Home » अर्थ, छायादालन, ठळक बातम्या, राष्ट्रीय » डॉ. ऊर्जित पटेल रिझर्व्ह बँकेचे नवे गव्हर्नर

डॉ. ऊर्जित पटेल रिझर्व्ह बँकेचे नवे गव्हर्नर

urjit-patel1नवी दिल्ली, [२० ऑगस्ट] – ज्येष्ठ अर्थतज्ञ आणि रिझर्व्ह बँकेचे विद्यमान डेप्युटी गव्हर्नर डॉ. ऊर्जित पटेल यांची आज शनिवारी भारतीय रिझर्व्ह बँकेचे नवे गव्हर्नर म्हणून नियुक्ती करण्यात आली. पटेल रिझर्व्ह बँकेचे २४ वे गव्हर्नर आहेत. रघुराम राजन यांच्यानंतर रिझर्व्ह बँकेचा नवा गव्हर्नर कोण होणार, याकडे सार्‍या देशाचे लक्ष लागले होते.
रिझर्व्ह बँकेचे विद्यमान गव्हर्नर रघुराम राजन यांचा कार्यकाळ ३ सप्टेंबरला संपत आहे, त्यामुळे नव्या गव्हर्नरची नियुक्ती करायची होती. ४ सप्टेंबरपासून तीन वर्षांच्या कालावधीसाठी डॉ. ऊर्जित पटेल यांची रिझर्व्ह बँकेचे नवे गर्व्हनर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ऊर्जित पटेल रिझर्व्ह बँकेच्या चार विद्यमान डेप्युटी गव्हर्नर्सपैकी एक आहेत.
५२ वर्षीय ऊर्जित पटेल यांची जानेवारी महिन्यातच रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर म्हणून तीन वर्षांसाठी फेरनियुक्ती करण्यात आली होती. रिझर्व्ह बँकेच्या आर्थिक धोरणविषयक विभागाचे प्रमुख म्हणून २०१३ पासून ऊर्जित पटेल यांच्याकडे जबाबदारी होती.
रघुराम राजन यांचे निकटवर्तीय अशी ओळख असलेल्या ऊर्जित पटेल यांची नियुक्ती मंत्रिमंडळाच्या नियुक्तीविषयक समितीने मंत्रिमंडळ सचिवांच्या नेतृत्वातील एका उच्चाधिकार समितीच्या शिफारसीच्या आधारे केली आहे. वॉशिंग्टनमध्ये पटेल आणि रघुराम राजन यांनी एकत्र काम केले आहे. रिझर्व्ह बँकेत मात्र ऊर्जित पटेल रघुराम राजन यांच्या आधी आले होते. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीतूनच पटेल १९९६-९७ मध्ये डेप्युटेशनवर रिझर्व्ह बँकेत आले होते. १९९८ ते २००१ या काळात अर्थ मंत्रालयात आर्थिक घडामोडीविषयक विभागात सल्लागार म्हणून त्यांनी काम केले.
ऑक्सफर्ड विद्यापीठातून एमफील केलेल्या ऊर्जित पटेल यांनी येल विद्यापीठातून डॉक्टरेट मिळवली. १९९० ते ९५ या काळात पटेल यांनी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीतही भारत, अमेरिका, म्यानमार आणि बहामा या देशांविषयीच्या समितीत काम केले आहे. रिझर्व्ह बँकेत येण्याआधी पटेल बोस्टन कन्सल्टिंग कंपनीचे (ऊर्जा आणि पायाभूत सुविधा) सल्लागार होते. रिलायन्स समूहातही त्यांनी काम केले आहे.
विद्यमान गव्हर्नर रघुराम राजन यांनी दुसर्‍यांदा गव्हर्नरपदाची जबाबदारी घेण्यास नकार दिल्यानंतर रिझर्व्ह बँकेचा नवा गव्हर्नर कोण होणार, याकडे देशातील आर्थिक क्षेत्राचे लक्ष लागले होते. रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदासाठी प्रारंभी पाच-सहा नावांची चर्चा होती. मात्र, त्यात ऊर्जित पटेल यांचे नाव सुरुवातीपासून आघाडीवर होते.

Short URL: https://vrittabharati.in/?p=29243

Posted by on Aug 21 2016. Filed under अर्थ, छायादालन, ठळक बातम्या, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in अर्थ, छायादालन, ठळक बातम्या, राष्ट्रीय (108 of 2477 articles)


=करझई यांची स्पष्ट भूमिका= काबुल, [२० ऑगस्ट] - भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बलुचिस्तानवर व्यक्त केलेल्या मताला पाठिंबा देत अफगाणिस्तानचे ...

×