Home » अर्थ, छायादालन, ठळक बातम्या, राष्ट्रीय » नुकसान भरपाईत ५० टक्क्यांची वाढ

नुकसान भरपाईत ५० टक्क्यांची वाढ

  • मुद्रा बँकेचे उद्‌घाटन
  • गारपीटग्रस्तांना पंतप्रधानांचा मदतीचा हात
  • ३३ टक्के नुकसान झालेल्यांनाही मिळणार मदत =

Narendra Modi Launches MUDRA BANKनवी दिल्ली, [८ एप्रिल] – देशाच्या विविध भागांमध्ये नुकताच झालेला अवकाळी पाऊस आणि गारपीट यामुळे नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बुधवारी भरीव मदतीचा हात दिला. शेतकर्‍यांना मिळणार्‍या नुकसान भरपाईत पंतप्रधानांनी सरसकट ५० टक्क्यांची वाढ जाहीर केली आहे. सोबतच, सरकारी मदत प्राप्त करण्यासाठीचे निकष शिथिल करताना, ज्यांचे ३३ टक्के नुकसान झाले, त्यांनाही मदत मिळणार असल्याची घोषणा पंतप्रधानांनी केली आहे. दरम्यान, देशभरातील सूक्ष्म आणि लघु वित्तीय संस्थांची पुनर्रचना करणार्‍या आणि त्यांना सरकारकडून आर्थिक पुरवठा करणार्‍या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी राजधानी दिल्लीत ‘मुद्रा’ बँकेचे उद्‌घाटन केले.
प्रभावित शेतकर्‍यांच्या कर्जाची पुनर्रचना करण्याचे आदेश आपण सर्व बँकांना दिले आहेत आणि विमा कंपन्यांनाही या शेतकर्‍यांचे विमाविषयक दावे तातडीने निकाली काढण्यास सांगितले आहे, असे नरेंद्र मोदी यांनी २० कोटी रुपये खर्चाच्या ‘प्रधानमंत्री मायक्रो युनिटस् डेव्हलपमेंट रिफायनान्स एजन्सी’ अर्थातच ‘मुद्रा’चे उद्‌घाटन करताना जाहीर केले.
आतापर्यंत ५० टक्के नुकसान झालेले शेतकरीच सरकारी मदत प्राप्त करण्यासाठी पात्र होते. पण, आम्ही हे निकष बदलले आहेत. पिकाचे ३३ टक्के नुकसान झालेल्या शेतकर्‍यांनाही आता मदत मिळणार आहे. त्यांना मिळणार्‍या मदतीतही आम्ही ५० टक्क्यांनी वाढ केली. शेतकर्‍यांना जर सध्या एक लाख रुपये मदत मिळत असेल, तर आता त्यांना दीड लाख रुपयांची मदत प्राप्त होणार आहे, असे मोदी यांनी यावेळी सांगितले.
गेल्या वर्षी कमी पाऊस पडल्याने आणि यावर्षी अवकाळी पाऊस, वादळ व गारपिटीमुळे शेतकरी प्रभाावित झाला आहे. गेल्या महिन्यातच मी मंत्रिगटावर पिकांच्या नुकसानीचा आढावा घेण्याची जबाबदारी सोपविली होती. या गटाचा अहवाल मला प्राप्त झाला आहे, असे ते म्हणाले. विशेष म्हणजे, मंगळवारी केंद्रीय कृषिमंत्री राधामोहनसिंह यांनी अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे देशातील ११३ लाख हेक्टर पिकांचे नुकसान झाल्याची माहिती दिली होती.
मुद्रा बँकेचे उद्‌घाटन
दरम्यान, देशभरातील सूक्ष्म आणि लघु वित्तीय संस्थांची पुनर्रचना करणार्‍या आणि त्यांना सरकारकडून आर्थिक पुरवठा करणार्‍या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी राजधानी दिल्लीत ‘मुद्रा’ बँकेचे उद्‌घाटन केले. यावेळी बोलताना पंतप्रधान म्हणाले की, जनधन योजनेला देशभरात ज्याप्रमाणे अफाट यश मिळाले आहे त्याचप्रमाणे मुद्रा बँकेचाही नागरिकांना खूप फायदा होणार आहे. मुद्रा बँकेच्या माध्यमातून सूक्ष्म व लघु उद्योजकांना देण्यात येणार्‍या कर्जामुळे देशाच्या प्रगतीत मोठी मदत होणार आहे. मुद्रा बँकेच्या माध्यमातून तीन प्रकारे कर्ज देण्यात येणार आहे. बचत हा भारतीयांचा स्वभाव असल्याने त्यांना कमी व्याजदराने कर्ज उपलब्ध होणार आहे. मुद्रा बँकेच्या माध्यमातून दहा लाखांपर्यंतचे कर्ज देण्यात येईल. विशेष म्हणजे, आपल्या सरकारच्या पहिल्याच परिपूर्ण अर्थसंकल्पात अर्थमंत्री अरुण जेटली यांनी मुद्रा बँकेची स्थापना करण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते.

Short URL: https://vrittabharati.in/?p=21941

Posted by on Apr 9 2015. Filed under अर्थ, छायादालन, ठळक बातम्या, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in अर्थ, छायादालन, ठळक बातम्या, राष्ट्रीय (1817 of 2477 articles)


=१२५२ मेट्रिक टनचा टप्पा गाठला= नवी दिल्ली, [८ एप्रिल] - आपल्या अणुभट्ट्यांकरिता लागणार्‍या इंधनासाठी आतापर्यंत अन्य देशांवरच अवलंबून राहणार्‍या भारताने ...

×