Home » छायादालन, ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद » भूमी अधिग्रहण विधेयक शेतकर्‍यांच्या हिताचेच

भूमी अधिग्रहण विधेयक शेतकर्‍यांच्या हिताचेच

  • तर बदल करण्याची तयारी
  • श्रेय तुम्ही घ्या, पण विधेयक पारित करायला सहकार्य करा
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विरोधकांना आवाहन

pm-modi-budget-session 2015नवी दिल्ली, [२७ फेब्रुवारी] – भूमी अधिग्रहण विधेयक हे पूर्णपणे शेतकर्‍यांच्या हिताचेच आहे. या विधेयकातील एकही तरतूद शेतकर्‍यांच्या विरोधात असल्याचे कुणी दाखवून दिले, तर ती बदलण्याची आणि विधेयकात आवश्यक त्या सुधारणा करण्याची आपली तयारी आहे, असे स्पष्ट प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शुक्रवारी लोकसभेत केले.
राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर लोकसभेत झालेल्या चर्चेला उत्तर देताना पंतप्रधान मोदी आपल्या तासाभराच्या भाषणात विरोधकांचा खरपूस समाचार घेतला. यावेळी मोदी म्हणाले की, संपुआ सरकारने पारित केलेल्या भूमी अधिग्रहण विधेयकातील काही त्रुटी दूर करण्याचा प्रयत्न आपल्या सरकारने केला आहे. आपलेच विधेयक सर्वोत्कृष्ट होते, त्यात चुका राहूच शकत नाही, अशा अहंकारात कुणीही राहू नये. संपुआ सरकारच्या काळातील विधेयक २०१३ मध्ये पारित करायला आम्हीच सहकार्य केले, त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम केले. हे विधेयक तुम्ही केवळ स्वत:च्या राजकीय फायद्यासाठीच आणले होते, याची जाणीव असतानाही आम्ही तुम्हाला सहकार्य केले होते. त्यामुळे शेतकर्‍यांच्या व्यापक हितासाठी आणि देशाच्या विकासासाठी आता कॉंग्रेससह सर्वांनीच हे विधेयक पारित करायला सहकार्य केले पाहिजे.
कॉंग्रेसशासित राज्यांसह बहुतेक सर्वच राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी भूमी अधिग्रहण विधेयकात सुधारणा करण्याची आणि शेतकर्‍यांच्या हिताच्या काही तरतुदी समाविष्ट करण्याची मागणी केली होती. त्यामुळेच आम्हाला सुधारित विधेयक आणावे लागले. संघराज्य रचनेतील मुख्यमंत्र्यांच्या सूचनांकडेही दुर्लक्ष करण्याइतके आपण अहंकारी झालो आहोत का? शेतकर्‍यांच्या हितासाठी हा प्रतिष्ठेचा मुद्दा बनवू नका. तुम्हाला याचे श्रेय पाहिजे असेल तर अवश्य घ्या, त्यासाठी वाटले तर आंदोलन करा, धरणे द्या. मात्र, कोणत्याही स्थितीत विधेयक पारित करायला सहकार्य करा. मला याचे श्रेय मुळीच नको आहे, तुम्हाला जाहीरपणे श्रेय देण्याचीही माझी तयारी आहे. पण, आपण शेतकर्‍यांच्या हिताकडे दुर्लक्ष करू शकत नाही. चुका दुरुस्त करणे ही आपल्या सर्वांचीच जबाबदारी नाही का? तुम्ही आजवर जे केले, ते आम्ही नाकारत नाही. पण, आता त्यात आणखी काही चांगले करावे लागणारच आहे, असे मोदी यांनी स्पष्ट केले.
नवा भूमी अधिग्रहण कायदा यायला १२० वर्षे लागली. १८९४ नंतर २०१३ मध्येच नवीन कायदा अस्तिवात आला. शेतकर्‍यांचे खरे नुकसान कोणामुळे झाले, याचा मनापासून विचार करण्याची आता नितांत गरज आहे. भूमी अधिग्रहण होत नसल्याने संरक्षण खात्याचे अनेक प्रकल्प अडले होते, या प्रकल्पांच्या कामाला तातडीने गती द्यावी, अशी मागणी संरक्षण खात्याचे अधिकारी आणि कर्मचार्‍यांनी आमच्याकडे केली होती, त्यामुळे हे विधेयक आणावे लागले. देशाच्या पश्‍चिमी भागाचा जसा विकास झाला, तसाच विकास पूर्वोत्तर भागांचाही झाला पाहिजे आणि विकासासाठी जमीन लागणार आहे, असे पंतप्रधान म्हणाले.
