भाढेवाढही नाही, नव्या गाड्याही नाहीत
Friday, February 27th, 2015=सुरेश प्रभू यांनी सादर केला आश्वासक अर्थसंकल्प=
नवी दिल्ली, [२६ फेब्रुवारी] – कोणत्याही लोकप्रिय घोषणा न करता, कोट्यवधी भारतीयांची ‘लाईफ लाईन’ असलेल्या रेल्वेच्या प्रवाशांना मोठा दिलासा देणारा भाजपाप्रणीत रालोआ सरकारचा आणि स्वत:चा पहिलाच रेल्वे अर्थसंकल्प रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी आज गुरुवारी संसदेत सादर केला. प्रवासी भाड्यात कोणतीही वाढ न करता आणि नव्या गाड्यांची घोषणाही न करता सुरेश प्रभू यांनी सिमेंट, कोळसा अन्नधान्य व डाळी, युरिया, केरोसिन आणि एलपीजी यासारख्या मालभाड्यात मात्र १० टक्क्यांनी वाढ केली. यामुळे या वस्तूंच्या किमतीत काही प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे.
सुरेश प्रभू यांनी प्रवाशांची विशेषत: महिला व ज्येष्ठ नागरिकांची सुरक्षा आणि स्वच्छतेवर या अर्थसंकल्पात भर दिला आहे. आगामी पाच वर्षात रेल्वेचा चेहरामोहरा बदलणार असल्याचे त्यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणाच्या सुरुवातीलाच स्पष्ट केले. निव्वळ घोषणा न करता प्रलंबित असलेली कामे पूर्ण करण्याचे मोठे आव्हान आपण पेलणार असल्याचे सुतोवाच प्रभू यांनी या अर्थसंकल्पातून केले आहे.
कोकण रेल्वेत आगामी तीन वर्षांच्या काळात ५० हजार स्थानिकांना रोजगार मिळणार असल्याचे रेल्वेमंत्र्यांनी आपल्या भाषणात जाहीर केले. यावेळी त्यांनी रेल्वेला सुस्थितीत आणण्यासाठी खाजगीकरणाची शक्यता स्पष्ट शब्दात फेटाळून लावली. रेल्वेचे खाजगीकरण करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. रेल्वे ही भारतीयांचीच संपत्ती राहणार आहे. ‘कुछ नया जोडना होगा… कुछ पुराना तोडना होगा… कुछ नयी दिशाए खोजनी होगी…’ अशी कवितेतून रेल्वेमंत्र्यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणाची सुरुवात केली. सुमारे तासाभराच्या भाषणात प्रभू म्हणाले की, प्रवासी भाड्यात आपण एका पैशाचीही वाढ केली नाही. नव्या रेल्वेगाड्या सुरू करण्याचे याआधीच्या अर्थसंकल्पातील अनेक प्रस्ताव अजूनही खितपत पडले असल्याने आपण नव्या गाड्यांची घोषणाही करणार नाही. तथापि, आर्थिकदृष्ट्या आजारी असलेल्या रेल्वेला सुस्थितीत आणण्यासाठी मालभाड्यात वाढ करण्यात येत आहे. येत्या एक एप्रिलपासून हा निर्णय अमलात येणार आहे.
प्रभू यांनी अर्थसंकल्पात स्वच्छता, बर्थला अद्ययावत स्वरूप प्राप्त करून देणे, प्रवाशांच्या सुरक्षेसाठी हेल्पलाईन, महिला सुरक्षेसाठी निगराणी कॅमेरे, कुपनच्या माध्यमातून, तसेच स्मार्ट फोनद्वारे पाच मिनिटांच्या आत तिकीट बुकिंग, प्रवाशांना आपल्या आवडीचे जेवण मिळण्यासाठी ई-बुकिंगची सोय, शताब्दी गाड्यांमध्ये मनोरंजनाची सुविधा, मोठ्या गाड्यांमध्ये वायफाय सुविधा आणि आणखी दोन स्थानकांना आदर्श स्थानक योजनेत आणणे यासारख्या महत्त्वाच्या घोषणा केल्या. आगामी पाच वर्षांच्या काळात विविध स्रोतांच्या माध्यमातून साडे आठ लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे लक्ष्य रेल्वेमंत्र्यांनी निर्धारित केले आहे.
