‘भारतरत्न’ अटलजी

=राष्ट्रपती मुखर्जींनी निवासस्थानी जाऊन केला गौरव, देशभरात जल्लोष=
atalji fasilated by pranab mukharjeeनवी दिल्ली, [२७ मार्च] – माजी पंतप्रधान, भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते, प्रखर वक्ते, राष्ट्रभक्त कवी, थोर मुत्सद्दी आणि भारतीय राजकारणातील भीष्म पितामह अटलबिहारी वाजपेयी यांना आज शुक्रवारी ‘भारतरत्न’ या देशाच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी देशातील कोट्यवधी नागरिकांच्या मनात कृतार्थतेची भावना जागी झाली आणि देशभर आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
सर्व राजशिष्टाचार बाजूला ठेवत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी ६, कृष्ण मेनन मार्ग या अटलबिहारी वाजपेयी यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना ‘भारतरत्न’ पुरस्कार प्रदान केला. यावेळी तेथे उपस्थित मान्यवरांचा आनंद गगनात मावत नव्हता. ‘भारतरत्न’ दिल्यामुळे वाजपेयींसोबत हा पुरस्कारही आज खर्‍या अर्थाने कृतकृत्य झाला.
यावेळी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी, पंतप्रधान नरेंद्र मोदी, रा. स्व. संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत, भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, डॉ. मुरलीमनोहर जोशी, केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह, अर्थमंत्री अरुण जेटली, परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज, शहर विकास मंत्री व्यंकय्या नायडू, भूपृष्ठ परिवहन मंत्री नितीन गडकरी, विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉ. हर्षवर्धन, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग, लोकसभेतील कॉंग्रेस गटनेते मल्लिकार्जुन खरगे, राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद, माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा, जदयु नेते शरद यादव, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान, राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे, पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल, आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू, जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी मात्र यावेळी अनुपस्थित होत्या.
माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना गेल्यावर्षीच्या २५ डिसेंबरला भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला होता. प्रकृती अस्वास्थ्यामुळे पुरस्कार स्वीकारण्यासाठी राष्ट्रपती भवनात जाणे त्यांना शक्य नसल्याने त्यांच्या निवासस्थानी जाऊन हा पुरस्कार प्रदान करण्याचा निर्णय राष्ट्रपती भवनाने घेतला होता. त्यानुसार शुक्रवारी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी वाजपेयींच्या निवासस्थानी जाऊन त्यांना या पुरस्काराने सन्मानित केले. यावेळी वाजपेयी यांचे कुटुंबीय आणि स्वीय सहायक शिवकुमार उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आधी वाजपेयींच्या निवासस्थानी पोहोचले. त्यांनी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे स्वागत केले. काही शाळकरी विद्यार्थ्यांना या कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आले होते. अर्थमंत्री अरुण जेटली यांनी नंतर या कार्यक्रमाची माहिती माध्यमांच्या प्रतिनिधींना दिली. वाजपेयी यांनी भारतभक्तीत आपले संपूर्ण जीवन समर्पित केले. देशातील कोट्यवधी लोकांचे ते प्रेरणास्थान आहेत. भारतीय राजकारणातील त्यांचे योगदान कुणालाही विसरता येणार नाही. येणार्‍या पिढीलाही त्यांची प्रेरणा मिळत राहील, असा विश्‍वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कार्यक्रमानंतर व्यक्त केला.
अनेक राजशिष्टाचार मोडले
भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्याचा सोहळा राष्ट्रपती भवनाबाहेर होण्याचा हा पहिलाच प्रसंग होता. याआधी थोर गायक पंडित भीमसेन जोशी यांना भारतरत्न पुरस्कार पुण्यातील त्यांच्या निवासस्थानी जाऊन प्रदान करण्यात आला होता. मात्र, त्यावेळी राष्ट्रपतींच्या वतीने त्यांच्या प्रतिनिधीने पुण्यात जाऊन हा पुरस्कार प्रदान केला होता.
राष्ट्रपती भवनाबाहेर आणि त्याहीपेक्षा राष्ट्रपतींनी पुरस्कारप्राप्त व्यक्तीच्या निवासस्थानी जाऊन पुरस्कार प्रदान करण्याचा हा पहिलाच सोहळा होता. त्यामुळे या सोहळ्याकडे देशवासीयांचे लक्ष लागले होते. साधारणपणे राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त व्यक्तीसोबत फक्त तीन मिनिटे घालवतात. यावेळी मात्र राष्ट्रपती प्रणव मुखर्जी वाजपेयींच्या निवासस्थानी जवळपास अर्धा तास होते. बाहेर कोणत्याही कार्यक्रमात राष्ट्रपती, पंतप्रधान आणि दोन माजी पंतप्रधानांनी एकत्र येण्याचाही हा पहिलाच प्रसंग होता. ६, कृष्ण मेनन मार्गावर यावेळी कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती. गुरुवारी रात्रीपासूनच हा संपूर्ण परिसर सुरक्षा यंत्रणेने आपल्या ताब्यात घेतला होता.
