Home » छायादालन, ठळक बातम्या, प.महाराष्ट्र » पिंपरीने अनुभवला अपूर्व साहित्योल्हास!

पिंपरीने अनुभवला अपूर्व साहित्योल्हास!

=अभूतपूर्व ग्रंथदिंडी=
sahitya samelan pimpri2016पिंपरी चिंचवड, [१५ जानेवारी] – महानगराचे हृदयस्थान असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकापासून दणक्यात निघालेल्या ग्रंथदिंडीने नटलेल्या पिंपरी चिंचवडला साहित्योल्हासाची अपूर्व अनुभूती करून दिली. ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची ही ग्रंथदिंडी अभूतपूर्वच होती, अशी उत्स्फूर्त पावती देशाच्या कानाकोपर्‍यातून आलेल्या साहित्यरसिकांनी दिली.
भारतीय राज्यघटना, लिळाचरित्र, सार्थ श्रीज्ञानदेव अभंगगाथा, ग्रामगीता, ज्ञानेश्‍वरी, श्रीभावार्थ रामायण, तुकारामाची अभंगगाथा, रामचरितमानस आदी ग्रंथांनी सजलेल्या पालखीला संमेलनस्थळी नेत असताना लेझीम पथक तसेच लोकनृत्य सादर करणारी चमू उल्हासात रममाण झाली होती. घोडे ऐटीत चालले होते. मराठमोळ्या भगिनी डोईवर सर्वधर्मसमभावाचे संदेश देत आघाडीवर होत्या. मंगलकलश घेऊन महाविद्यालयीन विद्यार्थिनी दिंडीत सहभागी होत्या.
पिंपरीत संमेलन आणि या भूमीला लाभलेल्या अध्यात्माचे आणि येथील संस्कृतीचे दर्शन गंथ्रदिंडीत नसते, तरच नवल! आगळ्या पद्धतीने गात आणि तेवढ्याच तन्मयतेने नाचत सरसावलेल्या भजनमंडळींनी देशातील मराठी साहित्यरसिकांना भुरळ पाडली होती. नृत्य सादर करणार्‍यांचा पेहरावही आकर्षक होता. शिवाय बैलबंडीतील वाद्यवृंदही उठून दिसत होते. सजलेल्या रथावर विराजमान मान्यवर साहित्यिक आणि शहरातील मान्यवर पाहुणे पिंपरी चिंचवडकरांचे अभिवादन मोठ्या आनंदाने स्वीकारत होते.
प्रारंभी, संमेलनाचे स्वागताध्यक्ष पी. डी. पाटील, नियोजित अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस, पिंपरी चिंचवडच्या महापौर शकुंतला धराडे, खा. अमर साबळे, ज्ञानेश्‍वर मुळे, गिरीश प्रभुणे, डॉ. रामचंद्र देखणे यांच्या हस्ते ग्रंथदिंडीचे पूजन झाले. शारदास्तवनानंतर दिंडी मार्गी लागली. चार भजन मंडळी, दोन शाळेची लेझीम पथके, बॅण्डच्या शिस्तीत चालणार्‍या विद्यार्थ्यांसह पालखी खांद्यावर घेऊन नियोजित संमेलनाध्यक्ष पुढे सरसावले. देशातून आलेले सारस्वत तसेच अ. भा. मराठी साहित्य मंडळाचे पदाधिकारी सोबत होतेच. सर्वांचा उत्साह अगदी ओसंडून वाहत होता. ठेका धरून नृत्य सादर करणार्‍या विद्यार्थिनी पिंपरीकरांचे लक्ष वेधून घेत होत्या. रस्त्या-रस्त्यांवर कमानी उभारून शहरातील अनेक सामाजिक, शैक्षणिक संस्था आलेल्या पाहुण्यांचे स्वागत करण्यास सज्ज झाल्या होत्या. महाराष्ट्रीय परंपरेतील वासुदेवचा दिंडीतील वावरही संस्कृतीच्या स्मृती जागवत होता.
जवळपास ६ किलोमीटर अंतराची ही ग्रंथदिंडी ५ वाजताच्या सुमारास संमेलनस्थळी पोहोचली. मात्र, तरीही दिंडीत सहभागी साहित्यिक, साहित्यरसिक, विद्यार्थी व शहरातील मान्यवरांचा उत्साह तसूभरही कमी झाला नव्हता. बॅण्डच्या मधूर गीतावर ही दिंडी जेव्हा संमेलनाच्या मुख्यद्वारावर पोहोचली तेव्हा सर्वांचे पुष्पगुच्छाने स्वागत झाले. स्वागताध्यक्षांचे पुष्पमालेने स्वागत झाले. परिसरात साकारलेल्या येथील संतांच्या भव्य मूर्तीजवळ अखेर पालखी विसावली. सर्वांनी पुष्प अर्पण करून ग्रंथांची पूजाअर्चा केली.
तद्नंतर माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते ग्रंथप्रदर्शनीचे उद्घाटन झाले. सोबतच अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्ष डॉ. माधवी वैद्य यांच्या हस्ते ध्वजवंदन पार पडले. त्यानंतर माजी संमेलनाध्यक्षांचा सत्कार सोहळा पार पडला.
परिसराची भव्यता भावली
संमेलनाच्या मुख्य मंडपासमोर स्वागतासाठी उभारलेल्या ८५ फूट लांबीच्या लेखणीच्या प्रतिकृतीची कमान, परिसरातील संत ज्ञानेश्‍वर, संत तुकाराम, महासाधू मोरया गोसावी यांच्यासह प्र. के. अत्रे, पु. ल. देशपांडे यांचे भव्य पुतळेही आकर्षणाचे केंद्र आहेत. १२ हजार साहित्यप्रेमींची बैठक व्यवस्था असणारा मुख्य मंडप देखणा असून, त्याच्या दोन्ही बाजूला प्रत्येकी दोन हजार बैठक क्षमतेचे स्वतंत्र सभामंडप उभारण्यात आले आहेत. स्वतंत्र ग्रंथदालन, लेखक व वाचकसंवाद कट्टा ही रसिकांच्या सेवेत सज्ज आहे. पिंपरी चिंचवड या उद्योगनगरी साहित्य परंपरेचाही इतिहास दाखवण्यात प्रयत्न करण्यात आला आहे. एकूण ४० एकराचा भव्य परिसर सर्वांनाच भावत आहे.
आज उद्‌घाटन
८९ व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे उद्‌घाटन उद्या शनिवारी सकाळी दहा वाजता राष्ट्रवादी कॉंगे्रसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी मुख्य अतिथी म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रमुख पाहुणे म्हणून बिहारचे माजी राज्यपाल डी. वाय. पाटील, तसेच ज्येष्ठ साहित्यिक व गीतकार गुलजार उपस्थित राहतील. राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट, ८८ व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते सत्यव्रत शास्त्री, रेहमान राही, केदारनाथ सिंह आणि सीताकांत महापात्रा यांची यावेळी विशेष उपस्थिती राहणार आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=26533

Posted by on Jan 16 2016. Filed under छायादालन, ठळक बातम्या, प.महाराष्ट्र. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in छायादालन, ठळक बातम्या, प.महाराष्ट्र (907 of 2476 articles)


नवी दिल्ली, [१५ जानेवारी] - आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती ऐतिहासिक नीचांकावर आल्यामुळे सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या ...

×