Home » छायादालन, ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » महिलांना ईश्‍वरीशक्ती; सशक्त करणारे आपण कोण?

महिलांना ईश्‍वरीशक्ती; सशक्त करणारे आपण कोण?

  • आत्मविश्‍वास जागृत करीत देशाच्या विकासात योगदान द्यावे : पंतप्रधान
  • महिला लोकप्रतिनिधींच्या राष्ट्रीय परिषदेचा समारोप

Prime Minister Narendra Modi addressing at the valedictory session of the National Conference of Women Legislatorsनवी दिल्ली, [६ मार्च] – महिला या मुळातच सशक्त असतात. पुरुषांनी त्यांना सशक्त करण्याची गरज नाही, तर त्यांना शक्तीची ईश्‍वरदत्त देणगी मिळाली असते. त्यामुळे महिलांनी आपला आत्मविश्‍वास जागृत करीत देशाच्या विकासात योगदान द्यावे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रविवारी केले.
देशाच्या निर्माणात महिला लोकप्रतिनिधींचे योगदान या विषयावर आयोजित महिला लोकप्रतिनिधींच्या द्विदिवसीय राष्ट्रीय परिषदेचा समारोप करताना पंतप्रधान मोदी बोलत होते. संसदेच्या केंद्रीय कक्षात झालेल्या या समारंभाला माजी राष्ट्राध्यक्षा प्रतिभाताई पाटील आणि लोकसभेच्या सभापती सुमित्रा महाजन उपस्थित होत्या.
महिलांना सशक्त करण्याची गरजच नाही, त्या स्वत:च सशक्त आहेत. फक्त त्यांनी आपल्यातील ताकद ओळखण्याची गरज आहे, याकडे लक्ष वेधत मोदी म्हणाले की, गरज आता महिलांच्या विकासाची नाही, तर तर त्यांनी देशाच्या विकासात आपले योगदान देण्याची आहे. महिलांनी आपल्या नेतृत्वात देशाचा विकास घडविण्याची गरज आहे. ज्या कुटुंबात महिला नसतात, त्यातील पुरुष आपल्यावरील जबाबदारी योग्यप्रकारे पार पाडू शकत नाही. जास्त काळ ते जगूही शकत नाही. याउलट ज्या कुटुंबात पुरुष नसतात, त्या कुटुंबातील महिला सर्व आव्हानांचा यशस्वीपणे मुकाबला करतात आणि जास्त काळ जगतातही. आव्हानांचा सामना करण्याची नैसर्गिक देणगी महिलांना मिळाली असते. याचा उपयोग त्यांनी स्वत:च्या विकासासाठी करीत देशाच्या विकासातही आपले योगदान दिले पाहिजे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
व्यवस्थापन क्षेत्रातील मल्टिटास्किंग संकल्पनेचा संदर्भ देत मोदी म्हणाले की, महिला या मुळातच बहुमुखी प्रतिभेच्या धनी असतात. एकाच वेळी अनेक आव्हानांना सामोरे जाण्याची त्यांची क्षमता असते. आपल्या कौटुंबिक जबाबदारीसोबत महिला अन्य क्षेत्रातील जबाबदार्‍याही अतिशय प्रभावीपणे पार पाडत असतात. संधीचा अनुकूल उपयोग करण्याची क्षमता पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये जास्त असते.
रवांडामध्ये झालेल्या एका दुदैवी घटनेचा उल्लेख करीत मोदी म्हणाले की, थिथे मोठ्या संख्येत पुरुषांची हत्या झाल्यावर तेथील महिलांनी घाबरून न जाता अतिशय हिंमतीने संपूर्ण देशाची जबाबदारी उचलली आणि यशस्वीपणे सांभाळलीही.
अर्थसंकल्पीय तरतुदीमुळे देश उभा होत नाही. रस्ते आणि इमारतींमुळे देश निर्माण होत नाही, तर देश उभा होतो, तेथील लोकांमुळे आणि या लोकांना शक्ती देण्याचे काम आई आणि अन्य रुपात महिलाच करीत असतात, असे स्पष्ट करीत मोदी म्हणाले की, अशा परिषदेत होणार्‍या चर्चा आणि ओळखींचा उपयोग महिला लोकप्रतिनिधींनी आपल्या विकासासाठी करून घेतला पाहिजे. लोकप्रतिनिधी म्हणून आपल्याला मिळालेली जबाबदारी त्यांनी प्रामाणिकपणे पार पाडली पाहिजे. महिला लोकप्रतिनिधींनी कार्यपालिकेची ओळख करून घेत कायद्यातील त्रुटी आणि त्यातील सकारात्मक बाजू समजून घेतली पाहिजे. आपापल्या भागात संपर्क वाढवत आपले स्थान निर्माण केले पाहिजे.
