Home » छायादालन, ठळक बातम्या, महाराष्ट्र » डॉ. बाबासाहेब हे देशाचे नेते : मोदी

डॉ. बाबासाहेब हे देशाचे नेते : मोदी

  • इंदू मिल परिसरातील स्मारकाचे भूमिपूजन
  • बाबासाहेब जगभारतील दलित, पीडित आणि शोषितांचे प्रेरणास्थान
  • विदर्भातील शेतकर्‍यांना मधाचा व्यवसाय करण्यासाठी प्रशिक्षण द्यावे
  • अटलजींच्या सरकारची सागरमाला संकल्पना पूर्ण करणार
  • रेल्वेच्या माध्यमातून देशात अनेक रेल्वे स्थानकांचा विकास
  • सिंचन व्यवस्था न झाल्याने पावसाअभावी शेतकरी संकटात
  • महाराष्ट्राची जलयुक्त शिवार योजना अभिनंदनीय
  • स्मारकाचे भूमिपूजन करण्याचे भाग्य आमच्या नशिबी
  • शिवसेना नेत्यांचा बहिष्कार

dr ambedkar smrak bhumipujan by modi1मुंबई, [११ ऑक्टोबर] – डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे केवळ दलितांचे नेते नसून, जगभारतील दलित, पीडित आणि शोषितांचे प्रेरणास्थान आहे. त्यांना केवळ दलितांचे म्हणून संबोधले गेले तर, हा त्यांचा अवमान होईल, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे व्यक्त केले. बाबासाहेबांचे आपल्यावर अनंत उपकार आहे. त्याची कधीच परतफेड होऊ शकत नाही. मात्र, थोडेबहुत ऋण उतरविण्याचा छोटासा प्रयत्न असल्याचेही ते म्हणाले.
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या येथील इंदु मिल परिसरातील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या प्रस्तावित स्मारकाचे भूमिपूजन आज रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. भूमिपूजन कार्यक्रमानंतर बांद्रा-कुर्ला संकुलात आयोजित जाहीर सभेला संबोधित करताना मोदींनी हे मत व्यक्त केले. मुंबईतील चैत्यभूमीलगत असलेल्या इंदू मिलमध्ये हे भव्य स्मारक उभारले जाणार आहे. इंदू मिलमध्ये झालेल्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला राज्यपाल विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्यासह केंद्रीय वस्त्रोद्योग राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) संतोषकुमार गंगवार, खा. रामदास आठवले, आ. जोगेंद्र कवाडे, आ. भाई गिरकर, भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, माजी खासदार प्रकाश आंबेडकर, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे डॉ. राजेंद्र गवई उपस्थित होते. राज्यात युती सरकारमधील सहकारी पक्ष असलेल्या शिवसेनेचे नेते मात्र या कार्यक्रमाला उपस्थित नव्हते.
शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, अशी शिकवण देणार्‍या डॉ. आंबेडकरांनी दिलेली ताकद कोणी हिरावून घेऊ शकत नाही. बाबासाहेब नसते, तर मी पण इथे नसतो. जग मार्टिन ल्युथरकिंगला ओळखते मात्र, आपल्या बाबासाहेबांना ओळखत नाही, याचे शल्य मनाला आहे. म्हणून बाबासाहेबांच्या विचारांचा जगभर प्रसार व्हावा, त्यांचे स्मारक हे शांतीचे ठिकाण झाले पाहिजे, असा आपला प्रयत्न असल्याचेही मोदी म्हणाले.
जयप्रकाश नारायण यांची आठवण
आणिबाणीच्या काळात संविधानाचे रक्षण करण्यासाठी जयप्रकाश नारायण यांनी लढा दिला होता आणि त्याच जयप्रकाश नारायण यांच्या ११ ऑक्टोबर या जयंतीदिनी देशाला संविधान देणार्‍या बाबासाहेबांच्या स्मारकाचे भूमिपूजन होणे हे सौभाग्य असल्याचे, पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले.
