भूकंपाने नेपाळ हादरले!

  • हजारावर बळी, असंख्य जखमी
  • ७.९ इतकी तीव्रता
  • आणिबाणी जाहीर=

nepal bhukampकाठमांडू, [२५ एप्रिल] – रिश्टर स्केलवर ७.९ इतकी तीव्रता असलेल्या भूकंपाच्या शक्तिशाली धक्क्याने आज शनिवारी संपूर्ण नेपाळ हादरले. या विनाशकारी भूकंपात हजारावर लोकांचा बळी गेला असून, असंख्य लोक जखमी झाले आहेत. युनिसेफकडून संवर्धन केल्या जाणार्‍या या देशातील अनेक ऐतिहासिक वारसा वास्तू, बहुमजली इमारती आणि असंख्य घरे जमीनदोस्त झाल्या असून, त्यांच्या ढिगार्‍याखाली शेकडो लोक दबले आहेत. नेपाळमध्ये शनिवार हा सुटीचा दिवस असल्याने हजारो नागरिक सुटीचा आनंद लुटण्यासाठी घराबाहेर पडले होते. पण, या भूकंपाने त्यांचा आनंद क्षणातच हिरावून घेतला. भूकंपामुळे निर्माण झालेल्या स्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन नेपाळ सरकारने देशात आणिबाणी जाहीर केली आहे.
काठमांडूच्या वायव्येकडे असलेल्या लामजंग येथे या भूकंपाचा केंद्रबिंदू होता. या भूकंपाचा परिणाम भारतासोबतच चीन, पाकिस्तान आणि बांगलादेशातही जाणवला. सकाळी ११ वाजून ५६ मिनिटांनी भूकंपाचा पहिला मोठा धक्का बसला. त्यानंतर असंख्य लहान-मोठे धक्के नेपाळच्या कानाकोपर्‍यात सुमारे दोन मिनिटांपर्यंत बसत राहिले, अशी माहिती अमेरिकन भूगर्भशास्त्र विभागाने दिली.
या भूकंपामुळे काठमांडू खोर्‍यात सर्वाधिक हानी झाली. दाट लोकसंख्या असलेल्या या खोर्‍यात शेकडो जणांचा बळी गेला आहे, असे गृहमंत्रालयातील अधिकार्‍याने सांगितले. राजधानीच्या शहरात युनिस्कोने संवर्धन केलेली दरबार स्क्वेअर ही जागतिक वारसा वास्तू पूर्णपणे उद्‌ध्वस्त झाली आहे. देशातील अनेक जिल्ह्यांमध्ये भूकंपाचे धक्के बसले असून, असंख्य इमारती, पक्क्या आणि कच्च्या घरांचे ढिगार्‍यात रूपांतर झाले आहे. येथील भारतीय दूतावासाच्या इमारतीलाही मोठे नुकसान झाले आहे, असे दूतावासातील प्रवक्ते अभय कुमार म्हणाले. दूतावासाने दोन हेल्पलाईन सुरू केल्या आहेत. भारतीय दूतावासाच्या इमारतीचेही नुकसान झाले असून, एका कर्मचार्‍याच्या मुलीचा मृत्यू झाला व त्याची पत्नी गंभीर जखमी आहे.
काठमांडूतील ऐतिहासिक धरहरा टॉवर, जनकपुरा भागातील प्रसिद्ध जानकी मंदिर या धक्क्यात जमीनदोस्त झाले आहेत. एव्हरेस्ट शिखरावरही भूकंपाच्या प्रभावाने हिमस्खलन झाल्यामुळे जवानांसह अनेक गिर्यारोहक बेपत्ता झाले आहेत. जवानांचा कॅम्प एक आणि दोनवर हिमस्खलन झाले. येथून आतापर्यंत १८ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. ढिगार्‍याखाली आणखी अनेकांचे मृतदेह दबले असण्याची शक्यता आहे. पहिल्या मोठ्या धक्क्यानंतर १२ वाजून १७ मिनिटांनी नेपाळला दुसरा मोठा धक्का बसला. त्याची तीव्रता रिश्टर स्केलवर ६.६ इतकी होती. ज्या भागात भूकंपाचा केंद्रबिंदू होता, तिथे प्रचंड हानी झाली आहे.
एकामागोमाग बसलेल्या असंख्य धक्क्यांमुळे नेपाळमधील मोबाईल आणि विद्युत सेवा पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. देशभरातील अनेक रस्ते खचले असून, महामार्गाला अनेक ठिकाणी तडे गेले आहेत. त्यामुळे अनेक भागांचा संपर्कही तुटला आहे. या भूकंपात नेमकी किती जीवित आणि संपत्तीची हानी झाली, याचा अंदाज बांधणे कठीण आहे. कारण, क्षणक्षणाला मृत व जखमींचा आकडा वाढत आहे.
