Home » छायादालन, ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय » जनसभा लोकसभेपेक्षाही मोठी: मोदी

जनसभा लोकसभेपेक्षाही मोठी: मोदी

  • ४० खासदारांनी रोखला देशाचा विकास
  • कॉंगे्रसला जनता माफ करणार नाही
  • पंतप्रधानांचा जोरदार प्रहार

pm-modi-in-chandigarhचंदीगड, [११ सप्टेंबर] – सत्ता गेल्याचे दु:ख पचवू न शकल्याने कॉंग्रेसच्या ४० खासदारांनी संसदेची कोंडी केली आहे. देशाचा विकास व्हावा, अशी संसदेतील ४०० खासदारांची प्रामाणिक इच्छा असताना, या ४० खासदारांनी मात्र देश विकासाचा मार्ग रोखून धरला आहे. त्यामुळे मी आपल्या भावना आता जनसभेपुढे मांडत आहे. कारण, जनसभा ही लोकसभेपेक्षाही मोठी असते, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शुक्रवारी कॉंगे्रसवर प्रखर हल्ला चढविला.
येथे आयोजित विशाल जनसभेला संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले की, देशातील जनतेने पूर्ण बहुमताने जनादेश दिलेल्या सरकारचा आवाज कॉंगे्रसच्या ४० सदस्यांनी अभूतपूर्व अशा गोंधळात दाबून ठेवला. म्हणूनच, लोकसभेपेक्षाही मोठी असलेल्या जनसभेपुढे मी आलो आहे. देशात लोकशाहीविषयी जागरुकता निर्माण करण्याची वेळ आता आली आहे. संसदेत गोंधळ न घालता प्रश्‍न विचारून आणि चर्चेत सहभागी होऊन लोककल्याणाचे कार्य करण्यास आता तुम्हीच आपल्या लोकप्रतिनिधींना सांगा.
केंद्रातील सत्ता गेल्याचे दु:ख कॉंग्रेस पक्ष पचवू शकला नाही. पण, त्यापेक्षाही मोठे दु:ख राहुल गांधी पंतप्रधान होऊ न शकल्याने सोनिया गांधी यांना झाले आहे. सत्ता गेल्यापासूनच या पक्षाचे नकारात्मक राजकारण सुरू झाले आहे. असे राजकारण करणार्‍यांना जनता कधीच माफ करणार नाही. जनतेने त्यांना आता केवळ ४० वर आणून ठेवले आहे. पुढे अशी वेळ येईल की, १२५ वर्ष जुन्या कॉंगे्रसचा शोध घेण्यासाठी पुरातत्त्व विभागाची मदत घ्यावी लागेल, असा टोलाही नरेंद्र मोदी यांनी हाणला.
गेल्या ४२ वर्षांपासून प्रलंबित असलेली माजी सैनिकांची ‘वन रँक वन पेन्शन’ योजना आपल्या सरकारने अवघ्या १४ महिन्यांतच लागू केली. पूर्वीच्या संपुआ सरकारला माजी सैनिकांच्या भावना कधीच कळल्या नाही. म्हणूनच या सरकारने केवळ ५०० कोटी रुपयांची तरतूद करून ठेवली होती. आम्ही योजना समजून घेतली, त्याचे तिजोरीवर पडणारे परिणाम जाणले. वर्षाकाठी आठ ते दहा हजार कोटी रुपये खर्च असणारी ही योजना आहे. आम्ही ती अंमलात आणली असली, त्यासाठी सरकारपेक्षा या देशातील सर्वसामान्य जनतेला धन्यवाद द्या. कारण, इतक्या मोठ्या निधीची तरतूद त्यांनीच आपल्या कष्टाच्या पैशातून केली आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दीक्षांत सोहळा ‘शिक्षांत’ व्हायला नको
तत्पूर्वी, चंदीगड येथील पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल एज्युकेशन ऍण्ड रिसर्चच्या ३४ व्या दीक्षांत सोहळ्यात बोलताना पंतप्रधानांनी दीक्षांत सोहळ्याचा ‘शिक्षांत’ सोहळा होणार नाही, याची काळजी घेण्याचा सल्ला विद्यार्थ्यांना दिला. आजारपणावर उपचार करण्याचा काळ आता राहिला नाही. तर, चांगले आरोग्य कसे मिळेल, यावर भर देण्याचा काळ आला आहे. समाजाच्या सुदृढ आरोग्यासाठी आपल्याला कार्य करायचे आहे. त्यामुळे आजारांवर कसे प्रतिबंध घालता येईल, याचा विचार करा, असा सल्लाही त्यांनी दिला.
विमानतळाच्या नव्या टर्मिनलचे उद्‌घाटन
पंतप्रधान मोदी यांनी चंदीगड विमानतळ संकुलातील नव्या आंतरराष्ट्रीय टर्मिनलचे उद्‌घाटनही केले. देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय हवाई सेवेची सुविधा या नव्या टर्मिनलमुळे प्राप्त झाली आहे. पंजाब, हरयाणा आणि हिमाचलप्रदेशच्या आर्थिक आणि औद्योगिक विकासात या अत्याधुनिक सोयींनी युक्त विमानतळाचे योगदान फार मोठे राहणार आहे, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.
असुविधेबद्दल व्यक्त केला खेद
आपल्या भेटीच्या काळात काही भागातील शाळा बंद ठेवण्यात आल्या. नागरिकांचीही बरीच गैरसोय झाली. यासाठी मी खेद व्यक्त करतो. असे पुन्हा पुन्हा घडायला नको, यासाठी काळजी घेण्याचे निर्देश मी दिले आहेत. शाळा बंद ठेवण्याचे काहीच कारण नसताना, तसे आदेश का देण्यात आले, यासाठी मी चौकशीचे आदेश दिले आहेत. लवकरच जबाबदारी निश्‍चित केली जाईल आणि भविष्यात अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी योग्य पावलेही उचलली जातील, असे पंतप्रधान म्हणाले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=23774

Posted by on Sep 11 2015. Filed under छायादालन, ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in छायादालन, ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय (1487 of 2477 articles)


=साक्षीदाराने कोर्टात केली ओळखपरेड= नवी दिल्ली, [११ सप्टेंबर] - १९८४ मध्ये इंदिरा गांधी यांची हत्या झाल्यानंतर देशात उसळलेल्या दंगलींच्या काळात ...

×