Home » छायादालन, ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » डॉ कलाम यांना भावपूर्ण आदरांजली

डॉ कलाम यांना भावपूर्ण आदरांजली

  • रामेश्‍वरम् येथे उद्या लष्करी इतमामात अंत्यसंस्कार
  • राजशिष्टाचार त्यागून राष्ट्रपती, पंतप्रधान विमानतळावर

kalam-modiनवी दिल्ली, [२८ जुलै] – भारताचे माजी राष्ट्रपती, मिसाईल मॅन, भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे पार्थिव आज मंगळवारी दुपारी भारतीय वायुदलाच्या विशेष विमानाने राजधानी दिल्लीच्या पालम विमानतळावर आणण्यात आले. विमानतळावर राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, उपराष्ट्रपती हमीद अन्सारी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक मान्यवरांनी भारताच्या या थोर सुपुत्राला भावपूर्ण आदरांजली वाहिली. लाखो दिल्लीकरांनी आणि शाळकरी विद्यार्थ्यांनीही आपल्या या लाडक्या नेत्याला साश्रुनयनांनी श्रद्धांजली अर्पण केली.
अण्वस्त्र क्षेत्रात भारताला स्वयंपूर्ण करण्यात मोलाचे योगदान देणारे डॉ. अब्दुल कलाम यांचे सोमवारी सायंकाळी शिलॉंग येथे एका कार्यक्रमात विद्यार्थ्यांशी संवाद साधताना हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले होते. डॉ. कलाम यांच्या पार्थिवावर गुरुवारी सकाळी ११ वाजता रामेश्‍वरम् येथे संपूर्ण लष्करी इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
गुवाहाटी येथून मंगळवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास डॉ. कलाम यांचे पार्थिव भारतीय वायुदलाच्या विशेष विमानाने पालम विमानतळावर आणण्यात आले. तिन्ही सेनादलाच्या जवानांनी कलाम यांचे पार्थिव असलेली शवपेटी आपल्या खांद्यावर विमानातून बाहेर आणली. विमानतळावर उभारण्यात आलेल्या एका चौथर्‍यावर राष्ट्रध्वजात गुंडाळण्यात आलेले कलाम यांचे पार्थिव ठेवण्यात आले होते. कलाम यांना आदरांजली वाहण्यासाठी राजशिष्टाचार बाजूला सारून राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि पंतप्रधान विमानतळावर उपस्थित होते. विशेष म्हणजे, कलाम यांच्या निधनामुळे राष्ट्रपतींनी आपला कर्नाटक दौरा अर्धवट सोडून दिल्ली गाठली. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि पंतप्रधानसोबतच संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर, लष्कर प्रमुख जनरल दलबिरसिंग सुहाग, वायुदलप्रमुख अरुप राहा, नौदलप्रमुख रॉबिन धवन, दिल्लीचे नायब राज्यपाल नजीब जंग, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया, दिल्लीचे पोलिस आयुक्त बी. एस. बस्सी यांच्यासह अनेक मान्यवरांनी कलाम यांना श्रद्धांजली वाहिली. तिन्ही सेनादलाच्या प्रमुखांनी यावेळी अब्दुल कलाम यांना अखेरची मानवंदना दिली.
पालम विमानतळावरून सजवलेल्या वाहनातून कलाम यांचे पार्थिव १०, राजाजी मार्ग या त्यांच्या शासकीय निवासस्थानी आणण्यात आले. कलाम यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी रस्त्यांच्या दुतर्फा हजारो नागरिक आणि शाळकरी विद्यार्थी उपस्थित होते. १०, राजाजी मार्ग येथे कलाम यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी अनेक राजकीय नेत्यांनी, मान्यवरांनी आणि सर्वसमान्य जनतेने एकच गर्दी केली होती.
संसदेची श्रद्धांजली
डॉ.अब्दुल कलाम यांना मंगळवारी संसदेच्या दोन्ही सभागृहात भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. लोकसभेत सभापती सुमित्रा महाजन यांनी, तर राज्यसभेत अध्यक्ष हमीद अन्सारी यांनी शोकसंदेश वाचून दाखविला. त्यात भारतमातेच्या या थोर सुपुत्राच्या कार्याचा गौरव करण्यात आला. नंतर दोन्ही सभागृहांनी दोन मिनिटे मौन पाळून कलाम यांना आदरांजली वाहिली. कलाम यांच्या निधनामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहाचे कामकाज ३० जुलैपर्यत स्थगित करण्यात आले.
अंत्यदर्शनासाठी मान्यवरांची रीघ
१०, राजाजी मार्ग या शासकीय निवासस्थानी अब्दुल कलाम यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती पंतप्रधान, लोकसभेच्या सभापती सुमित्रा महाजन, रा. स्व. संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत, भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि मार्गदर्शक लालकृष्ण अडवाणी, केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह, संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर, केंद्रीय दळणवळण मंत्री रविशंकर प्रसाद, केंद्रीय खत आणि रसायन मंत्री अनंतकुमार, विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉ. हर्षवर्धन, वन आणि पर्यावरण राज्यमंत्री प्रकाश जावडेकर, खत आणि रसायन राज्यमंत्री हंसराज अहिर, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग, कॉंगे्रसच्या अध्यक्ष सोनिया गांधी, उपाध्यक्ष राहुल गांधी, माजी संरक्षण मंत्री ए. के. ऍण्टोनी, कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते मोतीलाल व्होरा, एम. वीरप्पा मोईली, समाजवादी पक्षाचे प्रमुख खा. मुलायमसिंह यादव, उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव, क्रिकेटपटू खा. सचिन तेंडुलकर यांच्यासह अनेक मान्यवरांनी कलाम यांना आदरांजली वाहिली.
विविध धर्माच्या धर्मगुरूंनीही कलाम यांचे अंत्यदर्शन घेतले. सर्वसामान्य जनतेनेही कलाम यांचे अंत्यदर्शन घेऊन त्यांना आपली भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.

Short URL: https://vrittabharati.in/?p=23569

Posted by on Jul 29 2015. Filed under छायादालन, ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in छायादालन, ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (1539 of 2477 articles)


=कलाम यांचे शेवटचे शब्द= शिलॉंग, [२८ जुलै] - येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमधील कार्यक्रमात हृदयविकाराचा तीव्र झटका येण्याच्या काही मिनिटे ...

×