गतिशील गडकरी
१० वर्षांत न झालेले काम नितीन गडकरी यांनी १५ महिन्यांच्या अत्यंत छोट्या कालावधीत करून दाखवले, हे मला गर्वाने सांगावेसे वाटते, अशा शब्दात पंतप्रधान मोदींनी गडकरींचे तोंडभरून कौतुक केले. तर, पोर्ट सेक्टरला ताकद देऊन मजबुती देण्याचे काम गडकरींनी केले. प्रतिदिन १५ किमी पेक्षा जास्त रस्ते तयार केले जात आहेत. नितीनजींचा गतीवर विश्‍वास असून, त्यांचे काम गतिशील असल्याचेही मोदी म्हणाले.
* पंचतीर्थ निर्माणाचे कार्य आम्हीच केले
दिल्लीच्या अलिपूर रोडवरील बाबासाहेब राहत असलेल्या घराचा विषय गेल्या २५ वर्षांपासून प्रलंबित ठेवण्यात होता. तो मार्गी लावून आता तेथेही स्मारक करण्यात येणार असून, बाबासाहेबांच्या वास्तव्याने पावन झालेले लंडन येथील घर स्मारक करण्यात येणार आहे, इंदू मिल येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभारण्यात येणार असून, बाबासाहेबांचे रत्नागिरी जिल्ह्यातील बाबासाहेबांच्या वडिलांच्या अंबवडे गावाचा तीर्थक्षेत्रानुसार विकास याला पंचतीर्थ संबोधून, याचे निर्माण कार्य आम्ही करणार असल्याचे मोदी म्हणाले.
‘ते’ गुन्हे परत घेणार- फडणवीस
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी जमीन मागण्याची वेळ येणे ही बाबच मुळात पुरोगामी महाराष्ट्राला भूषणावह नाही आणि यासाठी करण्यात आलेल्या आंदोलनातील सहभागी आंदोलकांवर सरकारने गुन्हे दाखल केले असून, इंदू मिल स्मारकारसाठी दाखल करण्यात आलेले सर्व गुन्हे मागे घेण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी बोलताना केली.
मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदा डॉ. बाबासाहेबांच्या स्मारकाची फाईल पाहिली तेव्हा कळले तत्कालीन केंद्र सरकार आणि राज्यातील आघाडी सरकारने केवळ कागदं काळे करण्याचे काम केले. जमीन हस्तांतरणासाठी कायदा करण्याचा विषय पुढे करून प्रश्‍न प्रलंबितच ठेवला. त्यांनी केलेल्या संपूर्ण कार्यवाहीचा तपशील बघितला तर, त्यात कुठेही बाबासाहेबांना न्याय देण्याची इच्छाशक्ती दिसली नाही, असेही ते म्हणाले.
पंतप्रधानांचे चैत्यभूमीला अभिवादन
दादरस्थित ‘चैत्यभूमी’ येथे जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केले. त्यानंतर पंतप्रधानांनी तेथे बुद्धवंदना म्हटली. यावेळी पंतप्रधानांसह राज्यपाल विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, सामाजिक न्याय व विशेष साहाय्य मंत्री राजकुमार बडोले, भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, खासदार रामदास आठवले, माजी राज्यमंत्री सुलेखाताई कुंभारे, मुंबई महानगरपालिका आयुक्त अजोय मेहता आदी उपस्थित होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची डाक तिकीट प्रतिमा भेट म्हणून, देण्यात आली.

Short URL: https://vrittabharati.in/?p=25108

Posted by on Oct 11 2015. Filed under छायादालन, ठळक बातम्या, महाराष्ट्र. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in छायादालन, ठळक बातम्या, महाराष्ट्र (1345 of 2476 articles)


मुंबई, [११ ऑक्टोबर] - जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी) च्या भारत मुंबई कंटेनर या चौथ्या टर्मिनल्सचे भूमिपूजन रविवारी पंतप्रधान नरेंद्र ...

×