Home » छायादालन, ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » दुर्बलांचा विकास, अंत्योदयाच्या मार्गानेच देश सशक्त, स्वावलंबी

दुर्बलांचा विकास, अंत्योदयाच्या मार्गानेच देश सशक्त, स्वावलंबी

=पं. दीनदयाल उपाध्याय जन्मशताब्दी वर्षाच्या शुभारंभप्रसंगी पंतप्रधानांचे प्रतिपादन=

Kozhikode: Prime Minister Narendra Modi before flag hoisting of BJP National Council meeting in Kozhikode, Kerala on Sunday. PTI Photo      (PTI9_25_2016_000080B)

कोझिकोड, [२५ सप्टेंबर] – देश सशक्त आणि स्वावलंबी करायचा असेल तर पंडित दीनदयाल उपाध्याय यांनी दाखवलेल्या अंत्योदयाच्या मार्गाने समाजातील दुर्बल वर्गातील लोकांचा आर्थिक आणि सामाजिक विकास करावा लागेल, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज येथे केले.
येथील स्वप्ननगरी परिसरात आयोजित भाजपा राष्ट्रीय परिषद अधिवेशनात पंडित दीनदयाल उपाध्याय जन्मशताब्दी वर्षाचा शुभारंभ करतांना पंतप्रधान मोदी बोलत होते. यावेळी व्यासपीठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी, डॉ. मुरलीमनोहर जोशी, तसेच राजनाथसिंह, अरुण जेटली, नितीन गडकरी, मनोहर पर्रीकर, व्यंकय्या नायडू, अनंतकुमार, जे.पी. नड्ढा हे केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्र्यांमध्ये शिवराजसिंह चौहान, मनोहरलाल खट्टर, देवेंद्र फडणवीस, सर्बांनंद सोनोवाल, रघुवरदास, डॉ. रमणसिंह, विजय रुपानी, लक्ष्मीकांत पार्सेकर, उपमुख्यमंत्री निर्मलसिंह व भाजपाचे राष्ट्रीय संघटनमंत्री रामलाल उपस्थित होते.
आम्ही राजकारणात काही मिळवण्यासाठी आलो नाही. राजकारणात काही मिळवायचे असते, तर आम्ही अनेक तडजोडी केल्या असत्या; पण आम्ही अशा कोणत्याही तडजोडी केल्या नाही, याकडे लक्ष वेधत मोदी म्हणाले की, दीनदयाल उपाध्याय यांच्या आदर्शाची पूर्तता करण्यासाठी, जनकल्याणासाठी आम्ही झटलो. जनसेवा हीच प्रभुसेवा आहे, असे पंडितजी म्हणत होते. पंडितजीनी दाखवलेला अंत्योदयचा मार्ग प्रत्यक्षात आणण्यासाठी आम्ही काम करत आहे.
स्वातंत्र्यप्राप्तीनंतर देशाच्या राजकारणाचा दर्जा खालावला, यासाठी काही राजकारण्यांचा व्यवहार जबाबदार होता. त्यामुळे लोकांचा राजकारण्यांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. यामुळे देशातील लोकशाहीला मोठा धोका निर्माण झाला. हा दृष्टिकोन बदलण्यासाठी आम्हाला पंडितजींच्या जन्मशताब्दी वर्षात काम करायचे आहे, असे ते म्हणाले.
अजूनही समाजातील स्थिती निराशाजनक नाही, आशा संपल्या नाही, चांगल्या लोकांनी कमतरता नाही, अन्य पक्षातही चांगले लोक आहेत, आमच्या पक्षात अशा लोकांची संख्या जास्त आहे, मात्र त्यासाठी समाजातील वाईट सवयींपासून आम्हाला दूर राहावे लागणार आहे, असे स्पष्ट करत मोदी म्हणाले की, पंडितजींनी जो विचार आणि आचाराचा जो आदर्श आमच्यासमोर ठेवला, त्याचे लघुप्रतीक आम्हाला बनावे लागेल, तीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.
जनसंघाला समजण्यात जी चूक केली जात होती, तीच आज भाजपाला समजून घेण्यात केली जात आहे, याकडे लक्ष वेधत मोदी म्हणाले की, समाजातील कोणत्याच घटकाला अस्पृश्य समजले जाऊ नये. समाजातील विषमता दूर करायची असेल तर समाजाच्या वरच्या वर्गातील लोकांनी खालच्या वर्गातील लोकांना मदतीचा आणि सहकार्याचा हात देण्याची गरज आहे, असे पंडितजी म्हणत असत.
आपल्या पायात काटा रुतला तर त्याच्या वेदना संपूर्ण शरीरात पोहोचतात, त्याचप्रमाणे समाजातील शेवटच्या माणसाला वेदना झाल्या तर त्याचा त्रास संपूर्ण समाजाला झाला पाहिजे. देशाच्या विकासयात्रेत कोणीच मागे राहणार नाही याची काळजी सर्वांनी घेतली पाहिजे, असे स्पष्ट करत मोदी म्हणाले की, यासाठीच समाजातील सर्व घटकांचा संतुलित विकास झाला पाहिजे. हाच एकात्म मानववाद आहे.
लोकशाहीत अशा हल्ल्यांना स्थान नाही
