Home » आंतरराष्ट्रीय, छायादालन, ठळक बातम्या, युरोप » पॅरिस हादरले, १२८ ठार, १८० जखमी

पॅरिस हादरले, १२८ ठार, १८० जखमी

  • ८ अतिरेक्यांचा खात्मा •
  • फ्रान्समध्ये आणिबाणी •
  • तीन दिवसांचा शोक
  • इसिसने जबाबदारी स्वीकारली

paris terror attack 2015 1पॅरिस, [१४ नोव्हेंबर] – फ्रान्सची राजधानी पॅरिस येथे शुक्रवारी रात्री एकामागोमाग एक झालेल्या सहा आत्मघाती अतिरेकी हल्ल्यांमध्ये १२८ पेक्षा जास्त जण ठार झाले असून, १८० जण जखमी झाले. जखमींपैकी ८० जणांची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. दुसर्‍या विश्‍व युद्धानंतर फ्रान्समध्ये झालेला हा सर्वांत भीषण अतिरेकी हल्ला आहे. हे दहशतवादी कृत्य आणि फ्रान्सविरुद्ध पुकारलेले युद्ध असून, या घटनेसाठी जबाबदार असलेल्या दोषींना कठोर शिक्षा केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा निर्धार फ्रान्सचे अध्यक्ष फ्रॅन्कॉईज ओलांद यांनी व्यक्त केला आहे. इराक व सीरियात धुमाकूळ घालणार्‍या इसिस या दहशतवादी संघटनेने या हल्ल्यांची जबाबदारी स्वीकारली असून, आणखी आत्मघाती हल्ले करण्याची धमकी फ्रान्सला दिली आहे. या हल्ल्याच्या पार्श्‍वभूमीवर फ्रान्समध्ये आणिबाणी जाहीर करण्यात आली असून, देशाच्या सर्व सीमा सील करण्यात आल्या आहेत. देशात तीन दिवसांचा दुखवटाही जाहीर करण्यात आला आहे.
राजधानी पॅरिस येथील अनेक नागरिक शुक्रवारी रात्री शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी एकत्र जमले असताना कंबरेला स्फोटकं बांधलेल्या आत्मघाती अतिरेक्यांनी अत्यंत सुनियोजित पद्धतीने पॅरिसच्या रस्त्यांवर रक्तपात घडवून आणला. २००४ साली माद्रिद येथे रेल्वेत झालेल्या बॉम्ब स्फोटांनंतर युरोपमधील हा सर्वांत मोठा अतिरेकी हल्ला असल्याचे बोलले जात आहे.
एके-४७ ने सज्ज असलेल्या चार अतिरेक्यांनी अमेरिकन बॅण्ड कार्यक्रम सादर करत असलेल्या कॉन्सर्ट हॉलला लक्ष्य केले. याठिकाणी अतिरेक्यांनी शेकडो लोकांना ओलिस ठेवले. यानंतर फ्रान्सचे सुरक्षा रक्षक त्याठिकाणी दाखल होताच अतिरेक्यांनी कंबरेला बांंधलेल्या स्फोटकांचा स्फोट करून, स्वत:ला उडवून दिले. त्यामुळे या कॉन्सर्ट हॉलमध्ये अक्षरश: रक्त-मांसाचा सडा पडला होता. याठिकाणी सर्वांत जास्त म्हणजे ८२ लोक ठार झाले. या हल्ल्यात एकूण आठ अतिरेकी मारले गेले असून, त्यापैकी सात जणांनी स्वत:ला उडवून दिले आणि एका जणाला म्यूझिक कॉन्सर्टच्या ठिकाणी ठार करण्यात आले, असे पॅरिस प्रॉसिक्युटरच्या प्रवक्त्या ऍग्नेस थिबॉल्ट लेक्युरिव्ह यांनी एएफपी या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले. अजूनही काही अतिरेकी शहरात लपून बसले असण्याची शक्यता त्यांनी फेटाळली नाही. एकूण सहा हल्ल्यांमध्ये किमान १२० जणांचा मृत्यू झाला आहे, असेही त्यांनी सांगितले. फ्रान्सने इसिसविरोधात सुरू केलेल्या लष्करी कारवाईचा बदला म्हणून हे हल्ले करण्यात आले असल्याचे ट्विटरवर नमूद करण्यात आले आहे. कॉन्सर्ट सुरू असलेल्या हॉलमध्ये ‘अल्ला हो अकबर’चे नारे ऐकू आल्याचे काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
अतिरेक्यांनी फ्रान्स आणि जर्मनी यांच्यात नॅशनल स्टेडियमवर सुरू असलेल्या मैत्री सामन्यालाही लक्ष्य केले. फ्रान्सचे अध्यक्ष ओलांद आणि जर्मनीचे परराष्ट्र मंत्री या सामन्याचा आनंद लुटत असताना स्टेडियमबाहेर स्फोटांचे आवाज ऐकू आले. स्टेडियमबाहेर अतिरेकी हल्ला झाल्याचे स्पष्ट होताच सुरक्षा रक्षकांनी ओलांद यांना सुखरूप बाहेर काढले. स्टेडियमशिवाय कायम वर्दळ असणार्‍या रेस्टॉरेंटसह इतर काही ठिकाणांना अतिरेक्यांनी लक्ष्य केले. यामध्येही अनेक लोकांचा मृत्यू झाला. कॅनॉल सेंट मार्टिन भागातील एका कम्बोडियन रेस्टॉरेंटमध्येही अतिरेक्यांनी बेछूट गोळीबार केला.
