Home » छायादालन, ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात समृद्ध भारताचे दर्शन

प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात समृद्ध भारताचे दर्शन

  • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी घेतली सलामी
  • फ्रान्सचे राष्ट्रपती फ्रान्सवा ओलांद प्रमुख पाहुणे
  • राजपथावर उसळला जनसागर, अभूतपूर्व सुरक्षा व्यवस्था

narendra-modi-francois-hollandeनवी दिल्ली, [२७ जानेवारी] – ६७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त राजपथवर झालेल्या शानदार संचलनात भारताच्या लष्करी ताकदीचे तसेच संस्कृती आणि समृद्धीचे बहारदार प्रदर्शन करण्यात आले. दहशतवादी हल्ल्याच्या शक्यतेच्या पार्श्‍वभूमीवर झालेल्या या कार्यक्रमात हजारोंच्या संख्येत जनसागर उसळला होता.
राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमाला फ्रान्सचे राष्ट्रपती फ्रान्स्वा ओलांद प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. राष्ट्रध्वजाला २१ तोफांची सलामी दिल्यानंतर राजपथवर संचलनाला सुरुवात झाली. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी सलामी स्वीकारली.
वायुसेनेच्या चार हेलिकॉप्टर्सनी राजपथवरून भरारी घेत सलामी मंचावर आणि उपस्थितांवर पुष्पवृष्टी केली. यातील एका हेलिकॉप्टरवर तिरंगा डौलात फडत होता, तर अन्य तीन हेलिकॉप्टरवर तिन्ही सेनादलांचे ध्वज होते. संचलनात फ्रान्सच्या लष्कराची तुकडीही सहभागी झाली होती. दुसर्‍या देशाच्या तुकडीने संचलनात सहभागी होण्याची प्रजासत्ताकदिनाच्या इतिहासातील ही पहिलीच घटना होती. जनरल ऑफिसर कमांडिंग लेफ्टनंट जनरल राजन रवींद्रन यांच्या नेतृत्वात लष्कर तसेच पोलिसांच्या तुकड्यांनी संचलन केले. लष्कर तसेच निमलष्करी दलांच्या बॅण्डच्या तुकड्यांनी लोकांना आकर्षित केले.
सीमा सुरक्षा दलाचे उंटावरील जवान तसेच उंटावरील बॅण्डपथक प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख आकर्षण होते. यावर्षी सीमा सुरक्षा दलाचे उंटावरील पथक संचलनात सहभागी होणार नाही, अशी चर्चा असताना हे पथक संचलनात सहभागी झाल्याचा आनंद लोकांनी टाळ्या वाजवून व्यक्त केला. भारतीय लष्कराचे श्‍वानपथक यावर्षी प्रथमच संचलनात सहभागी झाले. या पथकात ३६ श्‍वान होतेे, त्यातील २४ लॅब्राडोर तर १२ जर्मन शेफर्ड जातीचे होते. आपल्या हॅण्डलरसोबत हे पथक राजपथवर आले तेव्हा लोकांनी त्यांचे टाळ्या गजरात स्वागत केले. अतिशय शिस्तबद्धरीत्या हे श्‍वान संचलनात सहभागी झाले.
राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे अध्यक्ष ओलांद यांच्यासाठी सातस्तरीय सुरक्षा व्यवस्था करण्यात आली होती. अनेक केंद्रीय मंत्री, खासदार, विविध देशांच्या दूतावासचे अधिकारी आणि राजकीय नेते यावेळी उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी खाकी रंगाच्या सुटमध्ये डोक्याला भगवा फेटा बांधून होते, तर राष्ट्रपती प्रणव मुखर्जी काळा कोट आणि काळी टोपी या वेषात होते.
संचलनात अत्याधुनिक शस्त्रास्त्र प्रणालीने भारताच्या संरक्षणसिद्धतेचे दर्शन घडवले. टी ९० भीष्म रणगाडा, इंफंट्री कॉम्बॅट व्हेईकल बीएमपी २, आकाश क्षेपणास्त्र प्रणाली, ब्रम्होस क्षेपणास्त्राचे लॉन्चर तसेच स्मर्च मिसाईल व्हेईकल या संचलनाचे आकर्षण होते.
संचलनातून महिला शक्तीचेही आश्‍वासक दर्शन घडले. महिलांच्या तुकड्याही संचलनात सहभागी झाल्या होत्या. संचलनात स्थलसेनेच्या कोर ऑफ सिग्नलच्या एकीकृत दळणवळण इलेक्ट्रॉनिक युद्ध प्रणाली तुकडीचे नेतृत्व कॅप्टन अर्चनासिंहने केले. नौसेनेच्या १४४ सदस्यांच्या तुकडीत लेफ्टनंट कमांडर चेतना सोनसाळे, लेफ्टनंद मनीषा के. तक्षक आणि लेफ्टनंट प्रियंकाचंद्र या तीन महिला अधिकारी सहभागी झाल्या होत्या. तटरक्षक दल आणि केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या तुकडीतही महिला अधिकारी सहभागी होत्या. महिला अधिकारी अनेक तुकड्यांच्या आघाडीवर राहून नेतृत्व करीत होत्या.
राष्ट्रीय शौर्यपुरस्कार विजेते बालकही फुलांनी सजवलेल्या उघड्या जीपवरून या संचलनात सहभागी झाले होते. आतापर्यंत राष्ट्रीय शौर्य पुरस्कार विजेते बालक हत्तीवर बसून संचलनात सहभागी होत होते.
संचलनात १७ राज्ये तसेच ६ मंत्रालयांच्या चित्ररथांनी देशाच्या वैविध्यपूर्ण संस्कृतीचे दर्शन घडवले. प्रजासत्ताक दिनावर स्वच्छ भारत आणि डिजिटल इंडियाची छाप जाणवत होती. आदर्श मतदान केंद्राचे दर्शन घडवणारा तसेच मतदानासाठी प्रोत्साहित करणारा निवडणूक आयोगाचा चित्ररथही संचलनात सहभागी होता. उत्तरप्रदेश, बिहार, राजस्थान, पश्‍चिम बंगाल, छत्तीसगड, उत्तराखंड या राज्यांचे तसेच पंचायत राज, सामाजिक न्याय, स्वच्छता आणि पाणीपुरवठा, ऊर्जा तसेच दळणवळण मंत्रालयाचे चित्ररथ संचलनात सहभागी झाले होते. संचलनाचा समारोप भारतीय वायुदलाच्या विमानांनी केलेल्या नेत्रदीपक प्रात्यक्षिकांनी झाला. वायुदलांच्या वैमानिकांनी राजपथवरील आकाशात डोळ्याचे पारणे फेडणारी प्रात्यक्षिके सादर केली. मोटारसायकलवर लष्कराच्या जवानांनी सादर केलेल्या चित्तथरारक प्रात्यक्षिकांनी उपस्थितांच्या छातीचे ठोके चुकवले.
संचलनाला प्रारंभ होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमर जवान ज्योतीवर जाऊन पुष्पांजली वाहत शहीद जवानांना आदरांजली अर्पण केली. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी लान्सनायक मोहननाथ गोस्वामी यांच्या पत्नीला अशोकचक्र बहाल केले. जम्मू काश्मिरात अतिरेक्यांशी दहा दिवस लढताना गोस्वामी शहीद झाले होते.

