Home » छायादालन, ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » पंतप्रधानांच्या हस्ते उज्ज्वला योजनेचा शुभारंभ

पंतप्रधानांच्या हस्ते उज्ज्वला योजनेचा शुभारंभ

pm ujjwala yojnaबलिया (उत्तर प्रदेश), [१ मे] – येथे रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गरिबांसाठी गॅस कनेक्शनच्या ‘उज्ज्वला योजने’चा शुभारंभ करून उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचा शंखनाद केला.
यावेळी मोदी यांच्या हस्ते दारिद्र्य रेषेखालील महिलांना मोफत गॅस कनेक्शन वितरीत करण्यात आले.
या योजनेच्या शुभारंभप्रसंगी आयोजित कार्यक्रमाला उपस्थित जनतेसह व्यासपीठावरील नेत्यांचे स्वागत करून पंतप्रधान म्हणाले की, यापुढे देशातील गरीब महिलांना मोफत गॅस कनेक्शन दिले जाणार आहे. त्यामुळे स्वयंपाकघरात धुराच्या चुलीऐवजी उज्ज्वला योजनेची ज्योत पेटणार आहे.
यावेळी स्वत:ला देशातील मजूर नंबर एक संबोधून मोदी म्हणाले की, श्रमिकांना पेन्शनच्या रूपात यापूर्वी १५ रुपयांपासून १०० रुपयांपर्यंत मिळत होते. पण, केंद्रात भाजपा सरकार आले आणि किमान पेन्शन १००० रुपये करण्यात आली.
यावेळी सुरुवातीला मोदी यांनी कार्यक्रमाला उपस्थित नागरिकांचे भोजपुरी भाषेत स्वागत केले. उपस्थित नागरिकांनीही हात उंचावून पंतप्रधानांच्या अभिवादनाचा स्वीकार केला. कार्यक्रमाला नागरिकांची विराट उपस्थिती पाहून मोदी गदगद झाले व त्यांनी ‘रऊआ सबन का हाथ जोडकर प्रणाम’ असे अनेक वेळा वाकून म्हणत जनतेला नमन केले व नंतर आपल्या भाषणाला सुरुवात केली.
अनुदान सोडणार्‍यांचे आभार
आपल्या आवाहनाला प्रतिसाद देऊन गॅस अनुदान परत करणार्‍या १.१० कोटी लोकांचा ‘महान’ या शब्दात उल्लेख करून मोदी म्हणाले की, आगामी तीन वर्षांत देशातील पाच कोटी गरीब जनतेला घरगुती गॅस कनेक्शन देण्याचे सरकारचे लक्ष्य आहे.
भाषणादरम्यान कॉंग्रेसवर जोरदार टीका करीत मोदी यांनी सांगितले की, गेल्या ६० वर्षांत फक्त १३ कोटी कुटुंबांच्या नशिबी गॅस कनेक्सन आले. मात्र, भाजपा सरकारने एका वर्षात तीन कोटींहून अधिक कुटुंबांना गॅस कनेक्शन उपलब्ध करून दिले आहे. एवढेच नाहीतर गॅसचे अनुदान सोडलेल्या नागरिकांचा पैसा आता गरिबांच्या घरी जात आहे.
चुलीवर स्वयंपाक करताना मातेला होणार्‍या त्रासाचा उल्लेख करून मोदी म्हणाले की, मी पण गरीब आईचा मुलगा आहे. लहानशा खोलीत स्वयंपाक करताना आपल्या आईला खूप त्रास व्हायचा. त्यावेळी घरात इतका धूर राहायचा की तिला डोळ्यात अश्रू येत असल्याने काही दिसायचेसुद्धा नाही. कोणतीही माता एका दिवशी धुरात अन्न शिजवते तेव्हा तिच्या भोवती ४०० सिगारेटचा धूर जमा होतो, असे निदर्शनास आल्याचे सांगत गरिबांची ही पिडा दूर करण्याचा संकल्प आपल्या सरकारने केल्याचे मोदी यावेळी म्हणाले.
आपल्या भाषणातून यावेळी मोदी यांनी उपस्थित जनतेला यापुढे गंगा नदी घाण न करण्याचा संकल्प करण्याचे आवाहन केले. गंगा ही आपली माता असल्याने तिला कोणीही प्रदूषित करणार नाही, असा संकल्प आपण सर्वांनी सुनिश्‍चित केला पाहिजे, असेही ते म्हणाले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=28116

Posted by on May 2 2016. Filed under छायादालन, ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in छायादालन, ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (400 of 2477 articles)


नवी दिल्ली, [३० एप्रिल] - २०१६-१७ मधील राष्ट्रीय पातळीवर होणारी नीट परीक्षा १ मे रोजी घेण्याच्या आदेशाविरोधात काही विद्यार्थ्यांनी सर्वोच्च ...

×