्यांची पत्नी मिशेल यांचे स्वत: विमानतळावर जाऊन स्वागत केले होते. उद्या सोमवारच्या प्रजासत्ताक दिन सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून निमंत्रित करण्यात आलेले ओबामा हे पहिलेच अमेरिकन राष्ट्राध्यक्ष ठरले आहेत.
२१ तोफांची सलामी
आयटीसी मौर्य हॉटेलातून ओबामा यांचा ताफा राष्ट्रपती भवनात आला. तिथे ओबामा यांना २१ तोफांच्या सलामीसह मानवंदना देण्यात आली. ओबामा यांचे राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जोरदार स्वागत केले. ओबामा यांना मानवंदना देणार्‍या पथकाचे नेतृत्व विंग कमांडर पूजा ठाकूर यांनी केले. यानंतर दोन्ही देशांच्या राष्ट्रगीताची धून वाजविण्यात आली. यावेळी राष्ट्रपती आणि पंतप्रधानांसोबतच परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज, अर्थमंत्री अरुण जेटली, गृहमंत्री राजनाथसिंह, संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर, नगर विकास मंत्री एम. व्यंकय्या नायडू, ऊर्जा मंत्री पीयुष गोयल आणि दिल्लीचे नायब राज्यपाल नजीब जंग उपस्थित होते. स्वत: मुखर्जी यांनी केंद्रीय मंत्री व अन्य मान्यवरांची ओळख ओबामा यांना करून दिली. मौर्या हॉटेल ते राष्ट्रपती भवन या संपूर्ण मार्गात कडेकोट सुरक्षा ठेवण्यात आली होती. मार्गावरील उंच इमारतींवरही सशस्त्र पोलिस व जवान तैनात होते. बराक ओबामा यांचा अध्यक्षपदाच्या कारकीर्दीतील हा दुसरा भारत दौरा आहे. त्यांच्यासोबत अमेरिकेतील आघाडीचे उद्योगपती आणि मंत्रीही आले आहेत.
हैदराबाद हाऊसमध्ये चर्चा
राष्ट्रपती भवनातील मानवंदनेनंतर बराक ओबामा आणि पंतप्रधान मोदी यांच्यात हैदराबाद हाऊस येथे नागरी अणुऊर्जा करार आणि दोन्ही देशांमधील संरक्षण, व्यापार, वाणिज्य तसेच वातावरणातील बदल यासह विविध मुद्यांवर चर्चा झाली. सुमारे तास भर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा सुरू होती.
ओबामा-मोदींची ‘चाय पे चर्चा’
या बैठकीनंतर ओबामा आणि नरेंद्र मोदी दोघांनीही हैदराबाद हाऊसच्या हिरवळीवर फेरफटका मारला. काही मिनिटे दोन्ही नेत्यांनी पायी चालतच चर्चा केली. यानंतर मोदी यांनी आपल्या हाताने ओबामा यांच्याकरिता आणि स्वत:साठी चहा तयार केला. दोघांनीही चहाचा आस्वाद घेत सुमारे १८ मिनिटे एकांतात पुन्हा चर्चा केली. तथापि, उभय नेत्यांमधील चर्चेचा मजकूर मात्र समजू शकला नाही.

Short URL: https://vrittabharati.in/?p=20055

Posted by on Jan 25 2015. Filed under छायादालन, ठळक बातम्या, परराष्ट्र, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in छायादालन, ठळक बातम्या, परराष्ट्र, राष्ट्रीय (2187 of 2477 articles)


नवी दिल्ली, [२३ जानेवारी] - काही माजी पंतप्रधानांनी राष्ट्रीय सुरक्षेसोबत तडजोड केली होती, असा स्पष्ट आरोप संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर ...

×