Home » छायादालन, ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » जवानांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही

जवानांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही

  • जाहीर सभेत पंतप्रधानांची ग्वाही
  • दहशतवादापुढे कधीच झुकणार नाही
  • •आधी आपले घर नीट सांभाळा
  • •पाकी नेते दहशतवाद्यांचे भाषण वाचतात
  • •पाकमधील जनताच सत्ताधार्‍यांना जाब विचारेल

modi-kozhikodeकोझिकोड, [२४ सप्टेंबर] – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शनिवारी कोझिकोड येथील जाहीर सभेत बोलताना पाकिस्तान आणि त्या देशाच्या आश्रयात असलेल्या दहशतवादी गटांना गंभीर परिणामांचा इशारा दिला. एका देशामुळे संपूर्ण आशिया रक्तरंजित झाला आहे. एकविसावे शतक आशियाचे असावे, असे या देशाला मुळीच वाटत नाही, असा प्रखर हल्ला चढवताना, उरी येथील पाकप्रायोजित दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात आमचे १८ जवान शहीद झाले. जवानांचे बलिदान कदापि व्यर्थ जाणार नाही आणि आम्ही हा हल्ला कधीच विसरणार नाही, असा स्पष्ट इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला.
भारत दहशतवादापुढे कधीच झुकला नाही आणि झुकणारही नाही. जे बलुचिस्तान, गिलगिट आणि पाकव्याप्त काश्मीर सांभाळू शकत नाहीत, ते काश्मीरवर दावा करीत आहेत, असा चिमटा काढताना आधी आपल्या घरातील व्यवस्था नीट करा, नंतर जम्मू-काश्मीरची चिंता करा, असा टोलाही पंतप्रधानांनी लगावला.
भाजपा राष्ट्रीय परिषद अधिवेशनानिमित्त कोझिकोड येथील समुद्र किनार्‍यावर आयोजित विशाल जाहीर सभेत पंतप्रधान मोदी बोलत होते. यावेळी व्यासपीठावर भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह, माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी, भाजपाचे ज्येष्ठ नेते डॉ. मुरली मनोहर जोशी, केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह, अर्थमंत्री अरुण जेटली, भूपृष्ठ परिवहनमंत्री नितीन गडकरी, शहरी विकासमंत्री व्यंकय्या नायडू, संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर, केरळ प्रदेश भाजपा अध्यक्ष के. राजशेखरन् यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
मोदी यांनी आपल्या भाषणात नाव न घेता पाकिस्तानवर जोरदार हल्ला चढवला. उरी येथील दहशतवादी हल्ल्याच्या घटनेच्या पार्श्‍वभूमीवर कोझिकोड येथील जाहीर सभेत मोदी काय बोलतात, पाकिस्तानबाबत काय भूमिका घेतात, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते.
आपल्या तासाभराच्या भाषणात मोदी यांनी पाकिस्तान दहशतवादी कारवायांना देत असलेला पाठिंबा, तसेच दहशतवादी कारवायातील पाकिस्तानच्या सक्रिय सहभागाचा स्पष्ट उल्लेख करताना पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आणला. दहशतवाद हा मानवतेचा शत्रू आहे, त्यामुळे दहशतवादाविरुद्धच्या लढाईत संपूर्ण जगाने एक व्हावे, असे आवाहन मोदी यांनी केले.
भारत संपूर्ण जगाला सॉफ्टवेअरचा पुरवठा करतो, तर दुसरीकडे पाकिस्तान दहशतवाद निर्यात करणारा देश असल्याचा आरोप करताना दहशतवादाच्या मुद्यावर पाकिस्तानला संपूर्ण जगात एकटे पाडण्याचा इशाराही मोदी यांनी दिला.
पाकिस्तानच्या आतापर्यंतच्या राज्यकर्त्यांनी तेथील जनतेची सातत्याने दिशाभूल केली, पण आपल्या राज्यकर्त्यांचे आणि सरकारचे खरे रूप पाकिस्तानी जनतेच्या लक्षात आले आहे, त्यामुळे दहशतवादाविरुद्धच्या लढाईत पाकिस्तानची जनता आपल्याच सरकारविरुद्ध रस्त्यावर उतरेल, असे मोदी म्हणाले.