क्षणचित्रे…
– यावर्षी प्रजासत्ताक दिनी घातपात घडवण्याची धमकी दहशतवादी संघटनांनी दिल्यामुळे यावर्षी राजपथवर अभूतपूर्व सुरक्षा व्यवस्था होती. त्यामुळे संचलनाचा कालावधी २५ मिनिटांनी कमी करण्यात आला होता. दरवर्षी सामान्यपणे संचलन दोन तास चालत असते, ते यावेळी दीड तासात संपवण्यात आले.
– यावर्षी लोकांना मोबाईल आणण्याची परवानगी सुरक्षा यंत्रणांनी दिली होती. त्याचा फायदा घेत लोकांनी संचलनाचे फोटो काढण्यासोबत सेल्फीचाही मोठ्या प्रमाणात आनंद लुटला.
– लोकांना पाचस्तरीय सुरक्षा व्यवस्थेतून तसेच धातुशोधक यंत्रातून जावे लागत होते. निमंत्रण पत्र असतानाही अनेकांना आयडीप्रुफजवळ नसल्यामुळे परत जावे लागले.
– संचलन संपल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी शाळेच्या बालकांना भेटले, यावेळी अनेक बालकांनी त्यांच्याशी हस्तांदोलन केले. पंतप्रधान आपल्याशी भेटले आणि त्यांनी आपल्याशी हात मिळवला, याचा आनंद अनेक विद्यार्थ्यांच्या चेहर्‍यावर दिसत होता. स्वातंत्र्यदिनीही पंतप्रधान मोदी सुरक्षा घेरा तोडून लाल किल्ल्यावर शाळकरी विद्यार्थ्यांना भेटले होते.
– संचलन सुरू असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी फ्रान्सचे राष्ट्रपती ओलांद यांना समोरून जाणार्‍या चित्ररथाचे वैशिष्ट्य समजावून सांगत होते.
– फ्रान्सच्या नेत्याने प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात प्रमुख पाहुणा म्हणून येण्याची ही पाचवी वेळ आहे. याआधी १९७६, १९८०, १९९८ आणि २००८ मध्ये फ्रान्सचे पंतप्रधान आणि राष्ट्रपती भारतात प्रमुख पाहुणे म्हणून आले होतेे.
– प्रजासत्ताक दिनाच्या संचलनाने अनेक विरोधकांना जवळ आणले. दिल्लीचे नायब राज्यपाल नजीब जंग आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल जवळजवळ बसले होते.
– मागीलवर्षी प्रजासत्ताक दिनी पाऊस आला होता, त्यामुळे अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांना छत्री घेऊन बसावे लागले होते. त्यामुळे यावर्षी सलामी मंच काचेने आच्छादित केला होता. विमानांच्या प्रात्यक्षिकांच्या वेळी हे काच बाजूला करण्यात आले.
– वन रँक वन पेन्शनमुळे देशभर चर्चेत आलेल्या माजी सैनिकांचा चित्ररथही संचलनात सहभागी होता.

Short URL: https://vrittabharati.in/?p=26666

Posted by on Jan 28 2016. Filed under छायादालन, ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in छायादालन, ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (873 of 2477 articles)


=प्रणव मुखर्जी यांची मोहर= नवी दिल्ली, [२७ जानेवारी] - केंद्रीय मंत्रिमंडळाने केलेल्या शिफारसीवर मोहर उमटविताना, राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी आज ...

×