अतिरेकी शहरात हैदोस घालत असल्याचे स्पष्ट होताच पॅरिस पोलिसांच्या मदतीसाठी लष्कराच्या १५०० जवानांना पाचारण करण्यात आले. शार्ली एब्दोच्या कार्यालयावर झालेल्या अतिरेकी हल्ल्यामुळे बसलेल्या मानसिक धक्क्यातून फ्रान्सची जनता अद्याप सावरली नसतानाच हा हल्ला झाला. या हल्ल्यामुळे फ्रान्सचा मीडिया हादरला असला तरी दहशतवादाचा नेटाने मुकाबला करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे. इतर प्रतिक्रिया भीती आणि निर्धाराच्या होत्या.
सर्व भारतीय सुरक्षित
पॅरिसमध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्यातील मृतांमध्ये एकाही भारतीयाचा समावेश नसून, सर्व भारतीय सुखरूप असल्याचे भारतीय उच्चायोगातील अधिकार्‍याने स्पष्ट केले. या हल्ल्यांच्या पार्श्‍वभूमीवर उच्चायोग परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या संपर्कात असून, सर्व घडामोडींवर बारीक लक्ष ठेवण्यात येत आहे, असे भारतीय उच्चायोगातील अधिकारी मनीष प्रभात यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले. या हल्ल्यात कुणाही भारतीयाचा मृत्यू झाल्याची सूचना आम्हाला प्राप्त झालेली नाही. हल्ल्याची माहिती मिळताच आम्ही हेल्पलाईन क्रमांक सुरू केला आहे. आम्ही भारतीय समुदायाशी संपर्क करण्याच्या प्रयत्नात आहोत. यासाठी आम्ही सोशल मीडियाचाही वापर करत आहोत, असेही प्रभात यांनी स्पष्ट केले.
बदला घेणार : ओलांद
फ्रान्सचे अध्यक्ष ओलांद यांनी पॅरिसच्या रस्त्यांवर झालेल्या रक्तपातासाठी इसिस या दहशतवादी संघटनेला जबाबदार ठरविले असून, कोणतीही दयामाया न दाखवता याचा बदला घेतला जाईल, असा कडक इशारा दिला आहे. द्वितीय विश्‍व युद्धानंतर फ्रान्सवर झालेला हा सर्वांत मोठा अतिरेकी हल्ला आहे आणि हे एकप्रकारे देशाविरुद्ध पुकारलेले युद्धच आहे. सरकारचा प्रतिसाद नेमका काय असेल, याबाबत विचार करण्यासाठी आयोजित आपात सुरक्षा बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना ओलांद यांनी हा निर्धार व्यक्त केला. या हल्ल्याच्या पार्श्‍वभूमीवर ओलांद यांनी देशात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर केला असून, देशातील सुरक्षा व्यवस्था सर्वोच्च पातळीवर नेण्यात आली आहे.
राष्ट्रगीत गाऊन देशभक्तीचे दर्शन
पॅरिस येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्याचे मुख्य लक्ष्य अध्यक्ष ओलांद हेच असल्याची चर्चा सुरू आहे. अतिरेकी हल्ला झाला त्यावेळी ओलांद नॅशनल स्टेडियमवर फ्रान्स आणि जर्मनी यांच्यातील मैत्री सामन्याचा आनंद घेत होते. याचवेळी अतिरेकी हल्ला झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर स्टेडियममध्ये उपस्थित प्रेक्षक मैदानावर एकत्र झाले. यावेळी देशभक्तीने ओतप्रोत प्रेक्षकांनी फ्रान्सच्या एकात्मतेचे दर्शन घडवत एकासुरात राष्ट्रगीत गात, अशा भ्याड हल्ल्यांमुळे आम्ही कदापि घाबरणार नाही, असा संदेश दिला. राष्ट्रगीत म्हटल्यानंतर सुरक्षा रक्षकांच्या मार्गदर्शनाप्रमाणे प्रेक्षक बाहेर पडले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=25445

Posted by on Nov 15 2015. Filed under आंतरराष्ट्रीय, छायादालन, ठळक बातम्या, युरोप. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in आंतरराष्ट्रीय, छायादालन, ठळक बातम्या, युरोप (1250 of 2483 articles)


=लंडन येथील लोकार्पण कार्यक्रमात फडणवीस यांचे प्रतिपादन= लंडन, [१४ नोव्हेंबर] - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जागतिक पातळीवरील स्मारकाचे लंडन ...

×