Home » अमेरिका, आंतरराष्ट्रीय, छायादालन, ठळक बातम्या » मोदींच्या रंगात रंगले टोरांटो

मोदींच्या रंगात रंगले टोरांटो

  • पंतप्रधानांचे ओजस्वी भाषण
  • मोदी… मोदी… जयघोष
  • मॅडिसन स्क्वेअर गार्डनच्या आठवणी ताज्या
  • दहा हजार भारतीयांची उपस्थिती
  • देशात चतुरंग क्रांती आणण्यास कटिबद्ध
  • सरकारच नव्हे, देशाचा मूडही बदलला
  • विकास हाच सर्व समस्यांवरील उपाय
  • स्कॅम इंडियाला स्कील इंडियात बदलणार =

टोरांटो, [१६ एप्रिल] – दहा महिन्यांपूर्वी भारतात झालेल्या ऐतिहासिक सत्ताबदलामुळे केवळ सरकार बदलले असे नसून, विश्‍वासाचे वातावरण निर्माण झाल्यामुळे देशाचा मूडही बदलला आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी रात्री येथे केले.
तीन देशांच्या दौर्‍याच्या अखेरच्या टप्प्यात सध्या कॅनडात असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथील रिको कॉलिजियम सभागृहात उपस्थित दहा हजारांपेक्षा जास्त भारतीयांसमोर हिंदीत ओजस्वी भाषण केले आणि भारताला नव्या उंचीवर नेण्यासाठी आपल्या मनातील संकल्पना मूळ भारतीयांसमोर मांडल्या. यावेळी मोदींच्या भाषणातील प्रत्येक वाक्यानंतर होणारा टाळ्यांचा कडकडाट आणि मोदी… मोदी… चा गजर यामुळे पंतप्रधान मोदी यांनी गेल्यावर्षी न्यूयॉर्कच्या ऐतिहासिक मॅडिसन स्क्वेअर गार्डन येथे उपस्थित हजारो भारतीयांसमोर केलेल्या भाषणाच्या स्मृती पुन्हा एकदा जाग्या झाल्या. मोदींचे आगमन होण्यापूर्वी भारतीय संस्कृतीची ओळख करून देणारा एक दिमाखदार कार्यक्रम सादर करण्यात आला. प्रख्यात गायक सुखविंदरसिंगने या कार्यक्रमात बहार आणली.
सुमारे तासाभरापेक्षा जास्त वेळ केलेल्या भाषणात मोदींनी सभागृहात उपस्थित भारतीयांची मने जिंकून घेतली. आपल्या भाषणात मोदी म्हणाले की, आज भारतासमोर अनेक समस्या आ वासून उभ्या आहेत. परंतु, या समस्यांवर मात करण्यासाठी एकच उपाय आहे… असे म्हणताच उपस्थितांनी मोदी… मोदी… असा गजर केला. परंतु, मोदी हा समस्यांवरील उपचार नसून विकासामुळे सर्व समस्यांचे निराकरण करणे शक्य आहे, असे मोदी म्हणाले. मोदींनी आपल्या भाषणात राष्ट्रध्वजातील भगवा, पांढरा, हिरवा आणि निळा या चार रंगाचा उल्लेख केला आणि दुसर्‍या श्‍वेत व हरित क्रांतीसह ऊर्जा क्षेत्रात भगवी आणि पर्यावरण क्षेत्रात निळी अशी चतुरंगी क्रांती करण्यास आपण कटिबद्ध असल्याची ग्वाही दिली. अनेकांना ऊर्जेचा प्रतीक असलेल्या भगव्या रंगाची महतीच माहीत नाही. त्यामुळे ते भगव्या रंगाबाबत उलटसुलट चर्चा करत असतात. त्यांना ती करू द्या, असा टोलाही मोदींनी लगावला. आज भारताला गरज असलेली सर्व क्षमता आहे आणि आता फक्त संधी मिळण्याची वाट आहे. आपल्या भाषणात पंतप्रधान मोदी यांनी आधीच्या सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. ज्यांना घाण करायची होती ते करून निघून गेले. आम्ही स्वच्छता करून जाणार, असे सांगतानाच जागतिक विकासाला आवश्यक असलेली ऊर्जा प्रदान करण्याचे काम भारतातील मनुष्यबळ करणार आहे. त्यामुळे स्कॅम इंडिया अशी ओळख झालेल्या भारताला स्कील इंडियात बदण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, अशी ग्वाही मोदींनी यावेळी दिली.
