Home » छायादालन, ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » थुंकणार्‍यांना वंदे मातरम् म्हणण्याचा अधिकार नाही

थुंकणार्‍यांना वंदे मातरम् म्हणण्याचा अधिकार नाही

– पंतप्रधानांनी ठणकावले
– देशाची विश्‍वगुरूच्या दिशेने वाटचाल
– नद्या स्वच्छ ठेवणे सर्वांची जबाबदारी
– म्हणूनच आधी शौचालय, मग देवालय
– अपयशाचा बागुलबुवा करू नका
– विवेकानंद ‘मेक इन इंडिया’चे प्रणेते
– नवीन भारताचा संकल्प करा,
नवी दिल्ली, ११ सप्टेंबर –
वंदे मातरम् म्हणण्याचा पहिला अधिकार भारतमातेची स्वच्छता ठेवणार्‍यांचा आहे, पान खाऊन भारतमातेवर थुंकणार्‍यांना वंदे मातरम् म्हणण्याचा अजिबात अधिकार नाही, असे रोखठोक प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सोमवारी येथे केले. भारताने विश्‍वगुरू व्हावे, असे स्वप्न स्वामी विवेकानंद यांनी पाहिले होते, आज त्यादृष्टीने आपली वाटचाल सुरू झाली आहे, याकडे मोदी यांनी लक्ष वेधले.
स्वामी विवेकानंद यांच्या शिकागो येथील भाषणाला १२५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त तसेच दीनदयाल उपाध्याय जन्मशताब्दी वर्षाच्या समारोपानिमित्त विज्ञान भवनात आयोजित देशभरातून आलेल्या विद्यार्थ्यांच्या विशेष कार्यक्रमात ‘युवा भारत आणि नया भारत’ या विषयावर पंतप्रधान मोदी बोलत होते. यावेळी केंद्रीय मंत्री डॉ. महेश शर्मा आणि कर्नल राज्यवर्धन राठोड उपस्थित होते. मी सभागृहात आलो तेव्हा वंदे मातरम्‌च्या घोषणा ऐकून माझ्या अंगावर रोमांच उभे राहिले; पण खरोखरच आम्हाला वंदे मातरम् म्हणण्याचा अधिकार आहे का, अशी विचारणा करत मोदी म्हणाले की, माझे हे म्हणणे अनेक लोकांना पटणार नाही, पण पान खाऊन भारतमातेवर थुंकायचे आणि वंदे मातरम् म्हणायचे, सर्व कचरा भारतमातेच्या अंगावर फेकायचा आणि वंदे मातरम् म्हणायचे हे योग्य आहे का? वंदे मातरम् म्हणण्याचा खरा अधिकार भारतमातेची स्वच्छता ठेवणार्‍यांनाच आहे. सासरच्या घरी शौचालय नसल्यामुळे देशातील अनेक तरुणींनी लग्न करण्याचे नाकारले, मला त्यांचा अभिमान वाटतो, असे मोदी म्हणाले.
नद्या स्वच्छ ठेवणे ही आमच्या सर्वांची जबाबदारी आहे, याकडे लक्ष वेधत मोदी म्हणाले की, फक्त डॉक्टर आणि दवाखान्यांच्या माध्यमातूनच आम्ही सुदृढ राहू शकत नाही, तर जी व्यक्ती आमच्या घराच्या आसपासचा कचरा साफ करते, त्याच्या मदतीनेच सुदृढ राहू शकतो.
त्यामुळेच आधी शौचालय मग देवालय असे मी म्हटले होते.देशातील विद्यार्थ्यांच्या राजकारणाला मिळत असलेल्या चुकीच्या दिशेबद्दल चिंता व्यक्त करताना मोदी म्हणाले की, विद्यार्थी नेते निवडणुकीच्या वेळी मोठमोठी आश्‍वासने देतात, पण आम्ही महाविद्यालयाचा परिसर स्वच्छ ठेवू, असे आश्‍वासन देत नाही. विद्यार्थी नेत्यांनी आपल्या महाविद्यालयाचा परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन मोदी यांनी केले. विद्याथ्यार्र्नी नियमांचे पालन केले तर जगावर भारत राज्य करेल, असे ते म्हणाले.देशातील युवाशक्तीचा गौरव करत मोदी म्हणाले की, अपयश हीच यशाची पहिली पायरी आहे, त्यामुळे अपयशाचा बागुलबुवा करू नका. नोकरी मागणारा नाही तर नोकरी देणारा तरुण देशात निर्माण झाला पाहिजे. काय खायचे काय खायचे नाही, यावरून वाद करणे ही आमची संस्कृती नाही. आपल्या देशात भीक मागणार्‍याजवळही त्याची एक संस्कृती असते, तो म्हणतो, तुम्ही मला द्या, देव तुम्हाला देईल. तुम्ही मला नाही दिले तरी देव तुम्हाला देवो.