रेल्वेच्या तिजोरीत खडखडाट असल्याने आणखी तोटा टाळण्यासाठी एकाही नव्या गाडीची किंवा नव्या मार्गाची घोषणा सुरेश प्रभूंनी केली नाही. प्रथमच असे झाल्याने सभागृहात उपस्थित सार्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला. पण, प्रभूंची ‘सुविधा एक्सप्रेस’ सुसाट धावल्याने रेल्वे प्रवास अधिक सुखकर, सुरक्षित, वेगवान आणि हायटेक होण्याची आशा निर्माण झाली आहे. रेल्वे म्हणजे मौल्यवान राष्ट्रीय संपत्ती असून, प्रवाशांच्या गरजा समजून घेणे, रेल्वेला सुरक्षित करणे, आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण करणे आणि रेल्वेला आधुनिक व अद्ययावत स्वरूप प्राप्त करून देणे हेच आपले प्रमुख लक्ष्य असल्याचे प्रभू यांनी नमूद केले.
प्रत्येक गाडीत मोबाईल चार्ज करण्याची सुविधा देण्यात येणार आहे. अंधांकरिता नव्या गाड्यांमध्ये ‘ब्रेल लिपी’ सुविधा, विशेष स्थानकांवर ऑनलाईन व्हीलचेअर बुकिंगची सुविधा, वृद्ध आणि गर्भवती महिलांकरिता लोअर बर्थ वाढविण्याचा प्रस्ताव, अप्पर बर्थकरिता आरामदायक पायर्यांची व्यवस्था देण्यावर आपल्या मंत्रालयाचा भर राहणार असल्याचे स्पष्ट करताना, आता चार महिने आधीच प्रवाशांना आरक्षण करता येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.
रेल्वेच्या विद्युतीकरणाला गती देण्याचा आपला निर्धार बोलून दाखविताना, प्रभू यांनी २०१५-१६ वर्षाकरिता ६००८ किमी मार्गांचे विद्युतीकरण करण्यात येणार असल्याचे सांगितले. दिल्ली-मुंबई आणि दिल्ली-कोलकाता या दरम्यान हायस्पीड ट्रेन चालविण्यासाठी जलदगती रुळाची व्यवस्था लवकरच करण्यात येईल. ताशी १६० ते २०० किमी गतीने गाड्या धावण्यासाठी देशातील ९ मार्गांचा विकास करण्यात आला आहे. मानवरहित रेल्वे फाटक अपघातांसाठी प्रामुख्याने कारणीभूत ठरत असल्याने खुल्या रेल्वे फाटकांवर गाड्या जाण्यापूर्वी अलार्म यंत्रणा बसविण्यात येणार असून, अपघात रोखण्यासाठी या वर्षी कृती आराखडा तयार करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.
बुलेट ट्रेनचा अहवाल तीन महिन्यात
मुंबई- अहमदाबाद या मार्गावरील पहिल्या बुलेट ट्रेनसंबंधीचा अहवाल तीन महिन्यात प्राप्त होणार आहे, असे प्रभू यांनी सांगितले. बुलेट ट्रेन सुरू करण्याला आपल्या सरकारचे सर्वोच्च प्राधान्य आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबतचा निर्धार आधीच जाहीर केला होता. त्याच्याच पूर्ततेसाठी सरकारने ठोस पावले उचलली आहेत, असे ते म्हणाले.
