Home » छायादालन, ठळक बातम्या, राष्ट्रीय, विज्ञान-तंत्रज्ञान » भारतीयांची स्वप्ने साकार होतील

भारतीयांची स्वप्ने साकार होतील

  • पंतप्रधानांचा विश्‍वास
  • ‘डिजिटल इंडिया’चा शुभारंभ
  • रक्तरहित सायबर युद्धाचा जगाला धोका

PM at Digital Indiaनवी दिल्ली, [१ जुलै] – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बुधवारी ‘डिजिटल इंडिया’ अभियानाचा शुभारंभ केला. संपूर्ण जगाला रक्तरहित सायबर युद्धाचा धोका निर्माण झाला आहे. या आव्हानाचा सामना करण्याकरिता आवश्यक असलेला तोडगा काढण्यासाठी भारतीयांनी पुढाकार घ्यायला हवा, असे प्रतिपादन पंतप्रधानांनी यावेळी केले. ‘डिजिटल शक्ती समजून घेणे आवश्यक आहे. यामुळे कोट्यवधी भारतीयांची स्वप्ने साकारणार आहेत, असा विश्‍वासही पंतप्रधानांनी यावेळी व्यक्त केला.
आज मी ‘डिजिटल इंडिया’ अभियानाला प्रारंभ करीत आहो, असे जाहीर करताना पंतप्रधानांनी देशात डिजिटल क्रांती घडवून आणण्याचे आवाहन युवकांना केले. भ्रष्टाचारासारखी समस्या हाताळणे, पारदर्शक आणि प्रभावी राज्यकारभार देणे, तसेच गरीब व श्रीमंत यातील पोकळी कमी करणे यातून सहज शक्य होणार आहे, असे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले. विशेष म्हणजे, देशातील बड्या उद्योगांनी या अभियानात ४.५ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. या समारंभात मंत्रिमंडळातील सदस्य आणि देश-विदेशातील बड्या उद्योगांचे प्रमुख आणि मुख्य कार्यकारी अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.
आता आपण ‘ई-गव्हर्नन्स’पासून ‘एम-गव्हर्नन्स’कडे पाऊल टाकले आहे. ‘एम-गव्हर्नन्स’चा अर्थ मोदी गव्हर्नन्स असा मुळीच नाही. याचा अर्थ आहे ‘मोबाईल गव्हर्नन्स’. डिजिटल शक्ती आपण समजून घ्यायलाच हवी. कारण, ती काळाची गरज आहे. आपण या बदलाला समजून घेतले नाही, तर जग आपल्यापासून दूर जाईल आणि आपण केवळ पाहत राहू, असे पंतप्रधान म्हणाले. यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते डिजिटल इंडियाच्या बोधचिन्हाचेही अनावरण करण्यात आले. १ ते ७ जुलै या काळात ‘डिजिटल सप्ताह’ साजरा करण्यात येणार आहे.
तरुणाईच्या शक्तीला आधुनिक शक्तीची जोड देणे आवश्यक आहे. देशात सुमारे २५ ते ३० कोटी इंटरनेट युझर्स आहेत. जगाच्या तुलनेत ही संख्या फार मोठी आहे. तसेच, भारतात इंटरनेट सेवांपासून वंचित असलेल्यांची संख्याही मोठी आहे. या डिजिटल इंडियाच्या माध्यमातून कोट्यवधी भारतीयांची स्वप्ने पूर्ण होणार असल्याची मला खात्री आहे. डिजिटल इंडियामुळे १८ लाख लोकांना रोजगार मिळेल, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला.

Short URL: https://vrittabharati.in/?p=23231

Posted by on Jul 2 2015. Filed under छायादालन, ठळक बातम्या, राष्ट्रीय, विज्ञान-तंत्रज्ञान. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in छायादालन, ठळक बातम्या, राष्ट्रीय, विज्ञान-तंत्रज्ञान (1585 of 2477 articles)


=आता शेतकरी करू शकणार मालाची ऑनलाईन विक्री= नवी दिल्ली, [१ जुलै] - कृषी क्षेत्राचे मान्सूनवर अवलंबून राहण्याचे प्रमाण कमी करण्यासाठी ...

×