‘मेक इन इंडिया’च्या आपल्या संकल्पनेचा संदर्भ देत मोदी म्हणाले की, स्वामी विवेकानंद आणि जमशेटजी टाटा यांची भेट झाली. तेव्हा स्वामी विवेकानंदांनी त्यांना उद्योग सुरू करण्याची म्हणजेच मेक इन इंडियाची सूचना केली होती. ही त्यांची दूरदृष्टी होती, त्यामुळे भारताचे भाग्य बदलले.आज महाविद्यालयात वेगवेगळे डे साजरे केले जातात, मी रोज-डेच्या विरोधात नाही, पण कधी पंजाबच्या कॉलेजने ठरवले की, आम्ही केरळ-डे पाळू, त्यांच्यासारखी वेशभूषा करू, त्यांच्यासारखे खेळ खेळू, असे स्पष्ट करत मोदी म्हणाले की, यातूनच देशात एकात्मतेची भावना वृद्धींगत होऊ शकते.
आज आम्ही भारतीय स्वातंत्र्यलढ्याची ७५ वर्षे साजरी करीत आहोे, त्यामुळे आमच्यावर महात्मा गांधी, भगतसिंग, सुखदेव, सुभाषचंद्र आणि स्वामी विवेकानंद यांच्या स्वप्नातील भारत घडवण्याचीही जबाबदारी आली आहे, असे स्पष्ट करत मोदी म्हणाले की, २०२२ मध्ये रामकृष्ण मिशनला १२५ वर्ष पूर्ण होत आहेत, तर भारताच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होणार आहे, त्यामुळे याचे निमित्त साधून आम्हाला नवीन भारताचा संकल्प करावा लागेल.
१२५ वर्षांपूर्वीही शिकागोत ९/११ झाला होता
२००१ च्या आधी ९/११ बद्दल कोणाला माहिती नव्हती, मात्र १२५ वर्ष आधी शिकागोत ९/११ झाले होते, जेव्हा स्वामी विवेकानंदांनी आपल्या भाषणाने जगाला जिंकले होते, याकडे लक्ष वेधत मोदी म्हणाले की, विवेकानंदांची शिकवण आजही आम्हाला ऊर्जा आणि प्रेरणा देते. आपल्या अल्प आयुष्यात त्यांनी जगावर छाप पाडली. १२५ वर्षांपूर्वीचा तो क्षण किती दुर्लभ असेल जेव्हा भारतातून आलेल्या एका तरुणाने जगाला जिंकले. तो भारतासाठी गौरवाचा क्षण होता. एकीकडे रवींद्रनाथ टागोरांना साहित्याचे नोबेल मिळाले, तर स्वामी विवेकानंदांनी आपल्या भाषणाने जगात भारताचे नाव चमकवले. विवेकानंदांनी भारताची ताकद जगाला दाखवून दिली, सामाजिक कुप्रथाविरुद्ध संघर्ष केला. स्वामी विवेकानंदांनी विवेकानंद मिशनची नाही तर रामकृष्ण मिशनची स्थापना केली, यातून त्यांचे मोठेपण दिसते.
(तभा वृत्तसेवा)

Short URL: https://vrittabharati.in/?p=34953

Posted by on Sep 12 2017. Filed under छायादालन, ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in छायादालन, ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (20 of 2477 articles)


-कोंडाणे धरण घोटाळाप्रकरणी आरोपपत्र दाखल, मुंबई, ११ सप्टेंबर - रायगड जिल्ह्यातील कोंडाणे धरण घोटाळ्याप्रकरणी राज्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अर्थात एसीबीने ...

×