ठळक वैशिष्ट्ये
– प्रवासी भाड्यात वाढ नाही
– नव्या गाड्यांची घोषणा नाही
– सिमेंट, कोळशाच्या मालभाड्यात १० टक्के वाढ
– सुरक्षेच्या मुद्यावर लक्ष देण्यासाठी १८२ हेल्पलाईन क्रमांक
– पाच मिनिटात कुपनच्या माध्यमातून तिकिटाचे बुकिंग, त्यासाठी सर्व स्थानकांवर मशिन्स
– स्मार्ट फोन, डेबिट कार्डनेही तिकिटाचे बुकिंग
– ई-तिकीट हिंदी आणि इंग्रजीशिवाय दुसर्या भाषांमधूनही
– प्रवासात चांगले जेवळ मिळण्यावर भर
– रेल्वेच्या वेबसाईटवरून जेवणाचे बुकिंग
– स्वच्छतेसाठी नवीन लॉण्ड्री सेवा, पिण्याचे स्वच्छ पाणी देणार
– महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी प्रत्येक शताब्दी गाड्यांमध्ये निगराणी कॅमेरे
– सामान्य डब्यांमध्येही मोबाईल चार्जिंगची सुविधा, आरक्षित डब्यातील चार्जिंगच्या सोयी वाढविणार
– कमी बुकिंग होणार्या गाड्यांमधील डबे हटवून गर्दीच्या गाड्यांना बसविणार
– आधुनिक सुविधांच्या माध्यमातून डिजिटल इंडियाचे स्वप्न साकार करणार
– शताब्दी गाड्यांमध्ये ऑन बोर्ड मनोरंजनाच्या सुविधा
-प्रवास आरामदायक करण्यासाठी बसण्याचे आसन बदलणार
– नव्या डब्यांमध्ये अंधांसाठी ब्रेन लिपी सुविधा
– विशेष स्थानकांवर ऑनलाईन व्हिल चेअर बुकिंगची सुविधा
– वृद्ध आणि गर्भवती महिलांकरिता लोअर बर्थ वाढविण्याचा प्रस्ताव
– अप्पर बर्थकरिता आरामदायक पायर्यांची व्यवस्था
– आता चार महिने आधीच आरक्षण करता येणार
– ईशान्येकडील राज्यांना रेल्वेशी जोडणार
– ४०० स्थानकांवर वाय फाय सेवा
– रेल्वे विद्युतीकरणाला गती मिळणार
– २०१५-१६ वर्षात ६००८ किमी मार्गाचे विद्युतीकरण
– मालवाहू गाड्यांची संख्या वाढविणार
– स्थानकांवर सेल्फ ऑपरेटेड लॉकर्स देणार
– मंबईत वातानुकूलित लोकल धावणार
– गाड्यांच्या माहितीसाठी एसएमएस सेवा
– दिल्ली मुंबई, दिल्ली-कोलकाता या दरम्यान हायस्पीड ट्रेन चालविण्यासाठी जलदगती रुळाची व्यवस्था
– नऊ मार्गांवर ताशी १६० ते २०० किमी गतीने गाड्या धावणार
– आगामी दोन वर्षात रेल्वे प्रवासाचा वेळ २० टक्क्यांनी कमी करणार
– खुल्या रेल्वे फाटकांवर गाड्या जाण्यापूर्वी अलार्म यंत्रणा बसविणार
– रेल्वे अपघात रोखण्यासाठी या वर्षी कृती आराखडा
– मुंबई- अहमदाबाद बुलेट ट्रेनवरील अहवाल तीन महिन्यात
– खास स्थानकांवर लिफ्ट आणि स्वयंचलित पायर्यांचा प्रयोग
– १०८ गाड्यांमध्ये जेवणासाठी ई-बुकिंग सुविधा
– पायाभूत सुविधा निधी स्थापन करण्याचा प्रस्ताव
– तिकीट निरीक्षकाला आय-पॅड दिला जाईल
– रिटायरिंग रूमची बुकिंग ऑनलाईन