अल्पपरिचय
भाजपाचा सर्वमान्य जादुई चेहरा
राजकीय पक्षांमध्ये कमालीची कट्टरता असतानाही सर्वच राजकीय पक्षांना सहज मान्य होणारा भाजपाचा जादुई चेहरा, अशी ओळख असलेले माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना आज शुक्रवारी ‘भारतरत्न’ या देशातील सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. केवळ देशातच नव्हे, तर विदेशातही आपली छाप उमटविणारे आणि आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर भारताची भूमिका अतिशय भक्कमपणे सादर करणारे अटलजी यांची भाषण शैली आगळीच आहे.
स्पष्ट बोलणारे आणि ठोस पावले उचलणारे अटलबिहारी वाजपेयी यांनी पंतप्रधान म्हणून आपल्या कारकीर्दीत भारत आणि पाकिस्तानमधील तणावपूर्ण संबंध सुरळीत करण्यासाठी ठोस पावले उचलली. स्वत:च्याच देशात लष्करी उठाव करून सत्ता एकवटणारे पाकिस्तानचे हुकूमशाह परवेझ मुशर्रफ यांनाही अटलजींपुढे झुकावेच लागले होते. काश्मीर प्रश्‍न सोडविण्यासाठी दोन्ही देशांमध्ये झालेला लाहोर करार हा वाजपेयी यांच्या कुशाग्र बुद्धीचे प्रतीकच होय.
१९९८ मध्ये लोकसभा निवडणुकीचे निकाल त्रिशंकू लागल्यानंतर भाजपाकडे तब्बल २४ राजकीय पक्षांनी मैत्रीचा हात पुढे केला होता. हेदेखील वाजपेयी यांच्या जादुई नेतृत्वामुळेच शक्य होऊ शकले होते. १९९२ मध्ये अयोध्येतील बाबरी मशिदीची वादग्रस्त वास्तू पाडल्यानंतर देशातील राजकीय क्षेत्रात अस्पृश्य, अशी भाजपाची ओळख असतानाही वाजपेयी यांनी विविध राजकीय पक्षांना सोबत घेऊन भाजपाच्या नेतृत्वात राष्ट्रीय लोकशाही आघाडीची स्थापना केली.
१९९९ मध्ये वाजपेयी यांनी दिल्ली-लाहोर बसने प्रवास करून पाकला भेट दिली. या माध्यमातून पाकसोबतचे संबंध मजबूत करण्यावर त्यांनी भर दिला. पाकिस्तानच्या विश्‍वासघातकी वृत्तीमुळे लाहोर मिशन पूर्णपणे यशस्वी ठरू शकले नव्हते. यानंतर वाजपेयी यांनी आणखी एक ठोस पाऊल उचलत २००१ मध्ये आग्रा येथे परवेझ मुशर्रफ यांच्यासोबत शिखर परिषद घेतली. त्यांनी घेतलेला हा पुढाकार २००४ मध्ये सत्तेवर आलेल्या डॉ. मनमोहनसिंग यांच्या नेतृत्वातील संपुआ सरकारलाही कायम ठेवणे भाग पडले होते. विशेष म्हणजे, वाजपेयी यांच्याच काळात पाकिस्तानने आपले लष्कर आणि अतिरेकी भारताच्या ताब्यातील जम्मू-काश्मीरच्या कारगिल येथे घुसविले. यावेळी भडकलेल्या युद्धात वाजपेयी यांच्या चाणक्य नीतीमुळे पाकला पराभव पत्करावा लागला होता.
तब्बल चार दशके विरोधी बाकांवर बसल्यानंतर वाजपेयी सर्वप्रथम १९९६ मध्ये देशाचे पंतप्रधान झाले. पण, त्यांची ही कारकीर्द केवळ १३ दिवसांचीच होती. त्यानंतर १९९८ मध्ये ते पुन्हा पंतप्रधानपदी विराजमान झाले. पण, रालोआकडे स्पष्ट बहुमत नसल्याने अवघ्या १३ महिन्यांतच त्यांना राजीनामा द्यावा लागला. रालोआचाच घटक पक्ष असलेल्या अण्णाद्रमुकच्या नेत्या जयललिता यांनी सरकारचा पाठिंबा काढला होता. १९९९ मध्ये झालेल्या निवडणुकीत रालोआ बहुमताच्या जवळपास होती आणि वाजपेयी यांनी संपूर्ण पाच वर्षे पंतप्रधान म्हणून राज्यकारभार चालविला.
