Home » अर्थ, छायादालन, ठळक बातम्या, राष्ट्रीय » जुलैमध्ये ९२,२९३ कोटींची जीएसटी वसुली

जुलैमध्ये ९२,२९३ कोटींची जीएसटी वसुली

-हजारच्या ९९ टक्के जुन्या नोटा जमा : आरबीआय
– पहिल्या महिन्यात उद्दिष्टापेक्षा जास्त करसंग्रह
– आतापर्यंत केवळ ६४.६२ टक्केच रिटर्नचा भरणा
– केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांची माहिती,
नवी दिल्ली, ३० ऑगस्ट –
गेल्या १ जुलैपासून लागू झालेल्या वस्तू व सेवा कराचा (जीएसटी) पहिल्या महिन्यात उद्दिष्टापेक्षा जास्त संग्रह झाला आहे. एकट्या जुलैमधील जीएसटीची वसुली जवळपास तब्बल ९२ हजार २९३ कोटी रुपये आहे, अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज दिली.
नवीन कर सुधारणा प्रणाली लागू झाल्यानंतर जीएसटी अंमलात आला होता. जीएसटी संग्रहाची ही आकडेवारी एकूणपैकी केवळ ६४.६२ टक्के रिटर्न भरणार्‍यांच्या आधारे देण्यात आली आहे.
जेटली यांनी करसंग्रहाच्या प्रारंभिक आकडेवारीची माहिती देताना सांगितले की, पहिल्याच महिन्यात आम्ही उद्दिष्ट साध्य केले आहे. जुलै महिन्यातील जीएसटी संग्रह अंदाजापेक्षा जास्त राहील, असे फार कमी लोकांना वाटत होते. जुलैमधील एकूण जीएसटी संग्रह जवळपास ९२ हजार २८३ कोटी रुपये आहे. वार्षिक अर्थसंकल्पाच्या आधारावर सरकारने जुलैमध्ये केंद्रीय महसूल ४८,००० कोटी आणि राज्यांचा संग्रह ४३,००० कोटी रुपये राहण्याचा अंदाज लावला होता. या दोन्हींची बेरीज एकूण ९१,००० कोटी रुपये होते. आम्ही हे उद्दिष्ट गाठले आहे. प्रतिपूर्ती सेसला वेगळे ठेवले तरीही आम्ही सर्व करदात्यांनी रिटर्न भरल्यानंतर उद्दिष्टाच्या पुढे राहूच. जुलै महिन्याचा रिटर्न भरण्याची अंतिम तारीख २५ ऑगस्ट होती. तसेच जे लोक जीएसटीपूर्वी दिलेल्या करावर ट्रान्जिशन क्रेडिट घेऊ इच्छितात, त्यांच्यासाठी मुदत २८ ऑगस्ट निश्‍चित करण्यात आली होती, अशी माहिती त्यांनी दिली.
जेटली म्हणाले की, एकूण संग्रहात केंद्राचा जीएसटी १४,८९४ कोटी, राज्याचा जीएसटी २२,७२२ कोटी आणि एकत्रीकृत जीएसटी ४७,४६९ कोटी रुपये आहे. यात २०,९६४ कोटी रुपये आयातीवर लावलेल्या करातून प्राप्त झालेले आहे. जेव्हा वस्तू एका राज्यातून दुसर्‍या राज्यात नेल्या जातात, तेव्हा आयजीएसटी लागू होतो. आयातीवरही हाच कर लागू होतो. प्रतिपूर्ती सेस ७,१९८ कोटी रुपये आहे, ज्यापैकी ४९९ कोटी रुपये आयातीवरील सेसद्वारे मिळाले आहे. जुलैमध्ये ५९.५७ लाख लोकांना रिटर्न भरायचा होता. यात ऑगस्टमध्ये नोंदणी करणारे आणि रचनात्मक (कम्पोजिशन) योजनेतील करदात्यांचा समावेश नाहीत. यापैकी ३८.३८ लाख लोकांनी रिटर्न भरला असून हे प्रमाण एकूण उद्दिष्टीत रिटर्नच्या ६४.४२ टक्केएवढे आहे. यावरुन सर्व करदात्यांनी रिटर्न भरल्यानंतर करसंग्रहात आणखी वाढ होईल यात शंका असण्याचे काही कारण नाही, असे त्यांनी सांगितले.