– रेल्वेच्या विकासाकरिता पीपीपी मॉडेल
– रेल्वे आता थेट वीज कंपन्यांकडून विजेची खरेदी करणार
– काही स्थानकांवर एक हजार मेगावॅटचे सौर पॅनेल बसविणार
– स्थानकांना खाजगी कंपन्या आपले नाव देऊ शकतील
– पर्यटन केंद्रांना डोळ्यासमोर ठेवून काही गाड्यांना अतिरिक्त डबे
– रेल्वेत नोकरीकरिता ऑनलाईन अर्ज सादर करण्याची सुविधा
– रेल्वे कर्मचार्यांकरिताही सुविधा वाढविणार
– रेल्वेच्या अंकेक्षणाकरिता दोन महिन्यात व्यवस्था
– सागरी भागांना रेल्वेेने जोडण्यासाठंी दोन हजार कोटी
– ३५०० मानवरहित फाटके बंद करणार
– आगीच्या घटना रोखण्यासाठी डब्यांमध्ये इशारा प्रणाली बसविली जाईल
– धावत्या गाडीतच मिळणार रिकाम्या जागेची माहिती
– रेल्वेचा पुनर्जन्म होणार आहे, रेल्वेत खासगी कंपन्यांकडून गुंतवणूक होणार
– रेल्वे रुळांची संख्या वाढविणार
– रेल्वेला स्वच्छ भारत अभियानाशी जोडणार, विमानाप्रमाणे रेल्वेतही व्हॅक्युम टॉयलेटची सुविधा
– शेतकर्यांसाठी रेल्वे कार्गो विभाग सुरू करणार
– वाराणसी येथे मदनमोहन मालवीय यांच्या नावाने रेल्वेचे अध्यासन केंद्र
– प्रवासी सुविधेसाठी १३८ हा क्रमांक सुरू राहणार
– मालगाड्यांमध्ये रेडिओ फ्रिक्वेन्सी बसविण्यात येणार
– रेल्वेच्या जमिनींवर एक हजार कोटींची गुंतवणूक करून सौरऊर्जा प्रकल्प उभारणार
– कामगिरीवर आधारित बोनस देण्याची परंपरा सुरू करणार
– यावर्षी रेल्वे विद्यापीठ सुरू करणार, रेल्वेशी संबंधित विषय शिकविण्यात येणार
– कोकण रेल्वेत तीन वर्षात ५० हजार जणांना रोजगार देणार
– अतुल्य भारतासाठी अतुल्य रेल्वे सुरू करणार
– एक भारत-श्रेष्ठ भारतासाठी सर्वांच्या सहयोगाची गरज
– सर्व्हे करून नव्या गाड्यांची घोषणा करणार
Short URL: https://vrittabharati.in/?p=20906

Photo Gallery
-
दीर्घकाळ कार्यरत राहिल्याने वाढते आयुष्य
-
इंटरनेटवरील प्रभावी व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी
-
महिला शक्तीला गुगलचा डूडलद्वारे सलाम
-
स्त्रियांच्या भरारीला आकाश देखील ठेंगणे
-
भारतात लवकरच येणार ‘अच्छे दिन’
-
३ वर्षीय डॉलीचा तिरंदाजीत राष्ट्रीय विक्रम
-
ऑस्कर पुरस्कारांमध्ये ‘बर्डमॅन’ची बाजी
-
नोकरी मिळविण्यात आवाजाची भूमिका महत्त्वाची
-
मजबूत राष्ट्राकरिता एकत्र या!
-
खोबरेल तेलावर चालविला मिनी ट्रक
-
लाल द्राक्षे, शेंगदाण्यांमुळे स्मृतिभ्रंश टळतो
-
अमेरिकेत फोफावतेय् भारतीय खाद्य संस्कृती
-
गूगल विकसित करतेय कर्करोग, हृदयविकार डिटेक्टर
-
यंदा ९३ टक्केच पाऊस!