महिला खासदारांनी आपापल्या मतदारसंघात जाऊन राजकीय मतभेद दूर सारत स्थानिक पातळीवरील महिला लोकप्रतिनिधींशी चर्चा करीत त्यांच्या समस्या समजून घेतल्या पाहिजे, असे आवाहन करीत मोदी म्हणाले की, महिलांनी माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्राची ओळखही करून घेतली पाहिजे. नवे तंत्रज्ञान आत्मसात करीत त्याचा उपयोग लोकांच्या समस्या सोडविण्यासोबत आपला संपर्क वाढविण्यासाठी केला पाहिजे.
लोकसभा आणि राज्यसभेतील महिला खासदारांनी ईफ्लॅटफॉर्म तयार करण्याचे आवाहन करत मोदी म्हणाले की, महिला खासदार जेव्हा सांसदीय समित्यांच्या दौर्‍यावर जातात, तेव्हा त्यांनी त्या भागातील महिला लोकप्रतिनिधींशी संपर्क साधत त्यांच्या समस्या समजून घेत आपला संपर्कही वाढवला पाहिजे. या संपर्काचा उपयोग त्यांना सभागृहात काम करताना आणि जनतेचे प्रश्‍न मांडताना होईल.
प्रतिभाताई पाटील
महिलांनी संघटित होत राजकारणातील धनशक्ती आणि गुंडशक्तीचा सामना केला पाहिजे, असे आवाहन माजी राष्ट्राध्यक्षा प्रतिभाताई पाटील यांनी यावेळी केले.
मुलींना शिकवले पाहिजे, त्यांचा आत्मविश्‍वास वाढवला पाहिजे, तसेच त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबीही बनवले पाहिजे, असे स्पष्ट करीत पाटील म्हणाल्या की, महिलांवर अन्याय करण्याची पुरुषांची मानसिकता बदलली पाहिजे, असे नेहमी म्हटले जाते. पण, महिलांचा आदर करावा, त्यांना त्रास देऊ नये, असे धडे मुलांना प्राथमिक शाळेतील शिक्षणासोबतच दिले पाहिजे, तेव्हा कुठे त्यांची मानसिकता बदलेल. महिलांकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोनही बदलेले. राजकारणातील महिलांचा सहभाग वाढला तर देशाचे चित्र बदलल्याशिवाय राहणार नाही, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला.
सुमित्रा महाजन यांनी परिषदेच्या यशस्वीतेसाठी काम करणार्‍या महिला खासदारांचा गौरवपूर्ण उल्लेख करीत सर्वांचे आभार मानले. दोन दिवसांच्या परिषदेत मांडण्यात आलेल्या प्रस्तावांची माहिती डॉ. हिना गावित, अर्चना चिटणीस आणि के. गीता यांनी दिली. कार्यक्रमाचे संचालन पुनम मादान यांनी केले.
या परिषदेच्या यशस्वितेसाठी सुप्रिया सुळे, पुनम महाजन, पुनम मादान, डॉ. हिना गावित, सुश्मिता सेन, के. गीता. आणि के. सविता या महिला खासदारांनी काम केले.
सुषमा स्वराज यांचे कौतुक
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांचे मनमोकळे कौतुक केले. आजपर्यंत देशात अनेक परराष्ट्र मंत्री झाले, पण सुषमा स्वराज यांनी परराष्ट्र मंत्री म्हणून जेवढे प्रभावी आणि सकारात्मक काम केले, तेवढे याआधी कोणीच केले नाही. विशेष म्हणजे यावेळी सुषमा स्वराज संसदेच्या केंद्रीय कक्षात उपस्थित होत्या.

Short URL: https://vrittabharati.in/?p=27083

Posted by on Mar 7 2016. Filed under छायादालन, ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in छायादालन, ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (747 of 2477 articles)


=अनुपम खेर यांचा चिमटा= नवी दिल्ली, [६ मार्च] - सहिष्णू व असहिष्णुतेच्या मुद्यावर विरोधकांनी राजकारण सुरू केले असताना, ज्येष्ठ अभिनेते ...

×