Home » छायादालन, ठळक बातम्या, परराष्ट्र, राष्ट्रीय » भारत-अमेरिका यांच्यात अणुकरारावर सहमती

भारत-अमेरिका यांच्यात अणुकरारावर सहमती

  • सात वर्षांची कोंडी फुटली
  • तीन स्मार्ट सिटीजच्या विकासात सहकार्य, हॉटलाईन स्थापन करणार

Prime Minister Modi and US President Barack Obama at the Joint Press Interaction in New Delhiनवी दिल्ली, [२५ जानेवारी] – भारत आणि अमेरिका यांच्यात गेल्या सात वर्षांपासून रखडलेल्या अणुऊर्जा कराराचा मार्ग आज रविवारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातील मैत्रीपूर्ण चर्चेनंतर मोकळा झाला. ‘द डील इज डन’ अशी घोषणा ओबामा-मोदी यांच्यातील चर्चा आणि संयुक्त पत्रपरिषदेनंतर भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयातर्फे करण्यात आली..
हैदराबाद हाऊस येथे ओबामा आणि मोदी यांच्यात सुमारे तास भर चर्चा झाल्यानंतर दोन्ही नेत्यांनी संयुक्त पत्रपरिषदेला संबोधित केले. यावेळी बोलताना ओबामा यांनीही अणुऊर्जा करारातील अडथळे आता पूर्णपणे दूर झाले असल्याचे जाहीर केले. यामुळे भारतातील अणुभट्ट्यांना अपघात झाल्यास पुरवठादाराचे दायित्व निश्‍चित करण्यात आणि भारताच्या प्रस्तावित अणुऊर्जा प्रकल्पांना अमेरिका तसेच अन्य देशांकडून इंधनाचा पुरवठा करण्याशी संबंधित मुद्दे आता स्पष्ट होणार आहेत.
गेल्या अनेक वर्षांपासून निर्माण झालेला पेच आता सुटला आहे. करार पूर्ण करण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. आता कुठल्याच समस्या राहिल्या नाहीत, अशी घोषणा परराष्ट्र सचिव सुजाता सिंह यांनी केली.
तत्पूर्वी, या संयुक्त पत्रपरिषदेत बोलताना बराक ओबामा आणि नरेंद्र मोदी यांनी दोन्ही देशांमधील मैत्रीपूर्ण संबंध आणखी मजबूत करण्यावर भर दिला. संरक्षण आणि सुरक्षेसंदर्भात भारत-अमेरिका परस्पर सहकार्य नेहमीच कायम राहणार आहेत. उभय देशांमधील संबंध नव्या उंचीवर नेण्याचा आमचा निर्धार आहे, असे ओबामा यांनी सांगितले.
अजमेर, विशाखापट्टणम् आणि अलाहाबाद या तीन शहरांचा ‘स्मार्ट सिटी’ म्हणून विकास करण्याचे आश्‍वासन ओबामा यांनी दिले, असे सांगताना ओबामा यांनी मोदी यांचे ‘चाय पे चर्चे’साठी विशेष आभार मानले. मोदी यांचे मॅडिसन स्क्वेअर येथे बॉलीवूड अभिनेत्याप्रमाणेच स्वागत झाले होते, अशी आठवणही त्यांनी यावेळी करून दिली. नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले की, दहशतवादाविरोधी लढ्याबाबत दोन्ही देशांमध्ये एकमत झाले आहे. या शतकाच्या वाटचालीला एका व्यक्तिमत्त्वाप्रमाणे आकार देण्यासाठी भारत आणि अमेरिका संबंध महत्त्वाची भूमिका पार पाडणार आहे, असा आपल्याला विश्‍वास आहे. संबंध सुधारण्याला आणि त्यात बदल घडविण्यात शतकाच्या आरंभापासूनच सुरुवात केली आहे. मात्र, या चांगल्या सुरुवातीचे रूपांतर दीर्घकालीन प्रगतीमध्ये व्हावे, असेही मोदी यांनी सांगितले.
ओबामा यांच्यासोबत माझी चांगली मैत्री झाली आहे. आमच्या दोघांमध्ये खाजगीत बरीच चर्चा झाली. पण, ती गोपनीयच राहू द्या. आमच्यावर कोणताही देश किंवा व्यक्तीचा दबाव नाही. आम्हाला चिंता आहे ती भावी पिढीची. ज्या देशात अर्थव्यवस्था आणि सरकार मजबूत आहे, तिथे दहशतवादी आपली पाळंमुळं मजबूत करू शकत नाहीत, असेही मोदी म्हणाले. दोन्ही देशांमधील घनिष्ट मैत्रीमुळे संबंधात नवीन विश्‍वास निर्माण झाला आहे. या मैत्रीतूनच दोन्ही देशांचा विकास होणार आहे. प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्याचे आमचे निमंत्रण तुम्ही स्वीकारले, यासारखा दुसरा आनंद कोणताच नाही, असेही मोदी यांनी आवर्जुन सांगितले.
हॉटलाईन स्थापन करणार
दरम्यान, आजवरच्या इतिहासात प्रथमच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्यात हॉटलाईन स्थापन करण्यावर दोन्ही देश सहमत झाले आहेत. इतक्या सर्वोच्च पातळीवर अशा प्रकारची यंत्रणा स्थापन करण्याची ही पहिलीच वेळ आहे. या दोन्ही नेत्यांसोबतच दोन्ही देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांमध्येही हॉटलाईन राहणार आहे.
‘प्यार भरा नमस्कार’
ओबामा यांनी ‘नमस्ते’ असे हिंदीतून संबोधताना आपल्या संवादाला सुरुवात केली. ‘भारतवासीयोंको मेरा प्यार भरा नमस्कार ’ असेही हिंदीतून बोलत ओबामा यांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=20058

Posted by on Jan 26 2015. Filed under छायादालन, ठळक बातम्या, परराष्ट्र, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in छायादालन, ठळक बातम्या, परराष्ट्र, राष्ट्रीय (2179 of 2477 articles)


डॉ. विजय भटकर, हरीश साळवे यांना पद्म भूषण ७५ जणांचा पद्मश्रीने होणार गौरव नवी दिल्ली, [२५ जानेवारी] - भाजपाचे ...

×