सुटी असल्याने अनेक जण खरेदी करण्याकरिता, तर कुणी फिरण्याकरिता घराबाहेर पडले होते. मोठमोठे मॉल्स आणि थिएटर्सच्या भिंतींनाही तडे गेल्याने लोक स्वत:चा जीव वाचविण्यासाठी सैरावैरा धावत सुटले. पोलिस दल, अग्निशमन दल, सुरक्षा दलांच्या जवानांनी तातडीने मदत व बचाव मोहीम हाती घेत, ढिगारे उपसण्यास सुरुवात केली. आतापर्यंत ८७६ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असून, शेकडो जखमींना विविध रुग्णालयांमध्ये भरती करण्यात आले आहे. ढिगारे उपसण्याची मोहीम सुरूच असल्याने आणि जखमींपैकी अनेकांची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांचा आकडा नेमका किती होईल, हे सांगणे कठीण असल्याचे मदत व बचाव पथकातील अधिकारी तसेच वैद्यकीय सूत्राने सांगितले. अनेक रुग्णालयांमध्ये डॉक्टर व परिचारिकांची संख्या वाढविण्यात आली आहे. सर्वत्र अतिशय विदारक असेच चित्र आहे.
भारताकडून मदतीचा हात
भूकंपाने नेपाळला उद्‌ध्वस्त केल्याची माहिती कळताच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तातडीने नेपाळचे राष्ट्राध्यक्ष राम बरन यादव यांना फोन केला आणि भारतातर्फे सर्व प्रकारच्या मदतीची ग्वाही दिली. सध्या परदेश दौर्‍यावर असलेले पंतप्रधान सुशीलकुमार कोईराला यांच्याशी नरेंद्र मोदी यांचा संपर्क होऊ न शकल्याने त्यांनी थेट राम बरन यादव यांना फोन केला. या कठीण समयी भारत देश नेपाळ आणि तेथील जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. सर्वच प्रकारचे सहकार्य करण्याची आमची तयारी आहे. आवश्यक सामग्री आणि मदतीचे साहित्य पोहोचविण्यासाठी आम्ही आपली विमानेही सज्ज ठेवली आहे. इशारा मिळताच ही विमाने नेपाळकडे रवाना होतील, असे पंतप्रधानांनी ट्विटरवर नमूद केले आहे. दरम्यान, भारत संचार निगम लिमिटेडनेही नेपाळसाठी आपल्या सर्वच प्रकारच्या कॉल्सच्या दरात कपात जाहीर केली आहे. आगामी तीन दिवसांकरिता ही दरकपात लागू राहणार आहे.
महाराष्ट्रातील ५५६ पर्यटक सुरक्षित
शक्तिशाली भूकंपाने एकीकडे नेपाळचा बहुतांश भाग उद्‌ध्वस्त झाला असतानाच, पर्यटनासाठी त्या देशात गेलेले महाराष्ट्रातील ५५६ नागरिक मात्र सुरक्षित असल्याची माहिती आहे. या पर्यटकांमध्ये नाशिकहून चौधरी ट्रॅव्हल्सतर्फे गेलेले १००, वीणा वर्ल्डमधून गेलेले ४०० आणि केसरी टूर्सने गेलेल्या ५६ पर्यटकांचा समावेश आहे. त्यांच्या नातेवाईकांचा सर्व पर्यटकांशी संपर्क झाला असून, हे सर्वच जण सुरक्षित असल्याची माहिती आहे. एप्रिल महिन्यातही महाराष्ट्रातून शेकडो पर्यटक नेपाळमध्ये पशुपतीनाथ मंदिराच्या दर्शनाला जातात.
ऐतिहासिक धरहरा टॉवर भुईसपाट
युनिसेफतर्फे जोपासले जाणारे आणि जागतिक वारसा म्हणून जाहीर करण्यात आलेले काठमांडू येथील ऐतिहासिक नऊ मजली धरहरा टॉवर भूकंपामुळे काही क्षणातच पूर्णपणे भुईसपाट झाले. हे टॉवर जमीनदोस्त झाले, त्यावेळी तिथे ४५० पेक्षा जास्त नागरिक होते. नेपाळमधील ‘कुतूबमिनार’ अशी ओळख असलेल्या या टॉवरच्या ढिगार्‍याखाली हे सर्वच नागरिक गाडले गेले असून, या भागातही मदत व बचाव मोहीम युद्धपातळीवर हाती घेण्यात आली आहे. आतापर्यंत १८० मृतदेह येथून बाहेर काढण्यात आले आहेत. नेपाळचे तत्कालीन पंतप्रधान भीमसेन थापा यांनी ६१.८८ मीटर उंचीचे हे टॉवर उभारले होते. या इमारतीच्या आठव्या मजल्यावरून काठमांड शहराचे विहंगम दृश्य दिसत असे. .
आम्हाला या भीषण संकटाच्या काळात आंतरराष्ट्रीय सहकार्य हवे आहे. ही स्थिती स्वबळावर हाताळणे आम्हाला शक्य नाही. अशी स्थिती हाताळण्याचा अनुभव असणार्‍या आंतरराष्ट्रीय संस्थांनी तातडीने पुढे यावे, असे आवाहन नेपाळ सरकारने केले आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=22268

Posted by on Apr 26 2015. Filed under आंतरराष्ट्रीय, आशिया, छायादालन, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in आंतरराष्ट्रीय, आशिया, छायादालन, ठळक बातम्या (1762 of 2483 articles)


=सर्वाधिक बळी बिहारमध्ये= नवी दिल्ली, [२५ एप्रिल] - नेपाळमध्ये केंद्रबिंदू असलेल्या भूकंपाचे जबरदस्त हादरे उत्तर आणि पूर्व भारताच्या बहुतांश भागांना ...

×