आज देशाच्या एकूण लोकसंख्येपैकी ६५ टक्के लोकसंख्या तिशीच्या खालची आहे आणि हीच खरी भारताची ताकद आहे. ८० कोटी एवढ्या मोठ्या संख्येत असलेल्या युवकांचे ८० कोटी स्वप्ने आणि १६० मजबूत हात असल्यामुळे कोणतेही लक्ष्य प्राप्त करणे कठीण नाही. आम्हाला देशातील युवकांना रोजगार शोधणारा नव्हे तर रोजगार निर्माण करणारा बनवायचे आहे, असेही मोदी म्हणाले. जे लोक हॉटेलमध्ये एकावेळच्या जेवणारे दहा-वीस हजार रुपये देऊ शकतात त्यांनी घरगुती गॅसचे सरकारी अनुदान घेण्याची गरजच नाही आणि अनुदान सोडून देण्याचे आवाहन करताच सुमारे चार लाख भारतीयांनी स्वखुशीने अनुदान सोडले आणि आणखी लाखो लोक असे करतील, असा विश्‍वास मोदी यांनी व्यक्त केला. श्रीमंतांनी अनुदान घेणे सोडल्यामुळे वाचणारा पैसा मी सरकारी तिजोरीत किंवा माझ्या खिशात टाकणार नसून, अजूनही लाकडे जाळून चुलीवर स्वयंपाक करणार्‍या गरीब कुटुंबाला त्यातून गॅस सिलेंडर उपलब्ध करून देणार आहे. लाकडे कमी जळाल्यामुळे झाडांची कटाई कमी होईल आणि धूर होणार नसल्यामुळे पर्यावरणाचेही रक्षण होईल. या लहानसहान गोष्टी वाटत असल्या तरी यातून खूप काही साध्य करता येते, असेही मोदी म्हणाले. पंतप्रधानांनी आपल्या भाषणात शाळांमध्ये शौचालये निर्माण करणे आणि भारताच्या यशस्वी मंगळ मोहिमेचाही आवर्जून उल्लेख केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कॅनडा दौरा करणारे गेल्या ४२ वर्षातील पहिले भारतीय पंतप्रधान आहेत. मोदींचे कॅनडात आगमन होताच त्यांना मानवंदना देण्यास २१ तोफांची सलामी देण्यात आली. कॅनडा सरकार आणि त्या देशातील नागरिकांनी जे प्रेम आणि मानसन्मान दिला त्याबद्दल मी त्यांचा खूप आभारी आहे, असे सांगून पंतप्रधान मोदी यांनी आपल्या भाषणाची सांगता केली. भाषण संपविल्यानंतर व्यासपीठावरून उतरून बाहेर पडेपर्यंत सभागृहात मोदी… मोदी… असा जयघोष सुरू होता.

Short URL: https://vrittabharati.in/?p=22136

Posted by on Apr 16 2015. Filed under अमेरिका, आंतरराष्ट्रीय, छायादालन, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in अमेरिका, आंतरराष्ट्रीय, छायादालन, ठळक बातम्या (1787 of 2483 articles)


=ओबामांची स्तुतिसुमने, टाईममध्ये लिहिला विशेष लेख= नवी दिल्ली, [१६ एप्रिल] - भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ‘रिफॉर्मर इन चीफ’ आहेत, ...

×