Home » छायादालन, ठळक बातम्या, महाराष्ट्र » फुंडकर, जानकर, राम शिंदे, सुभाष देशमुख यांना कॅबिनेट

फुंडकर, जानकर, राम शिंदे, सुभाष देशमुख यांना कॅबिनेट

  • राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार, १० नव्या मंत्र्यांचा समावेश
  • फुंडकर, रावळ, शिंदे, देशमुख, निलंगेकर आणि जानकर कॅबिनेट
  • येरावार, चव्हाण, गुलाबराव पाटील, अर्जुन खोतकर, सदाभाऊ खोत राज्यमंत्री

Maharashtra Cabinet expansionमुंबई, [८ जुलै] – राज्य मंत्रिमंडळाचा प्रलंबित विस्तार आज शुक्रवारी सकाळी ९ वाजता विधानभवनातील मध्यवर्ती सभागृहात पार पडला. राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी ६ आमदारांना कॅबिनेट मंत्रिपदाची, तर ५ आमदारांना राज्यमंत्री म्हणून पद व गोपनीयतेची शपथ दिली. यावेळी विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य, आमदार, मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
राज्यपाल विद्यासागर राव यांनी आमदारांना मंत्रिपद आणि गोपनियतेची शपथ दिली. फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात ५ कॅबिनेट आणि ५ राज्यमंत्री अशा एकूण १० मंत्र्यांचा नव्याने समावेश झाला. भाजपचे ज्येष्ठ आमदार पांडुरंग फुंडकर, राम शिंदे, जयकुमार रावल, संभाजी पाटील-निलंगेकर आणि सुभाष देशमुख आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. भाजपाने जानकरांना कॅबिनेट मंत्रिपदाची बक्षिसी दिली असली तरी, मित्रपक्ष शिवसेनेला दोन राज्यमंत्रिपदावर समाधान मानावे लागले. शिवसेनेकडून अर्जुन खोतकर आणि गुलाबराव पाटील यांनी राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली. याशिवाय, स्वाभिमानी संघटनेचे सदाभाऊ खोत यांचीही राज्यमंत्रिपदी वर्णी लागली आहे. भाजपाकडून मदन येरावार, रवींद्र चव्हाण यांनाही राज्यमंत्रिपद देण्यात आले.
शपथविधी सोहळ्यासाठी नव्या मंत्र्यांचे कुटुंबीय सदस्य आणि नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शपथ घेतल्यानंतर महादेव जानकर आणि सदाभाऊ खोत यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची गळाभेट घेतली. शपथविधीनंतर आता या मंत्र्यांना नेमकी कोणती खाती दिली जातात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नव्या मंत्र्यांच्या खातेवाटपाचा निर्णय शनिवारी जाहीर केला जाईल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.
दीड वर्षांत बढती, राम शिंदे कॅबिनेट मंत्री
पक्षाने कामाची दखल घेऊन राज्यमंत्री पदावरून बढती देत कॅबिनेट मंत्रिपदाची जबाबदारी सोपविली आहे. आता मिळेल ती जबाबदारी हाती घेऊन निवड सार्थ ठरविण्याचा प्रयत्न करणार आहे, असे मत गृहराज्यमंत्री पदावरून कॅबिनेट मंत्री झालेले राम शिंदे यांनी यावेळी व्यक्त केले.
निष्ठेने जनतेची सेवा करू : मदन येरावार
मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्यातील जनतेची सेवा करण्यासाठी ज्या विश्‍वासाने मला संधी दिली. त्या विश्‍वासाला कुठेही तडा न जाऊ देता पूर्ण निष्ठेने जनतेची सेवा करण्यासाठी कटिबद्ध आहे. ज्या विभागाची जबाबदारी दिली जाईल ती विश्‍वासाने पार पडण्याचा प्रयत्न करू, अशी प्रतिक्रिया मदन येरावार यांनी व्यक्त केली.
शेतकर्‍यांसाठी लढत राहणार : सदाभाऊ खोत
गेली ३० वर्षे शेतकरी चळवळीत काम करीत आहे. सुरुवातीला शरद जोशी आणि त्यानंतर खा. राजू शेट्टींसोबत काम केले. राज्यभरातील शेतकर्‍यांनी आम्हाला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपले आहे. आमच्या हाकेला शेतकर्‍यांनी सदैव साद दिली. मंत्री म्हणून शेतकर्‍यांचा आक्रोशाला न्याय देण्याचा प्रयत्न करणार आहे, असे मत सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केले.
धनगर आरक्षणासाठी प्रयत्न करणार : महादेव जानकर
भाजप नेतृत्वामुळे मंत्रिपदाची संधी मिळाली. सर्वसामान्यांच्या न्याय्य हक्कासाठी लढत राहू, जनतेचा विश्‍वास संपादन करू, जनतेचा लढा लढत राहू, आदिवासींच्या हक्काला बाधा न आणता धनगरांना आरक्षण मिळवून देऊ, असे महादेव जानकर म्हणाले.
खाते वाटपाबद्दल उत्सुकता शिगेला
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सहा नव्या चेहर्‍यांचा आपल्या कॅबिनेटमध्ये समावेश केला आहे. मुख्यमंत्री आता या आपल्या नव्या सहकार्‍यांकडे कोणकोणत्या खात्यांची जबाबदारी सोपवितात, याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता लागली आहे. शनिवारी मुख्यमंत्री विस्तारीत मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर करणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एकनाथ खडसे यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेले महत्त्वाचे असे महसूल खाते विधान परीषदेतील नवनियुक्त सभागृह नेते चंद्रकांत पाटील यांच्याकडे जाण्याची शक्यता आहे. त्याचवेळी नव्याने कॅबिनेट मंत्रिपदी विराजमान झालेले पांडुरंग फुंडकर, राम शिंदे आणि सुभाष देशमुख यांच्याकडे कृषी, सहकार, उत्पादन शुल्क आणि सार्वजनिक बांधकाम यापैकी तीन खात्यांची जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे. अन्न व नागरी पुरवठा खाते जयकुमार रावळ यांच्याकडे दिली जाण्याची शक्यता वर्तविली जात असून, सार्वजनिक बांधकाम खाते गिरीश बापट यांच्याकडे जाईल अशी माहिती आहे. मित्रपक्ष असलेल्या रासपचे प्रमुख महादेव जानकर यांना पशुसंवर्धन दुग्धविकास आणि मत्यव्यवसाय विभागाची जबाबदारी मिळणार असल्याचे जवळजवळ निश्‍चित असल्याचे समजते.

Short URL: https://vrittabharati.in/?p=29079

Posted by on Jul 9 2016. Filed under छायादालन, ठळक बातम्या, महाराष्ट्र. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in छायादालन, ठळक बातम्या, महाराष्ट्र (150 of 2476 articles)


मुंबई, [८ जुलै] - राज्य मंत्रिमंडळाच्या आज शुक्रवारी झालेल्या मंत्रिमंडळ विस्ताराबाबत आमच्या मनात कुठलीही नाराजी नाही. आम्ही पूर्णपणे समाधानी आहोत. ...

×