विविध मुद्यांवरून होणार्‍या टीकेचा मोदी यांनी यावेळी खरपूस समाचार घेतला तसेच आपल्या सरकारने जनतेच्या कल्याणासाठी आतापर्यंत केलेल्या विविध उपाययोजनांचा सविस्तर आढावाही सादर केला. हे करताना संपुआ सरकारच्या चुकीच्या धोरणावर त्यांनी जोरदार हल्ला चढवला. माझ्या विदेश धोरणावर विरोधक टीका करतात. पण, विदेशातील प्रत्येक क्षणाचा मी देशवासीयांच्या कल्याणासाठी उपयोग केला. त्यासाठी अनेक शास्त्रज्ञांना भेटलो. त्यांच्याशी चर्चा केली. सिकलसेल हा आपल्याकडे गंभीर आजार आहे, त्यावर कशा पद्धतीने मात करता येईल, यासाठी चर्चा केली, असे मोदी यांनी सांगितले.
दिल्लीत आमचा पराभव झाल्याचे तुणतुणे सर्वच जण वाजवत आहेत. पण, त्यानंतर मध्यप्रदेश, पंजाब, राजस्थान आणि आसामात झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपाला निर्विवाद विजय मिळाला, याकडेही मोदी यांनी लक्ष वेधले.
मनरेगा हे संपुआ सरकारच्या अपयशाचे प्रतीक
मनरेगा आम्ही बंद करणार असल्याची चर्चा आहे. मात्र, मनरेगा आम्ही कधीच बंद करणार नाही. कारण, मनरेगा हे संपुआ सरकारच्या अपयशाचे जिवंत स्मारक आहे. संपुआ सरकारने लोकांना खड्डे खोदायच्या कामाला लावले, हेे देशाला दाखविण्याचे हे उदाहरण आहे, त्यामुळे मनरेगा कधीच बंद करणार नाही, असा टोला मोदी यांनी लगावला.
भ्रष्टाचाराने देशाला बर्बाद केले. त्यामुळे भ्रष्टाचारावर राजकीय चौकटीत चर्चा व्हायला नको, असे स्पष्ट करीत मोदी म्हणाले की, यापुढे भ्रष्टाचार होऊ देणार अशा इच्छाशक्तीची आज गरज आहे. सरकार जर नीतीने चालत असेल तर भ्रष्टाचार करण्याची कुणाची हिंमतच होणार नाही. भ्रष्टाचारमुक्त व्यवस्था विकसित करण्याचा आमचा प्रयत्न आहे, भ्रष्टाचार पूर्णपणे नाहीसा होणार नाही, हे आम्हाला माहीत आहे. पण, तो कमीत कमी करण्याचा आमचा प्रयत्न आहे. भ्रष्टाचार कमी करण्यासाठी तुम्ही सूचना करा, असे माझे सर्वांना आवाहन आहे. काळा पैसा आम्ही परत आणला नाही, असे म्हटले जाते. आधी या मुद्यावर चर्चा करायलाही लोक घाबरत होते. मात्र, आमच्या काळात काळ्या पैशावर चर्चा तरी सुरू आहे आणि याचाच मला आनंद आहे. काळ्या पैशाच्या मुद्यावर सर्वोच्च न्यायालयाने एसआयटी स्थापन करण्याचे आदेश दिले होते, पण संपुआ सरकारने एसआयटी स्थापन केली नाही. त्यामुळे सत्तेवर येताच मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत आम्ही एसआयटी स्थापन करण्याचा निर्णय घेतला, याकडे लक्ष वेधत मोदी म्हणाले की, काळा पैसा परत आणण्यासाठी आम्ही अनेक उपाययोजना केल्या. काळा पैसा देशात परत आणल्याशिवाय राहणार नाही. या मार्गापासून आम्ही हटणार नाही. कुणीही आमच्या हातून सुटणार नाही, सूडाच्या भावनेतून कारवाई करणार नाही. पण, दोषी मग तो कुणीही असो त्याला सोडणार नाही, असे सांगताना, काळा परत आणण्यासाठी अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केलेल्या प्रयत्नांचे मोदी यांनी कौतुक केले.
मोदी यांनी आपल्या भाषणात कॉंग्रेसचा तर खरपूस समाचार तर घेतलाच. सपा प्रमुख मुलायमसिंह यादव यांनाही जोरदार टोले लगावले. तीन महिने होऊनही वाराणसीच्या अस्सी घाटाची स्वच्छता झाली नाही, असा आरोप करणारे नेताजी केंद्र सरकारचे रिपोर्ट कार्ड सादर करत आहे की त्यांच्या पक्षाच्या राज्यसरकारचे, असा टोला पंतप्रधान मोदींनी लगावला. पंतप्रधानांच्या भाषणाला भाजपा सदस्यांनी अनेकवेळा दाद दिली. सभागृहात यावेळी गृहमंत्री राजनाथसिंह, परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज, कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, सपाचे मुलायमसिंह यादव, माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा, कॉंग्रेसचे गटनेते मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह सर्व पक्षांचे नेते उपस्थित होते.
