Home » छायादालन, ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » पायाभूत सुविधांच्या विकासाला प्राधान्य : पंतप्रधान

पायाभूत सुविधांच्या विकासाला प्राधान्य : पंतप्रधान

=‘सेतू भारतम’ योजनेचा थाटात शुभारंभ=
Narendra-Modi-launching-the-Setu-Bharatam, nitin gadkariनवी दिल्ली, [४ मार्च] – रस्त्यांसाठी अधिग्रहित करण्यात येणार्‍या जमिनीच्या दोन्ही बाजूला रस्ते बांधून मधली जागा मोकळी ठेवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय सरकारने घेतला असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शुक्रवारी येथे सांगितले.
केंद्रीय भूपृष्ठ परिवहन आणि महामार्ग मंत्रालयातर्फे आयोजित ‘सेतु भारतम्’ योजनेचा राजधानीतील विज्ञान भवनात समारंभपूर्वक शुभारंभ करतांना पंतप्रधान मोदी बोलत होते. व्यासपीठावर भूपृष्ठ परिवहन आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी, राज्यमंत्री पोन. राधाकृष्णन, मंत्रालयाचे सचिव संजय मित्रा आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अध्यक्ष राघव चंद्रा उपस्थित होते.
आतापर्यंत रस्त्यांसाठी अधिग्रहित करण्यात येणार्‍या जमिनीवर मध्यभागी रस्ते बांधण्यात येत होते, त्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोकळ्या असलेल्या जमिनीवर हळूहळू अतिक्रमण व्हायचे, याकडे लक्ष वेधत पंतप्रधान म्हणाले की, नंतर राजकीय आणि अन्य अनेक कारणांमुळे हे अतिक्रमण हटवणे शक्य होत नव्हते. याचा फटका वाहतूक वाढल्यानंतर रस्ता रुंदीकरणाच्या कामाला बसायचा. रस्ता विकासाचे काम ठप्प व्हायचे. त्यामुळे हा प्रकार टाळण्यासाठी यापुढे अधिग्रहित जमिनीच्या दोन्ही बाजूला रस्ते बांधण्याचा धोरणात्मक निर्णय सरकारने घेतला आहे. त्यामुळे आता मधल्या जमिनीवर कोणाला अतिक्रमण करणे शक्य होणार नाही.
रेल्वे आणि रस्तेसारख्या पायाभूत क्षेत्राच्या विकासाला प्रधान्य देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे, कारण देशाच्या विकासात या दोन क्षेत्रांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे, असे स्पष्ट करत मोदी म्हणाले की, रेल्वेमध्ये अनेक मोठे बदल झाले आहेत. आतापर्यंत नव्या गाड्यांच्या घोषणेवर भर देण्यात येत होता, मग त्या गाड्या सुरु झाल्या नाही तरी त्याचे कोणाला काही वाटत नव्हते. मात्र, आम्ही हा प्रकार बंद केला. रेल्वेच्या कार्यपद्धतीत आम्ही अनेक गुणात्मक बदल केले.
सशक्त, समृद्ध आणि गतिशील भारतासाठी पायाभूत क्षेत्राची भूमिका महत्त्वाची आहे, असे स्पष्ट करत मोदी म्हणाले की, त्यामुळेच आम्ही रस्ते विकासाचा व्यापक कार्यक्रम हाती घेतला आहे. राष्ट्रीय महामार्गांवर २०८ आरओबी आणि आरयुबी बांधण्यासोबत देशातील जुन्या १५०० पुलांच्या जागी नवीन पूल बांधण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी ५१ हजार कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. त्यामुळे २०१९ पर्यंत देशातील राष्ट्रीय महामार्गांवर एकही रेल्वे लेव्हल क्रॉसिंग राहणार नाही.
देशात किती पूल आहेत, रस्ते आहेत, याची आतापर्यंतच्या सरकारजवळ कोणतीच माहिती नव्हती, मात्र आम्ही सत्तेत आल्यावर पुलांच्या वर्गीकरणाची देशव्यापी मोहीम हाती घेतली, त्यातून सगळी माहिती समोर येत आहे. देशात असे अनेक पूल असतील, जे फक्त कागदावरच आहेत, तेही या पाहणीत समोर येईल. यासाठी मी आतापर्यंतची सरकारे आणि लोकप्रतिनिधींना दोष देत नाही. हा तर आमच्या व्यवस्थेचा दोष आहे. त्यामुळे या व्यवस्थेतच आम्हाला सुधारणा करायची आहे, त्यादृष्टीने आमचे काम सुरू आहे, असे मोदी यांनी सांगितले.
शरीरात नसा आणि रक्तवाहिन्या यांचे जेवढे महत्त्व असते, तेवढेच महत्त्वा देशाच्या विकासात रस्ते आणि रेल्वेसारख्या पायाभूत क्षेत्राला आहे, असे मोदी यांनी सांगितले.
प्रारंभी केंद्रीय भूपृष्ठ परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी ‘सेतु भारतम्’ योजनेची माहिती दिली. देशातील अपघातांची वाढती संख्या कमी करण्यासाठी सर्व राष्ट्रीय महामार्ग रेल्वे क्रॉसिंगविरहित करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे, याकडे लक्ष वेधत गडकरी म्हणाले की, राष्ट्रीय महामार्गांवर २०८ आरओबी आणि आरयुबी बांधले जाणार आहेत. पहिल्या टप्प्यात यातील ६६ कामांना प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे. यासाठी आर्थिक तरतूदही करण्यात आली आहे. येत्या तीन महिन्यात या कामांना सुरुवात होईल. २०१९ पर्यंत २०८ पुलांची कामे पूर्ण केली जातील. प्रारंभी रिमोटचे बटन दाबून आणि प्रतिकात्मक स्वरूपात विमोचन करुन सेतु भारतम्‌चा पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. राज्यमंत्री पोन. राधाकृष्णन यांनी आभार मानले. यावेळी विज्ञान भवनात अनेक मान्यवरांसह भरगच्च उपस्थिती होती.

Short URL: https://vrittabharati.in/?p=27013

Posted by on Mar 5 2016. Filed under छायादालन, ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in छायादालन, ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (772 of 2477 articles)


नवी दिल्ली, [४ मार्च] - देशाला प्रभावी शक्ती संतुलन आणि सक्षम संरक्षण दलाची गरज आहे, असे प्रतिपादन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी ...

×