जीएसटीएनपासून मिळणार्‍या क्रॉस-युटिलाइजेशन अहवालाच्या आधारावर ही वाटणी होईल. केंद्र आणि विविध राज्यांच्या मिळकतीची खरी आकडेवारी याच महिन्याच्या अखेरीस ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मिळेल. राज्यांना कुण्या खास कारणासाठी प्रतिपूर्ती द्यावी लागणार काय? हे आम्हाला बघावे लागेल. कर पालन वाढल्यावर सरकारचा महसूल आणखी वाढू शकतो. ७२.३३ लाख करदात्यांपैकी ५८.५३ लाख जीएसटीएनमध्ये दाखल झाले आहेत, तर १३.८० लाख लोकांनी अद्याप प्रक्रियेसंबंधीची औपचारिकता पूर्ण केलेली नाही. काल २९ ऑगस्टपर्यंत नवीन करदात्यांची आकडा १८.८३ लाख एवढा होता, अशी माहिती अरुण जेटली यांनी दिली.
हजारच्या ९९ टक्के जुन्या नोटा जमा : आरबीआय
नोटाबंदीनंतर चलनातून बाद झालेल्या ५०० आणि १००० रुपयांच्या किती नोटा जमा झाल्या याची अधिकृत माहिती १० महिन्यांनंतर आरबीआयने प्रसिद्ध केली असून, नोटाबंदीपूर्वी चलनात असलेल्या १५.४४ लाख कोटी रुपयांपैकी १५.२८ लाख कोटी रुपये बँकेत जमा झाले आहे. म्हणजेच जवळपास ९९ टक्के १००० रुपयांच्या नोटा बँकेत जमा झाल्याचे यात स्पष्ट करण्यात आले आहे.
मिळालेल्या वृत्तानुसार, मार्च २०१७ पर्यंत ८,९२५ कोटींच्या १००० रुपयांच्या नोटा वितरणात होत्या. रिझर्व्ह बँकेच्या माहितीनुसार, वितरणात असलेल्या नोटा म्हणजेच रिझर्व्ह बँकेच्या बाहेर असलेल्या नोटा आहेत.
८ नोव्हेंबरपर्यंत ६.८६ कोटी रुपयांहून अधिक मूल्य असलेल्या १००० रुपयांच्या नोटा वितरणात होत्या. मार्च २०१७ पर्यंत व्यवहारात असलेल्या १००० हजारांच्या नोटांचे प्रमाण १.३ टक्के होते. याचाच अर्थ ९७.७ टक्के नोटा रिझर्व्ह बँकेत जमा झाल्या होत्या.
वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, १००० रुपयांप्रमाणेच चलनातून बाद झालेल्या ५०० रुपयांच्या नोटाही बँकांमध्ये जमा झाल्या आहेत. याकाळात १५.४ लाख कोटी रुपयांच्या एकूण नोटा चलनातून बाद करण्यात आल्या होत्या. त्यात १००० रुपयांच्या ४४ टक्के आणि ५६ टक्के ५०० रुपयांच्या नोटा होत्या.

Short URL: https://vrittabharati.in/?p=34898

Posted by on Sep 3 2017. Filed under अर्थ, छायादालन, ठळक बातम्या, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in अर्थ, छायादालन, ठळक बातम्या, राष्ट्रीय (33 of 2477 articles)


वृंदावन, १ सप्टेंबर - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत आणि सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी भारतमातेच्या प्रतिमेला पुष्प अर्पण ...

×