Home » आंतरराष्ट्रीय, आशिया, छायादालन, ठळक बातम्या » मॉरिशसने हिंदीची खूप सेवा केली

मॉरिशसने हिंदीची खूप सेवा केली

=पंतप्रधानांचे गौरवोद्‌गार, सायबर सिटीच्या विकासासाठी मदतीची घोषणा=

पोर्ट लुईस, [१२ मार्च] – मॉरिशस या छोट्याशा देशाने हिंदी भाषेची खूप सेवा केली आहे, असे गौरवोद्‌गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी येथे काढले.
मॉरिशसचे स्वत:चे हिंदी साहित्य आहे आणि या हिंदीमधून कामगारांची भक्ती दिसून येते, असे पंतप्रधान मोदी यांनी गुरुवारी येथे आयोजित एका कार्यक्रमाला संबोधित करताना सांगितले. मातृभाषेचा महिमा सांगताना पंतप्रधान म्हणाले की, कोणतीही मातृभाषा ही थेट हृदयातून बाहेर पडते. जेव्हा कुणी आपल्या भाषेतून बोलतो तेव्हा ती गोष्ट त्याच्या हृदयापासून निघत असते. याउलट एखादी दुसरी भाषा आधी मनात येते आणि नंतर प्रकट होते, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले. मॉरिशसमध्ये असलेला लघुभारत बघून आपलेपणाची जाणीव होते, असे सांगतानाच पंतप्रधान मोदी यांनी मॉरिशसच्या जनतेचे आभार मानले.
आणखी एका कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान मोदी यांनी सायबर सिटी विकसित करण्यासाठी मॉरिशसला मदत करण्यास भारत तयार असल्याचे सांगितले. एवढेच नव्हे तर दुहेरी कररचनेसंदर्भात असलेल्या कराराचा दुरुपयोग थांबविण्यावरही पंतप्रधानांनी भर दिला. गेल्या काही काळात मॉरिशसने वेगाने विकास केला आहे, असेही पंतप्रधान यावेळी म्हणाले. वाजपेयी सरकारने याठिकाणी सायबर सिटी विकसित करण्यासाठी मदत केली होती. भारत पुन्हा एकदा यासाठी मॉरिशसला सहकार्य करण्यास तयार आहे. भारत आणि मॉरिशस यांच्यात अनेक गोष्टींबाबत साम्य आहे. या दोन्ही देशांमध्ये होळी, दिवाळी, महाशिवरात्र अशाप्रकारचे सण मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. याशिवाय दोन्ही देशांमध्ये पूर्ण बहुमताचे सरकार आहे आणि दोन्ही देशांमध्ये संसदेच्या सभागृहाच्या सभापती महिलाच आहेत, याकडेही मोदी यांनी लक्ष वेधले.
गंगा तलावाची केली पूजा
तत्पूर्वी, सध्या मॉरिशसच्या दौर्‍यावर असलेले पंतप्रधान मोदी यांनी गुरुवारी सकाळी गंगा तलावाची पुजाअर्चना केली आणि लोकांचे लक्ष नद्यांच्या संरक्षणाकडे आकर्षित केले. पोर्ट लुईस येथील गंगा तलावात आधी गंगाजल टाकण्यात आले. त्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी संपूर्ण धार्मिक रितीरीवाजासह गंगा तलावाची पूजा केली. पंतप्रधानांनी मॉरिशसच्या राष्ट्रीय दिनानिमित्त स्थानिक जनतेला शुभेच्छाही दिल्या. या विशेष प्रसंगी मॉरिशसच्या जनतेत उपस्थित असल्याचा विशेष आनंद आहे, असे मोदी यांनी स्थानिक जनतेला शुभेच्छा देताना म्हटले.
५० कोटी डॉलर्सची मदत
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पायाभूत सुविधांच्या महत्त्वाच्या प्रकल्पांकरिता मॉरिशसला ५० कोटी डॉलर्सची आर्थिक मदत देण्याची घोषणा केली. मॉरिशसचे पंतप्रधान अनिरुद्ध जगन्नाथ यांच्याशी पंतप्रधान मोदी यांनी सविस्तर चर्चा केली आणि यावेळी पाच द्विपक्षीय करारांवर स्वाक्षरी करण्यात आली.

Short URL: https://vrittabharati.in/?p=21327

Posted by on Mar 13 2015. Filed under आंतरराष्ट्रीय, आशिया, छायादालन, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in आंतरराष्ट्रीय, आशिया, छायादालन, ठळक बातम्या (1937 of 2483 articles)


=इंदू मिलमध्ये डॉ बाबासाहेबांचे स्मारक= मुंबई, [१२ मार्च] - भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदू मिलमधील प्रस्तावित स्मारकाचे ...

×