Home » छायादालन, ठळक बातम्या, बिहार, राज्य » बिहारमध्ये नितीशराज प्रारंभ

बिहारमध्ये नितीशराज प्रारंभ

  • २८ मंत्र्यांसह पाचव्यांदा सत्तारूढ
  • लालूप्रसादांचे दोन्ही पुत्र झाले मंत्री
  • राजद, जदयुच्या १२, कॉंगे्रसच्या चौघांचा समावेश

nitish-kumar-oathपाटणा, [२० नोव्हेंबर] – भाजपाप्रणीत रालोआला पराभूत करून दोन तृतियांश बहुमतासह सत्तेवर आलेल्या महाआघाडीचे नेते नितीशकुमार यांनी आज शुक्रवारी सलग पाचव्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. पाटण्यातील ऐतिहासिक गांधी मैदानावर झालेल्या शानदार शपथविधी सोहळ्यात नितीशकुमार यांच्यासोबत एकूण २८ सदस्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. विशेष म्हणजे, तेजस्वी यादव आणि तेजप्रताप यादव या दोन्ही लालूपुत्रांचा नितीश मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला.
राजदच्या १२, जदयुच्या १२ आणि कॉंगे्रसच्या चार आमदारांना नितीशकुमारांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये स्थान मिळाले आहे. गांधी मैदानात या सोहळ्यासाठी खास व्यवस्था करण्यात आली होती. राज्यपाल राम नाथ कोविंद यांनी मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्र्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्र सरकारच्या वतीने नियुक्ती केलेले केंद्रीय मंत्री एम. व्यंकय्या नायडू, कॉंगे्रसचे उपाध्यक्ष राहुल गांधी, माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा, पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, कॉंगे्रसशासित राज्यांतील अनेक मुख्यमंत्री, माकप नेते सीताराम येचुरी आणि भाकपचे डी. राजा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
नितीशकुमार यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर दुसर्‍याच स्थानावर लालूपूत्र तेजस्वी यादव यांनी पद व गोपनीयतेची शपथ घेतल्याने त्यांच्याकडे उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी सोपविली जाण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे. लालूंचे दुसरे पुत्र तेजप्रताप यादव यांनी तिसर्‍या क्रमांकावर शपथ घेतली. त्यांच्याकडे कॅबिनेट पद येण्याची शक्यता आहे.
जदयुमधून नितीशकुमार यांच्यासोबतच राजीव रंजन सिंह, बिजेंद्र प्रसाद यादव, श्रावण कुमार, जयकुमार सिंह, माहेश्‍वर हजारी, कृष्णा नंदन प्रसाद, संतोष निर्मल, फिरोज अहमद, शैलेश कुमार, कुमारी मंजूर वर्मा, मदन सहानी आणि कपिलदेव कामत यांनी, तर राजदतर्फे तेजस्वी यादव, तेजप्रताप यादव, अब्दुल बारी सिद्दिकी, अब्दुल गफूर, विजय प्रकाश, चंद्रिका राय, अलोककुमार मेहता, रामविचार राय, शिवचंद्र राम, मुनेश्‍वर चौधरी, चंद्रशेखर आणि अनिता देवी यांनी शपथ घेतली. अशोक चौधरी, मदन मोहन झा, अब्दुल जलिल मस्तान आणि अ वदेश कुमार सिंह यांनी कॉंग्रेसचे मंत्री म्हणून शपथ घेतली.
अपेक्षितची ‘उपेक्षा’
विशेष म्हणजे, शपथ घेताना ‘अपेक्षित’ हा शब्द उच्चारताना तेजप्रताप यादव यांनी चक्क या शब्दाचीच उपेक्षा केली आणि ‘उपेक्षित’ असा शब्दप्रयोग केला. यानंतर राज्यपालांनी त्यांना पुन्हा शपथ घेण्यास सांगितले असता, तेजप्रताप यादव यांनी पुन्हा एकदा तीच चूक केली. तेजप्रताप यादव वारंवार एकच चूक करीत असल्याचे लक्षात आल्यानंतर राज्यपालांनी त्यांना थांबविले आणि योग्य उच्चार सांगितला. त्यानंतर तेजप्रताप यांनी योग्य उच्चार करून शपथविधीची औपचारिकता पूर्ण केली.

Short URL: https://vrittabharati.in/?p=25599

Posted by on Nov 21 2015. Filed under छायादालन, ठळक बातम्या, बिहार, राज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in छायादालन, ठळक बातम्या, बिहार, राज्य (1199 of 2477 articles)


१७० लोकांना ओलिस ठेवले, तिघांची हत्या सुरक्षा दलाचा हॉटेलला वेढा बामको, [२० नोव्हेंबर] - फ्रान्सच्या पॅरिस शहरावरील हल्ल्याचे संतप्त ...

×