दहशतवाद हा मानवतेचा खरा शत्रू आहे, मात्र आपला शेजारी देश संपूर्ण जगात दहशतवाद पसरवत आहे, याकडे लक्ष वेधत मोदी म्हणाले की, जगात घडलेल्या विविध दहशतवादी घटनांत सहभागी असलेले लोक एक तर पाकिस्तानातील होते, वा त्यांनी दहशतवादी हल्ल्याच्या घटनेनंतर पाकिस्तानात आश्रय घेतला किंवा त्यांना पाकिस्तानने आपल्या देशात आश्रय दिला. पाकिस्तान आज जगात दहशतवाद्यांचे आश्रयस्थान झाले आहे.
२१ व्या शतकात आशिया खंडासमोर जगाचे नेतृत्व करण्याची चांगली संधी होती, मात्र या खंडातील एका देशाने दहशतवाद संपूर्ण जगात पसरवला. या दहशतवादाने जगाला आपल्या कवेत घेतले, निर्दोष आणि निष्पाप लोकांचा दहशतवादाने बळी घेतला, संपूर्ण जगाला रक्तरंजित केले, असा आरोप मोदी यांनी केला. जगात जिथेकुठे दहशतवादाच्या घटना घडतात, तिथे एकाच देशाला गुन्हेगार ठरवले जाते, आज पाकिस्तान संपूर्ण जगात दहशतवादाची निर्यात करत आहे, अशा प्रखर शब्दात मोदी यांनी पाकवर हल्ला चढविला.
दहशतवाद्यांच्या नेत्यांनी लिहिलेली भाषणे पाकिस्तानी राज्यकर्ते वाचत आहेत, त्यांच्या इशार्‍यावर नाचत आहेत, असा आरोप करताना मोदी म्हणाले की, पाकिस्तानने आतापर्यंत भारतात घुसखोरी, तसेच दहशतवादी कारवायांचा १७ वेळा प्रयत्न केला. यातील एका घटनेत आपल्या १८ लष्करी जवानांचा बळी गेला. पाकिस्तानचे हे १७ प्रयत्नही यशस्वी झाले असते, तर किती नुकसान झाले असते, याची कल्पनाही करवत नाही.
भारतीय लष्कर तसेच अन्य सुरक्षा दलांनी पाकिस्तानचे हे घातपाती मनसुबे हाणून पाडले, ११० अतिरेक्यांना यमसदनी पाठवले, याकडे लक्ष वेधत मोदी म्हणाले की, लष्कर आणि अन्य सुरक्षा यंत्रणांनी प्राणाचे बलिदान देत देशाला आणि देशातील नागरिकांना सुरक्षित ठेवले. त्यामुळे त्यांचा हा पराक्रम आणि शौर्याचा मला अभिमान वाटतो, गर्व वाटतो. देशातील १२५ कोटी लोकांच्या मनोबलामुळेच आपली सुरक्षा दले हा पराक्रम करू शकली. देशातील लोकांचे हे मनोबलच आपल्या लष्कराचे आणि सुरक्षा दलांचे खरे सामर्थ्य आहे.
भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही देश एकाच वेळी स्वतंत्र झाले, पण या काळात भारताने जेवढी प्रगती केली, त्या तुलनेत पाकिस्तान कुठेच दिसत नाही, असे मोदी म्हणाले.
…अन् गोष्टी काश्मीरच्या
हिंदुस्थानशी हजारो वर्ष लढाईची भाषा करणारे काळाच्या ओघात नष्ट झाले, याकडे लक्ष वेधत मोदी म्हणाले की, पाकिस्तान आपल्या ताब्यातील पाकव्याप्त काश्मीर सांभाळू शकत नाही आणि आमच्या काश्मीरच्या गोष्टी करतो. पाकिस्तानला आपल्या ताब्यातील सिंध, गिलगिट, पख्तुनी, बलुचिस्तान हे प्रदेश सांभाळता आले नाहीत. पूर्व पाकिस्तानही न सांभाळता आल्यामुळे बांगलादेशची निर्मिती झाली, याकडे लक्ष वेधत मोदी म्हणाले की, काश्मीरच्या गोष्टी करत पाकिस्तानी राज्यकर्ते आपल्या देशातील जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत, पण पाकिस्तानी राज्यकर्त्यांचे खरे रूप तेथील जनतेच्या लक्षात आले आहे. त्यामुळे ही जनताच पाकिस्तानी राज्यकर्त्यांच्या विरुद्ध मैदानात उतरली तर आश्‍चर्य वाटण्याचे कारण नाही.

Short URL: https://vrittabharati.in/?p=29304

Posted by on Sep 25 2016. Filed under छायादालन, ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in छायादालन, ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (93 of 2477 articles)


=पंतप्रधान मोदींचे पाकला आवाहन= [gallery ids="29299,29300,29301,29302"] कोझिकोड, [२४ सप्टेंबर] - भारत पाकिस्तानविरुद्ध लढाईला तयार आहे. पण पाकिस्तानी नागरिकांनो, तुम्हाला लढाई ...

×