जवाहरलाल नेहरू यांना आंतरराष्ट्रीय क्षेत्रात जो सन्मान मिळाला होता, तेवढाच सन्मान वाजपेयी यांनाही मिळाला. वाजपेयी यांची १९९८-९९ ची कारकीर्द देशाच्या सामर्थ्याचे दर्शन संपूर्ण जगाला घडविणारी ठरली होती. अमेरिकेसह अनेक देशांच्या हेरगिरी उपग्रहांची नजर चुकवून त्यांनी मे १९९८ मध्ये राजस्थानच्या पोखरण येथे एकामागोमाग पाच अणुचाचण्या घेतल्या होत्या.
अविवाहित असलेले वाजपेयी हे कविमनाचेही आहेत. मध्यप्रदेशच्या ग्वाल्हेर येथे २५ डिसेंबर १९२४ रोजी त्यांचा जन्म झाला. कृष्णबिहारी वाजपेयी हे त्यांचे वडील आणि कृष्णा देवी या त्यांच्या मातोश्री. तब्बल पाच दशके त्यांची राजकीय कारकीर्द धडाडीचीच राहिली. १९५७ मध्ये ते सर्वप्रथम संसदेचे सदस्य झाले.
लहान वयातच ब्रिटिशांच्या वसाहतवादाला विरोध केल्याबद्दल त्यांना कारावासही भोगावा लागला होता. त्यानंतर ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संपर्कात आले. १९५० च्या दशकात रा. स्व. संघाच्या पाक्षिकाची जबाबदारी सांभाळण्यासाठी त्यांनी विधिविषयक शिक्षण अर्ध्यावरच सोडून दिले. संघाच्या माध्यमातून आपले सामाजिक जीवन सुरू करणारे वाजपेयी नंतर जनसंघ आणि त्यानंतर भाजपाशी संलग्न झाले. पण, भारतीय राजकारणाशी त्यांचा खरा संबंध १९४२-४५ या काळातील ‘भारत छोडो’ आंदोलनाच्या माध्यमातूनच आला होता. त्यावेळी ते कम्युनिस्टांसोबत होते. रा. स्व. संघाच्या संपर्कात आल्यानंतर त्यांची दिशा बदलली. श्यामाप्रसाद मुखर्जी यांचे अतिशय निकटचे अनुयायी म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली. १९५३ मध्ये श्यामाप्रसाद यांनी काश्मिरात बेमुदत उपोषण सुरू केले, त्यावेळी वाजपेयी त्यांच्या शेजारीच बसले होते. राज्यात प्रवेश करण्यासाठी परवान्याची सक्ती त्यावेळी सुरू करण्यात आली होती. याच व्यवस्थेविरोधात मुखर्जी यांनी हे उपोषण छेडले होते.
ऐतिहासिक दिवस : नरेंद्र मोदी
माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना आज शुक्रवारी भारतरत्न हा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान झाला. आजचा हा दिवस ऐतिहासिक असाच आहे, अशी प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली.
वाजपेयी ज्या क्षणी भारतरत्न स्वीकारत होते, तो क्षण आणि दिवस कोट्यवधी भारतीयांसाठी ऐतिहासिक असाच आहे, असे नमूद करताना मोदी यांनी आपल्या ट्विटरवर म्हटले आहे की, राष्ट्रपती प्रणव मुखर्जी वाजपेयी यांचा सन्मान करण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी गेले. राष्ट्रपतींनी यातून आपल्या सभ्यतेचेच दर्शन घडविले आहे. वाजपेयी यांनी आपले संपूर्ण आयुष्य देशसेवेसाठी खर्च केले. माझ्यासारख्या कोट्यवधी लोकांसाठी ते आदर्शच आहेत. त्यांचे संपूर्ण जीवन प्रेरणा देणारेच आहे. अटलजी भारतमातेचे खरे सुपुत्र आहेत. आपल्या आयुष्याचा प्रत्येक क्षण ते केवळ देशासाठीच जगले. त्यांना दीर्घायुष्य लाभो आणि त्यांची प्रकृती उत्तम राहो, हीच ईश्‍वरचरणी प्रार्थना, असेही मोदी यांनी म्हटले आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=21782

Posted by on Mar 28 2015. Filed under छायादालन, ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in छायादालन, ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (1845 of 2477 articles)


=राज्यसभेचे कामकाज संस्थगित करणार= नवी दिल्ली, [२७ मार्च] - भूमी अधिग्रहण अध्यादेशाची मुदत संपत असताना आणि विरोधकांच्या प्रखर विरोधामुळे अल्पमतात ...

×