केरळमध्ये संघ आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांवर होणार्‍या हल्ल्याच्या घटनांबद्दल तीव्र चिंता व्यक्त करतांना वेगळी विचारधारा ठेवणार्‍यांवर होणारे हल्ले लोकशाहीत मान्य नाही.
आज भोजनाच्या वेळी मला एक कार्यकर्ता भेटला. माकप कार्यकर्त्यांच्या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला होता. त्याला तीन महिने रुग्णालयात राहावे लागले, याकडे लक्ष वेधत मोदी म्हणाले की, आतापर्यंत हल्ल्याच्या अशा घटनांकडे माध्यमांचे तसेच मानवाधिकार कार्यकत्यार्र्चे लक्ष जात नव्हते. केरळमध्ये अनेक कार्यकर्त्यांच्या तपस्येतून आणि बलिदानातून पक्षाचे काम वाढले आहे. आहुती या मासिकात कार्यकर्त्यांवरील हल्ल्याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. यावर भाजपा प्रत्येक राज्यात होणार्‍या बैठकीत चर्चा झाली पाहिजे. याबाबतची माहिती देण्याची जबाबदारी कोणा एकावर सोपवली पाहिजे.
हल्ल्याच्या अशा घटना यापुढे खपवून घेतल्या जाणार नाही, त्याचा लोकशाही मार्गाने मुकाबला केला जाईल, लोकशाही मार्गाने अशा घटनांकडे देशाचे लक्ष वेधले जाईल, असे मोदी यांनी स्पष्ट केले.
कोप-२१ निर्णयांची भारत समीक्षा करणार
आज संपूर्ण जग पर्यावरणाच्या मुद्यावर चिंतीत आहे,पण पर्यावरणाचे रक्षण कसे करायचे ते पंडित दिनदयाल उपाध्याय यांनी कित्येक वर्ष आधी सांगितले होते, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. नैसर्गिक साधनसंपत्तीचे आवश्यक तेवढेच शोधन करा, अनावश्यक शोधन केले तर पर्यावरणाला धोका पोहोचेेल, असे पंडितजी म्हणत असत याकडे लक्ष वेधत मोदी म्हणाले की, तापमानात २ अंशाने वाढ झाली तरी जगातील अनेक देशांच्या अस्तित्वाला धोका पोहोचू शकतो. यामुळे पर्यावरणाच्या मुद्यावर जग चिंताग्रस्त आहे. पॅरिस येथील पर्यावरणावर झालेल्या शिखर परिषदेत भारताने पर्यावरणाच्या मुद्यावर घेतलेल्या भूमिकेचे आणि पुढाकाराचे स्वागत करण्यात आले.
२ ऑक्टोबरला महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या दिवशी कोप-२१ शिखर परिषदेतील निर्णयाची समीक्षा करत ते लागू करण्याचा निर्णय सरकारने घेतला असल्याचे मोदी यांनी स्पष्ट केले.
मुस्लिमांकडे माणूस म्हणून पाहा
देशातील मुस्लिमांकडे व्होट बँक म्हणून पाहू नका, त्याचप्रमाणे त्यांची घृणाही करू नका, असे पंडितजी म्हणत होते, असा उल्लेख करत मोदी म्हणाले की, मुस्लिमांचे लांगूूलचालन करण्याची जशी गरज नाही, तसेच त्यांचा तिरस्कारही करायला नको. त्यांच्याकडे माणूस म्हणून आपली वागणूक असली पाहिजे. त्याला आपले मानले पाहिजे. मुस्लिम म्हणजे मतांच्या बाजारपेठेतील वस्तू नाही.
निवडणूक सुधारणांवर चर्चा
निवडणूक सुधारणा ही काळाची गरज झाली आहे, याकडे लक्ष वेधत मोदी म्हणाले की, या मुद्यावर देशव्यापी चर्चा झाली पाहिजे. स्वयंसेवी संस्थांनी अशा चर्चेचे आयोजन केले पाहिजे. निवडणूक पद्धतीत काय सुधारणा केल्या पाहिजे, ते सरकारने नाही तर जनतेने ठरवले पाहिजे. आजच्या निवडणूक पद्धतीत पैशाचा प्रभाव, गुंडागर्दी, सरकारी यंत्रणेचा हस्तक्षेप असा अनेक त्रुटी दूर करण्याची गरज आहे.
पक्षासाठी वेळ द्यावा
दीनदयालजी यांच्या जन्मशताब्दी वर्षात भाजपा देशभर विविध कार्यक्रमाचे आयोजन करणार आहे. सरकारी पातळीवरही ही जन्मशताब्दी साजरी केली जाईल, असे स्पष्ट करत मोदी म्हणाले की, यासाठी कार्यकर्त्यांनी पक्षाला विशिष्ट काळासाठी वेळ दिला पाहिजे. सरकारने गरिबांच्या कल्याणासाठी सुरू केलेल्या विविध योजना जनतेपर्यत पोहोचल्या पाहिजे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=29306

Posted by on Sep 25 2016. Filed under छायादालन, ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in छायादालन, ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (92 of 2477 articles)


जाहीर सभेत पंतप्रधानांची ग्वाही दहशतवादापुढे कधीच झुकणार नाही •आधी आपले घर नीट सांभाळा •पाकी नेते दहशतवाद्यांचे भाषण वाचतात •पाकमधील ...

×