Home » गोवा, छायादालन, ठळक बातम्या, राज्य » गोव्यात भाजपाला स्पष्ट बहुमत : गडकरी

गोव्यात भाजपाला स्पष्ट बहुमत : गडकरी

=स्थिर आणि विकासाभिमुख सरकारला जनतेची पसंती,
तभा वृत्तसेवा
नवी दिल्ली, २ फेब्रुवारी –
जनतेला स्थिर आणि विकासाभिुमख सरकार हवे असल्यामुळे गोव्यात भाजपाला स्पष्ट बहुमत मिळेल, असा विश्‍वास केंद्रीय भूपृष्ठ परिवहन मंत्री आणि गोवा भाजपाचे प्रभारी नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.
४० सदस्यीय गोवा विधानसभेसाठी ४ फेब्रुवारीला मतदान होत आहे. गोवा विधानसभा निवडणुकीचा प्रचार संपण्यापूर्वी तरुण भारतशी बोलताना गडकरी म्हणाले की, स्थिर सरकार आणि विकास या मुद्यावर भाजपा गोव्यातील निवडणूक लढवत आहे. राज्यात भाजपाचे सरकार येण्यापूर्वी अस्थिर राजकीय परिस्थितीचा अनुभव गोव्यातील जनतेने घेतला होता. त्यामुळे २०१२ मध्ये राज्यातील जनतेने स्थिर सरकारसाठी भाजपाला कौल दिला होता. सरकार स्थिर असेल तरच राज्याचा विकास होऊ शकतो, याची जनतेची खात्री पटली आहे.
राज्य सरकारसोबत केंद्र सरकारनेही गोव्याच्या विकासात आपले योगदान दिले आहे. राज्यातील राष्ट्रीय महामार्गाची लांबी आमच्या कार्यकाळात दुपटीपेक्षा जास्त झाली आहे, याकडे गडकरी यांनी लक्ष वेधले.
मनोहर पर्रीकर यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात गोव्याचा जेवढा विकास झाला, तेवढा याआधी कधीच झाला नाही. त्यांच्यानंतर मुख्यमंत्री झालेले लक्ष्मीकांत पारसेकर यांनी विकासाची ही प्रक्रिया पुढे नेली. विकास काय असतो, याचा अनुभव गोव्यातील जनतेने भाजपा सरकारच्या कार्यकाळात घेतला, असे स्पष्ट करत गडकरी यांनी गोव्याच्या विकासासाठी राज्यातील जनता यावेळी पुन्हा भाजपालाच स्पष्ट बहुमतासह निवडून देईल, असा विश्‍वास व्यक्त केला.
राज्यात भाजपाविरुद्ध सर्व पक्ष एकवटले असले तरी त्याचा निवडणुकीवर कोणताही परिणाम होणार नाही, असे स्पष्ट करत गडकरी म्हणाले की, यावेळी भाजपाला २०१२ च्या निवडणुकीपेक्षाही जास्त जागा मिळतील. गोव्यात भाजपाच्या प्रचारासाठी फिरतांना लोकांचा कल आमच्या लक्षात आला आहे. राज्यातील जनता कोणाच्याही आणि कोणत्याही अपप्रचाराला बळी पडणार नाही. भाजपाने आपल्या निवडणूक जाहीरनाम्यातून गोव्याच्या विकासाबाबातची आपली भूमिका स्पष्ट केली आहे, असे ते म्हणाले.
सुभाष वेलिंगकर यांचा गोवा सुरक्षा मंच निवडणुकीच्या रिंगणात असला तरी त्याचा भाजपावर कोणताही परिणाम होणार नाही, असे स्पष्ट करत गडकरी म्हणाले की, संघ स्वयंसेवक कोणा व्यक्तीच्या अहंकारासाठी नाही, तर संघटना आणि विचारधारेसाठी काम करत असतात. त्यांच्यासाठी व्यक्तीच्या अहंकारापेक्षा सिद्धांताला जास्त महत्त्व असते.
गोव्यात भाजपाने मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर केला नाही, तर निवडणुकीनंतर नवनिर्वाचित आमदार आपल्या नेत्याची निवड करतील, असे एका प्रश्‍नावर स्पष्ट करत गडकरी म्हणाले की, गोव्याचा मुख्यमंत्री हा स्थानिक आमदारांतून राहू शकतो, तसेच बाहेरचा म्हणजे दिल्लीतलाही कोणी राहू शकतो. मनोहर पर्रीकर यांनी मुख्यमंत्री व्हावे, अशी गोव्याच्या जनतेची तसेच कार्यकर्त्यांचीही इच्छा आहे, पण याबाबतचा अंतिम निर्णय नवनिर्वाचित आमदारांचा कल लक्षात घेऊन भाजपा संसदीय मंडळ करेल.

Short URL: https://vrittabharati.in/?p=29406

Posted by on Feb 3 2017. Filed under गोवा, छायादालन, ठळक बातम्या, राज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in गोवा, छायादालन, ठळक बातम्या, राज्य (68 of 2477 articles)


►सरकार करणार कायद्यात दुरुस्ती, वृत्तसंस्था नवी दिल्ली, २ फेब्रुवारी - कोणत्याही व्यक्तीकडून केवळ दोन हजार रुपयांचीच रोख देणगी राजकीय पक्ष ...

×