Home » छायादालन, ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » डॉ.कलामांचे स्मारक मूळ गावी उभारणार: मोदी

डॉ.कलामांचे स्मारक मूळ गावी उभारणार: मोदी

Modi_at Kalam_birthdayनवी दिल्ली, [१५ ऑक्टोबर] – ‘मिसाईल मॅन’ म्हणून ओळखले जाणारे माजी राष्ट्रपती दिवंगत डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी नेहमीच आव्हानांचा सामना केला, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले असून, डॉ. कलाम यांचे जीवन सर्व भारतीयांसाठी प्रेरणास्रोत आहे, असे गौरवोद्‌गार काढले. डॉ. कलाम यांच्या मूळ गावी त्यांचे भव्य स्मारक उभारले जाईल, अशी घोषणाही पंतप्रधानांनी केली.
‘या जगात दोन प्रकारची माणसं असतात. काही जण संधीची वाट बघत असतात, तर काही जणांना आव्हानांचा सामना करायला खूप आवडते. कलाम साहेबांना नेहमी आव्हानाचा सामना करायला आवडत असे आणि जीवनाच्या अखेरपर्यंत त्यांनी तेच केले’, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉ. कलाम यांच्या ८४ व्या जयंतीनिमित्त आज गुरुवारी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलताना सांगितले. डॉ. कलाम यांचे २७ जुलै रोजी निधन झाले.
डॉ. कलाम हे राष्ट्रपती होण्यापूर्वी राष्ट्ररत्न होते, असे सांगताना मोदी म्हणाले की, डॉ. कलाम आज आपल्यात नसल्यामुळे जी पोकळी निर्माण झाली आहे, ती त्यांनी दिलेली शिकवण प्रत्यक्षात आणूनच भरून काढता येऊ शकते. राष्ट्रपतिपदासारख्या सर्वोच्च पदाचा त्याग केल्यानंतर त्यांनी कशाचाही मोह न ठेवता अध्यापनाचे कार्य सुरू केले. निष्ठा आणि कटिबद्धतेशिवाय असे करणे शक्यच नाही. त्यामुळे देशातील युवा शास्त्रज्ञांनी डॉ. कलाम यांच्या जीवनापासून प्रेरणा घ्यावी, असे आवाहन पंतप्रधानांनी केले. डॉ. कलाम यांच्या रामेश्‍वरम् या जन्मगावी त्यांचे स्मारक उभारण्यासाठी सरकारने जागा आधीच अधिग्रहित केली आहे. स्मारकाबाबतच्या इतर गोष्टींचा अभ्यास करण्यासाठी एका समितीची स्थापना करण्यात आली आहे, असेही मोदी यांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉ. कलाम यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ काढण्यात आलेल्या विशेष टपाल तिकिटाचे विमोचनही केले. तत्पूर्वी, येथील डीआरडीओ परिसरात भरविण्यात आलेल्या ‘अ सिलेब्रेशन ऑफ डॉ. कलाम्स लाईफ’ या प्रदर्शनाचेही त्यांनी अवलोकन केले. संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर, केंद्रीय नगरविकास मंत्री एम. व्यंकय्या नायडू, दूरसंचार व आयटी मंत्री रविशंकर प्रसाद, विज्ञान व तंत्रज्ञान मंत्री डॉ. हर्ष वर्धन इत्यादी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
तत्पूर्वी, पंतप्रधान मोदी यांनी बुधवारी सकाळी डॉ. कलाम यांच्या जयंतीनिमित्त त्यांना सॅल्युट केला. आज आम्ही डॉ. कलाम यांना सॅल्युट करतो आणि एक शास्त्रज्ञ, शिक्षणतज्ज्ञ व भारताचे राष्ट्रपती या नात्याने त्यांनी केलेल्या कार्याचा आनंद साजरा करू, असेही मोदींनी ट्विटमध्ये म्हटले आहे. भारतरत्न या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले डॉ. कलाम यांचे २७ जुलै २०१५ रोजी निधन झाले. २००२ ते २००७ या काळात ते देशाचे ११ वे राष्ट्रपती होते.

Short URL: https://vrittabharati.in/?p=25153

Posted by on Oct 16 2015. Filed under छायादालन, ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in छायादालन, ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (1333 of 2477 articles)


भारताने पाकला पुन्हा ठणकावले अंतर्गत कारभारात ढवळाढवळ नको संयुक्त राष्ट्रसंघ, [१५ ऑक्टोबर] - संयुक्त राष्ट्रसंघाच्या वेगवेगळ्या व्यासपीठांवर काश्मीर मुद्दा ...

×