Home » छायादालन, ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » ओबामांनी पाहिले भारताचे सामर्थ्य

ओबामांनी पाहिले भारताचे सामर्थ्य

=राजपथवर घडले देशाच्या वैविधतेचे दर्शन=
President, Pranab Mukherjee, Prime Minister, Narendra Modi and the Chief Guest US President Barack Obama and defence minister Manohar Parrikar witnessing the 66th Republic Day Parade 2015, in New Delhiनवी दिल्ली, [२७ जानेवारी] – भारताचे लष्करी सामर्थ्य आणि वैविध्यतेने नटलेल्या भारतीय संस्कृतीचे दर्शन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी ‘याची देही याची डोळा’ घेतले. देशाच्या ६६ व्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख अतिथी असलेले बराक ओबामा भारताच्या या वैविध्यपूर्ण संस्कृतीने भारावून गेले होते.
राजपथवर आयोजित प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य सोहळ्यात राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, उपराष्ट्रपती हमीद अन्सारी, पंतप्रधान नरेंद्र मोदी, मिशेल ओबामा, कॉंगे्रस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासोबतच मोदी मंत्रिमंडळातील अनेक मंत्री उपस्थित होते.
राजपथवरील संचलनात लष्कर आणि नौदलातील शस्त्र व अस्त्र तसेच लढाऊ विमानांचे दिमाखदार सादरीकरण करण्यात आले. विविध राज्यांच्या चित्ररथांनी उपस्थितांची मने जिंकली. यानंतर सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) जवानांनी दुचाकीवरून चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर केली. हेलिकॉप्टर व लढाऊ विमानांच्या प्रात्यक्षिकांनी या शानदार सोहळ्याची सांगता केली.
महिला सशक्तीकरण
महिला सशक्तीकरण हा या वर्षीच्या प्रजासत्ताक दिनाचा मुख्य विषय होता. राजपथवर प्रथमच संचलन करणार्‍या तिन्ही सैन्य दलांतील महिलांच्या तुकड्या उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होत्या. महिलांच्या तुकडीच्या संचलनाची कल्पना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीच असून, महिला शक्तीवर लक्ष केंद्रित करण्यासाठीच त्यांनी हे धोरण तयार केले होते.
राजपथवर १६ राज्यांच्या चित्ररथांनी आपापल्या राज्यांच्या सांस्कृतिक वैभवाचे दर्शन घडविले. यात सहभागी महाराष्ट्राच्या चित्ररथात पंढरपूरच्या वारीचा देखावा करण्यात आला होता. सोबतच, देशाच्या विविध क्षेत्रातील माहिती देणारे नऊ केंद्रीय मंत्रालयांचे चित्ररथही यंदाच्या परेडमध्ये सहभागी झाले होते. पंतप्रधान मोदी यांची महत्त्वाकांक्षी जन धन योजना, गंगा शुद्धीकरण, मेक इन इंडिया आणि स्वच्छ भारत अभियानाची छाप बर्‍याच चित्ररथांवर होती.
स्वदेशी बनावटीचे जमिनीवरून आकाशात मारा करणारे मध्यम टप्प्याचे ‘आकाश’ क्षेपणास्त्र आणि स्वदेशी बनावटीचे रडार हे यंदाचे आकर्षण होते. संचलनात प्रथमच समुद्रात टेहळणी करणारे आणि पाणबुडीचा अचूक वेध घेणारे ‘पी-८ आय’ हे विमान आणि ‘मिग २९ के’ हे लढाऊ विमान सहभागी होते. याशिवाय, क्षेपणास्त्र डागण्याची क्षमता असलेला ‘टी-९०’ हा भीष्म रणगाडा, पायदळासाठी उपयुक्त असलेले ‘सारथ’ हे वाहन, पिनाक क्षेपणास्त्र प्रणाली, ब्राह्मोस हेदेखील प्रजासत्ताक दिनाचे आकर्षक होते.
या प्रजासत्ताक दिनाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, गुजरातच्या स्नेहा शेखावतने भारतीय हवाई दलाच्या वतीने बराक ओबामा यांना मानवंदना दिली. तब्बल २०० महिला अधिकार्‍यांमधून त्यांची निवड करण्यात आली होती. राजपथवर आलेल्या गुजरातच्या चित्ररथावर स्टॅच्यू ऑफ युनिटीची प्रतिकृती सादर केली होती. गुजरात सरकारने तयार केलेल्या चित्ररथाची मुख्य संकल्पना ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ ही होती.
प्रजाकत्ताक दिनी प्रथमच घडलेल्या घटना
६६ व्या प्रजासत्ताक दिनी काही घटना प्रथमच घडल्या. या घटनांचा उल्लेख खालीलप्रमाणे-
१) लष्कर, हवाईदल आणि नौदल महिलांनी केलेले पथसंचलन
२) अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा गणतंत्र दिनाचे प्रमुख पाहुणे
३) नुक तेच संपादन केलेले लांब टप्प्याचे क्षेपणास्त्र, पाणबुडीचा अचूक वेध घेणारे ‘पी-८१’ विमान आणि मिग-२९ हे लढाऊ विमान
४) राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष बराक ओबामा वेगवेगळ्या गाड्यांच्या ताफ्यातून कार्यक्र माला पोहोचले
५) नक्षलवाद्यांचा सामना करणार्‍या केंद्रीय राखीव पोलिस दलाने (सीआरपीएफ) प्रथमच पथसंचलनात भाग घेतला

Short URL: https://vrittabharati.in/?p=20113

Posted by on Jan 28 2015. Filed under छायादालन, ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in छायादालन, ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (2167 of 2477 articles)


नवी दिल्ली, [२७ जानेवारी] - प्रजासत्ताक दिनाचा शानदार समारंभ आटोपताच राजधानी दिल्लीला विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. भाजपाच्या मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार ...

×