Home » आंतरराष्ट्रीय, आशिया, छायादालन, ठळक बातम्या » बांगलादेशने केला अटलजींचा सन्मान

बांगलादेशने केला अटलजींचा सन्मान

=पंतप्रधान मोदींनी स्वीकारला पुरस्कार • देशवासीयांसाठी अभिमानाचा दिवस असल्याचे प्रतिपादन=
modi-shaikh hasinaढाका, [७ जून] – देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात मोलाचे योगदान केल्याबद्दल बांगलादेशने आज रविवारी माजी पंतप्रधान व ज्येष्ठ भाजपा नेते अटलबिहारी वाजपेयी यांचा ‘फ्रेंड्‌स ऑफ बांगलादेश वॉर अवॉर्ड’ देऊन गौरव केला.
बांगलादेशच्या स्वातंत्र्यलढ्यातील योगदान आणि त्या देशासोबत असलेले मैत्रीपूर्ण संबंध अधिक वृद्धिंगत करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल अटलजींचा या पुरस्काराने गौरव करण्यात आला. अध्यक्षीय प्रासादात झालेल्या एका दिमाखदार सोहळ्यात बांगलादेशचे अध्यक्ष अब्दुल हमीद यांच्याकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अटलजींच्यावतीने हा पुरस्कार स्वीकारला. यावेळी बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना आणि त्यांच्या सरकारमधील अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
‘‘अटलबिहारी वाजपेयी यांच्यासारख्या महान नेत्याचा सन्मान होत असल्यामुळे प्रत्येक भारतीयासाठी हा अत्यंत अभिमानाचा दिवस आहे. अटलजींनी आपले संपूर्ण आयुष्य देशासाठी अर्पण केले. अटलजींनी आयुष्यभर सामान्यांच्या अधिकारासाठी लढा दिला आणि माझ्यासारख्या प्रत्येक राजकीय कार्यकर्त्यासाठी अटलजी प्रेरणास्रोत आहेत’’, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अटलजींच्या वतीने हा पुरस्कार स्वीकारल्यानंतर बोलताना सांगितले.
बांगलादेशच्या स्वातंत्र्यलढ्यात त्या देशाचे योद्धे आपले रक्त सांडतच होते. मात्र, भारतीयदेखील त्यांच्या खांद्याला खांदा लावून लढत होते आणि त्यामुळेच खर्‍या अर्थाने बांगलादेशचे स्वप्न प्रत्यक्षात साकारले. १९७१ साली बांगलादेशच्या स्वातंत्र्यसैनिकांना पाठिंबा देण्यासाठी जनसंघाने केलेल्या सत्याग्रहात युवा कार्यकर्ता म्हणून मीदेखील सहभागी झालो होतो, असे सांगून मोदींनी आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. याशिवाय अटलबिहारी वाजपेयी यांनी ६ डिसेंबर १९७१ रोजी संसदेत केलेल्या भाषणाची आठवणही त्यांनी करून दिली. भारत सरकारने बांगलादेशला मान्यता द्यावी, अशी मागणी अटलजींनी त्या भाषणात केली होती. आज अटलबिहारी वाजपेयी यांची प्रकृती चांगली असती आणि ते याठिकाणी उपस्थित असते तर आनंद द्विगुणित झाला असता, असेही पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले.
पुरस्कार म्हणून अटलबिहारी वाजपेयी यांना प्रदान करण्यात आलेल्या सन्मानपत्रात त्यांचा अत्यंत सन्मानित राजकीय नेते, असा उल्लेख करण्यात आला आहे. बांगलादेशच्या स्वातंत्र्यलढा आणि दोन्ही देशांमध्ये मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करण्यात अटलबिहारी वाजपेयी यांनी केलेले मोलाचे योगदान बांगलादेशची जनता कधीही विसरणार नाही आणि या आठवणी सदैव स्मरणात राहतील, असेही त्यात नमूद करण्यात आले आहे.
या कार्यक्रमापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रविवारी सकाळी ढाका येथील ८०० वर्षे जुन्या ढाकेश्‍वरी मंदिरात जाऊन देवीचे दर्शन घेतले. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी रामकृष्ण मिशनच्या मठात गेले. याठिकाणी मोदींनी मंत्रोच्चारही केला. तत्पूर्वी, पंतप्रधान मोदी यांच्या दोन दिवसांच्या दौर्‍यानिमित्त बांगलादेशचे अध्यक्ष अब्दुल हमीद यांनी त्यांच्या सन्मानार्थ विशेष भोजनाचे आयोजन केले होते. यावेळी बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यादेखील उपस्थित होत्या. मोदी यांनी बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीच्या अध्यक्ष बेगम खालिदा झिया यांचीदेखील भेट घेतली.

Short URL: https://vrittabharati.in/?p=22738

Posted by on Jun 8 2015. Filed under आंतरराष्ट्रीय, आशिया, छायादालन, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in आंतरराष्ट्रीय, आशिया, छायादालन, ठळक बातम्या (1662 of 2483 articles)


=मुख्यमंत्रिपदाबाबत अद्याप एकमत नाही= नवी दिल्ली, [७ जून] - आगामी बिहार विधानसभा निवडणूक संयुक्त जनता दल(जदयु) आणि राष्ट्रीय जनता दल ...

×