Home » छायादालन, ठळक बातम्या, पंजाब-हरि, राज्य » पंजाबमध्ये दहशतवादी हल्ला

पंजाबमध्ये दहशतवादी हल्ला

  • तीन नागरिकांचा मृत्यू, १५ जखमी
  • तिन्ही अतिरेक्यांचा खात्मा
  • ११ तास चालली चकमक
  • पाकमधूनच झाली घुसखोरी
  • चिनी बनावटीच्या एके रायफल्स व ग्रेनेड्‌स मिळाले
  • जीपीएस सिस्टिमही आढळली

गुरदासपूर, [२७ जुलै] – पाकिस्तानमधून घुसखोरी करून आलेल्या अतिरेक्यांनी आज सोमवारी पहाटे पंजाबच्या गुरदासपूर जिल्ह्यातील दीनानगर शहरात शक्तिशाली हल्ला केला. अतिरेक्यांनी बसवर गोळीबार केल्यानंतर दीनानगर पोलिस ठाणे व बाजूलाच असलेल्या पोलिस वसाहतीतील एक इमारतही ताब्यात घेतली. अत्याधुनिक शस्त्र व स्फोटकांनी सज्ज असलेल्या या अतिरेक्यांनी पोलिस ठाण्यातील कैदी आणि पोलिसांच्या नातेवाईकांना ओलिस ठेवून केलेल्या गोळीबारात पोलिस अधीक्षक बलजीत सिंग यांच्यासह पाच पोलिस शहीद झाले. दोन कैद्यांसह तीन नागरिकांचाही यात मृत्यू झाला असून, १५ जण जखमी झाले आहेत. तब्बल ११ तास चाललेल्या या मोहिमेत लष्करी जवान आणि एनएसजीच्या कमांडोंनी सर्व अतिरेक्यांना कंठस्नान घातले. मोहीम फत्ते केल्यानंतर जवानांनी ‘जो बोले सो निहाल…’ अशा जोरदार घोषणा केल्या.
पाकच्या हद्दीतून घुसखोरी केल्यानंतर दहशतवाद्यांनी आधी पंजाब परिवहन मंडळाच्या जम्मूकडे जाणार्‍या एका बसवर गोळीबार केला. सर्व दहशतवादी लष्करी गणवेशात होते. यानंतर एका कारचालकाला जखमी करून त्याच्याच कारने दहशतवादी पोलिस ठाण्यात आले आणि बॉम्बस्फोट व गोळीबार करून ठाण्याचा ताबा घेतला.
ठाण्याच्या पहिल्या मजल्यावर असलेल्या कैद्यांना व पोलिसांच्या नातेवाईकांना ओलिस ठेवून अतिरेक्यांनी पोलिसांवर भ्याड हल्ला केला. यात पोलिस अधीक्षक बलजीत सिंग, दोन पोलिस कॉन्स्टेबल आणि दोन होमगाडर्‌‌स शहीद झाले. पण, लष्करी जवान आणि एनएसजीच्या कमांडोंनी मोर्चा सांभाळल्यानंतर पहिल्या तासातच एका अतिरेक्याचा खात्मा केला. जवान आणि कमांडोंनी अतिरेक्यांना सर्व बाजूंनी घेरले आणि विशिष्ट अंतराने अतिरेक्यांना टिपण्यास सुरुवात केली. नागरिकांना कोणतीही हानी व्हायला नको, यासाठी पोलिसांनी संपूर्ण परिसर रिकामा केला होता. हेलिकॉप्टरमधूनही अतिरेक्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात येत होते. पहाटे साडेचारच्या सुमारास सुरू झालेली ही कारवाई सायंकाळी पाचच्या सुमारास संपली. ११ तासांच्या धाडसी कारवाईनंतर जवानानी सर्व अतिरेक्यांना ठार केले. ठार अतिरेक्यांकडून चिनी बनावटीच्या एके रायफल्स आणि हॅण्ड गे्रनेड्‌स ताब्यात घेण्यात आले आहेत. अतिरेक्यांजवळ ग्लोबल पोझिशन सिस्टीमही (जीपीएस) आढळून आली. हे अतिरेकी पाकमधूनच जम्मू-पठाणकोट किंवा चाकहिरा भागातील कुंपण नसलेल्या सीमेवरून भारतात आले होते. लष्कर-ए-तोयबा किंवा जैश-ए-मोहम्मद यासारख्या जहाल दहशतवादी संघटनांचे ते सदस्य असावेत, अशी शक्यता पंजाबचे पोलिस महासंचालक सुमेध सिंग सैनी यांनी कारवाई संपल्यानंतर पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.
१५ जखमींमध्ये काही पोलिस आणि जवानांचाही समावेश असून, यातील काहींना उपचारासाठी गुरदासपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर, गंभीर जखमींना अमृतसर येथे भरती करण्यात आले आहे. या हल्ल्याच्या पार्श्‍वभूमीवर पंजाब आणि जम्मू-काश्मिरातील सीमांवर अतिसतर्कतेचा इशारा देण्यात आला. याशिवाय, गुजरात, उत्तरप्रदेश, हिमाचलप्रदेश आणि राजस्थानातही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
पंतप्रधानांनी घेतली क्षणाक्षणाची माहिती
दीनानगरच्या पोलिस ठाण्यावर दहशतवादी हल्ला झाल्याची माहिती कळताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंजाब सरकार आणि केंद्रीय गृहमंत्रालयाकडून क्षणाक्षणाची माहिती प्राप्त केली. सोबतच आवश्यक ते दिशानिर्देशही त्यांनी वेळोवेळी दिले. केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनीही पंतप्रधानांना प्रत्येक घडामोडीची माहिती उपलब्ध करून दिली. अतिरेक्यांची संख्या नेमकी किती आहे, याबाबतची नेमकी माहिती नसल्याने गृहमंत्र्यांनी लष्कर आणि एनएसजी कमांडोंना आघाडी सांभाळण्याचे निर्देश दिले होते.
राजनाथसिंह आज निवेदन करणार
दरम्यान, या दहशतवादी हल्ल्याच्या मुद्यावर गृहमंत्री राजनाथसिंह उद्या मंगळवारी लोकसभेत सविस्तर निवेदन करणार आहेत. सोमवारी सायंकाळी त्यांनी उच्चस्तरीय बैठक बोलावून स्थितीचा आढावा घेतला. या बैठकीत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल आणि गृहमंत्रालयातील वरिष्ठ अधिकार्‍यांसोबतच लष्करातील अधिकारीही उपस्थित होते.
बलजीतसिंगचे वडीलही झाले होते शहीद
सोमवारीच्या अतिरेकी हल्ल्यात शहीद झालेले पोलिस अधीक्षक बलजीतसिंग यांचे वडील अचारसिंग हेदेखील १९८४ मध्ये पंजाबात दहशतवादी कारवाया शिगेला पोहोचल्या असताना शहीद झाले होते. दरम्यान, बलजीतसिंग यांच्या पार्थिवावर उद्या मंगळवारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=23524

Posted by on Jul 28 2015. Filed under छायादालन, ठळक बातम्या, पंजाब-हरि, राज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in छायादालन, ठळक बातम्या, पंजाब-हरि, राज्य (1548 of 2477 articles)


मुख्यमंत्र्यांनी घातले पांडुरंगाला साकडे सपत्नीक केली महापूजा पंढरपूर, [२७ जुलै] - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सोमवारी पहाटे आषाढी ...

×