Home » छायादालन, ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » तोयबा, जैशविरोधात लढा मजबूत करणार

तोयबा, जैशविरोधात लढा मजबूत करणार

-• मुंबई हल्लेखोरांना तत्काळ शिक्षा करा
•- वार्षिक परिषदेत भारत-जपानची पाकला सूचना,
गांधीनगर, १४ सप्टेंबर –
दहशतवाद कदापि खपवून घेतला जाणार नाही, असे स्पष्ट करताना भारत आणि जपानने आज गुरुवारी पाकिस्तानच्या भूमीत आश्रयास असलेल्या अल् कायदा, लष्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-मोहम्मद यासारख्या दहशतवादी संघटनांविरुद्धचा लढा आणखी मजबूत करण्याचा निर्धार व्यक्त केला. सोबतच, मुंबईवरील हल्ल्याच्या सूत्रधारांना पाकिस्तानने तत्काळ शिक्षा करावी, अशी कडक सूचनाही देण्यात आली.
बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या उद्‌घाटनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांच्यात भारत-जपान वार्षिक परिषद आयोजित करण्यात आली. परिषदेनंतर जारी करण्यात आलेल्या संयुक्त निवेदनात पाकप्रायोजित दहशतवादावर जोरदार प्रहार करण्यात आला. अल् कायदा, तोयबा आणि जैश यासारख्या संघटना मानवतेच्या शत्रू आहेत. त्यांच्यासोबतच मुंबईसह भारतात विविध ठिकाणी हल्ले करणार्‍या सूत्रधारांना पाकने कठोर शिक्षा करायलाच हवी, अशी सूचना पाकला देण्यात आली.
दहशतवादाविरोधी लढ्यात परस्परांना सहकार्य करण्यावर दोन्ही देशांमध्ये एकमत झाले. यापूर्वी ब्रिक्स राष्ट्रसमुहाच्या परिषदेत पाकमधील दहशतवादी संघटनांचा उल्लेख करत कारवाईवर एकमत झाल्यानंतर आता भारत-जपान द्विपक्षीय परिषदेतही पाकच्या भूमितील दहशतवादी गटांचा उल्लेख झाल्याने पाकच्या अडचणी वाढल्या आहेत.
दहशतवाद कोणत्याही स्वरूपातला असो, तो जागतिक शांततेसाठी घातकच आहे. संयुक्त जागतिक कृतीतून त्याचा पाडाव व्हायलाच हवा. दहशतवाद्यांना सुरक्षित आश्रय देणार्‍या ठिकाणांवरही आंतरराष्ट्रीय समूहाने कारवाई करायला हवी, त्यांचे नेटवर्क उद्‌ध्वस्त करून त्यांची आर्थिक कोंडी करण्याच्या गरजेवरही मोदी आणि आबे यांनी भर दिला.
१५ करारांवर स्वाक्षरी
दरम्यान, भारत आणि जपानमध्ये आज १५ महत्त्वाचे करार करण्यात आले. धोरणात्मक संबंध मजबूत करतानाच इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील सहकार्य आणखी वाढविण्याच्या कराराचा यात समावेश आहे. या करारांवर स्वाक्षरी केल्यानंतर मोदी आणि आबे यांनी संयुक्त पत्रपरिषदेला संबोधित केले. चीन इंडो-पॅसिफिक प्रांतात आपले वर्चस्व वाढविण्याचा प्रयत्न करीत असल्याने ते कमी करण्यासाठी सहकार्य वाढविण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.
अन्य करारांमध्ये नागरी उड्डयण, व्यापार, विज्ञान व तंत्रज्ञान यासह काही महत्त्वाच्या क्षेत्रांचा समावेश आहे. (वृत्तसंस्था)

Short URL: https://vrittabharati.in/?p=34972

Posted by on Sep 15 2017. Filed under छायादालन, ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in छायादालन, ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (14 of 2477 articles)


►केंद्राची ठाम भूमिका, नवी दिल्ली, १३ सप्टेंबर - रोहिंग्या निर्वासितांच्या समर्थनार्थ मोर्चे निघत असतानाच केंद्रातील मोदी सरकारने त्यांच्याविरोधातील कणखर भूमिका ...

×