राजीव सातव यांना कानपिचक्या
दरम्यान, पंतप्रधानांचे भाषण संपल्यानंतर हिंगोली येथील कॉंगे्रस खासदार राजीव सातव यांनी त्यांच्या भाषणावर आक्षेप घेण्याचा प्रयत्न केला असता, पंतप्रधानांनी त्यांना अस्खलीत मराठीतून ‘जरा सबुरीने घ्या’ अशा शब्दात कानपिचक्या दिल्या.
कॉंग्रेसला काढलेले चिमटे
मनरेगा कायम राहील, याची मी काळजी घेणार आहे. कारण, ही योजना तुमच्या (कॉंगे्रस) अपयशाचे सर्वात मोठे प्रतीक आहे. अनेक वर्षे सत्तेत राहिल्यानंतर गरिबांना काहीतरी देण्याच्या नावाखाली तुम्ही निव्वळ खड्डेच खोदून ठेवले आहेत. माझा राजकीय विवेक मला हेच सांगत आहे की, मी ही योजना कायम ठेवावी.
आजवरच्या इतिहासात तुम्ही इतकी सुमार कामगिरी कधीच केली नाही. भू-संपादन कायदा तुमचाच आहे. तो घेऊन तुम्ही निवडणुकीच्या मैदानात उतरला आणि हरलात. आणिबाणीच्या काळातही तुमचा इतका दारुण पराभव झाला नव्हता. भू-संपादन कायद्याने जर जिंकणे शक्य असते, तर तुम्ही सहज जिंकले असते.
भारताचा जन्म १९४७ मध्ये झाला, यावर आम्ही मुळीच विश्‍वास ठेवणार नाही. भारताचे अस्तित्व हजारो वर्षांआधीचे आहे. सरकारे येतात आणि जातात. पण, देशाला घडविणारे या देशाचे नागरिक आहेत, त्यांच्या शक्तीमुळेच देश उभा आहे.
तुम्ही जेव्हा भू-संपादन विधेयक पारित केले, तेव्हा आम्हीच (भाजपा) तुम्हाला पाठिंबा दिला होता. केवळ राजकीय फायद्यासाठी तुम्ही हे विधेयक घाईघाईने आणले होते, याचीही माहिती आम्हाला होती.
जे लोक कालपर्यंत काळ्या पैशाबाबत बोलत नव्हते, ते आता बोलू लागले आहेत, हे बघून मला आनंद होत आहे. काळ्या पैशाचा मुद्दा आम्ही राष्ट्रीय अजेंड्यावर आणला आहे, हे आमचे फार मोठे यश आहे.
पंतप्रधानांनी कॉंग्रेसला काढलेले पाच चिमटे
१) मनरेगा कायम राहील, याची मी काळजी घेणार आहे. कारण, ही योजना तुमच्या (कॉंगे्रस) अपयशाचे सर्वात मोठे प्रतीक आहे. अनेक वर्षे सत्तेत राहिल्यानंतर गरिबांना काहीतरी देण्याच्या नावाखाली तुम्ही निव्वळ खड्डेच खोदून ठेवले आहेत. माझा राजकीय विवेक मला हेच सांगत आहे की, मी ही योजना कायम ठेवावी.
२) आजवरच्या इतिहासात तुम्ही इतकी सुमार कामगिरी कधीच केली नाही. भू-संपादन कायदा तुमचाच आहे. तो घेऊन तुम्ही निवडणुकीच्या मैदानात उतरला आणि हरलात. आणिबाणीच्या काळातही तुमचा इतका दारुण पराभव झाला नव्हता. भू-संपादन कायद्याने जर जिंकणे शक्य असते, तर तुम्ही सहज जिंकले असते.
३) भारताचा जन्म १९४७ मध्ये झाला, यावर आम्ही मुळीच विश्‍वास ठेवणार नाही. भारताचे अस्तित्व हजारो वर्षांआधीचे आहे. सरकारे येतात आणि जातात. पण, देशाला घडविणारे या देशाचे नागरिक आहेत, त्यांच्या शक्तीमुळेच देश उभा आहे.
४) तुम्ही जेव्हा भू-संपादन विधेयक पारित केले, तेव्हा आम्हीच (भाजपा) तुम्हाला पाठिंबा दिला होता. केवळ राजकीय फायद्यासाठी तुम्ही हे विधेयक घाईघाईने आणले होते, याचीही माहिती आम्हाला होती.
५) जे लोक कालपर्यंत काळ्या पैशाबाबत बोलत नव्हते, ते आता बोलू लागले आहेत, हे बघून मला आनंद होत आहे. काळ्या पैशाचा मुद्दा आम्ही राष्ट्रीय अजेंड्यावर आणला आहे, हे आमचे फार मोठे यश आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=20945

Posted by on Feb 28 2015. Filed under छायादालन, ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in छायादालन, ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद (2007 of 2477 articles)


=जनस्थान पुरस्काराचे थाटात वितरण= नाशिक, [२७ फेब्रुवारी] - समाजाचे निरीक्षण सूक्ष्मपणे नोंदवित असताना परिवर्तनाचे बीजारोपण करण्याचे कार्य अरुण साधू यांच्या ...

×