Home » छायादालन, झारखंड, ठळक बातम्या, राज्य » रघुवर दास झारखंडच्या मुख्यमंत्रिपदी आरूढ

रघुवर दास झारखंडच्या मुख्यमंत्रिपदी आरूढ

=चार मंत्र्यांनीही घेतली शपथ=
raghuvar-das-take oth-as-chief-minister-of-jharkhandरांची, [२८ डिसेंबर] – भाजपाचे वरिष्ठ नेते रघुवर दास यांनी आज रविवारी झारखंडचे मुख्यमंत्री म्हणून पद व गोपनीयतेची शपथ घेतली. दास झारखंडचे पहिले गैरआदिवासी मुख्यमंत्री आहेत. दास यांच्यासोबतच आणखी चार मंत्र्यांनीदेखील शपथ घेतली.
बिरसा मुंडा फुटबॉल स्टेडियमवर सकाळी अकरा वाजता पार पडलेल्या दिमाखदार समारंभात राज्यपाल सईद अहमद यांनी दास आणि इतर मंत्र्यांना गोपनीयतेची शपथ दिली. निलकंठ सिंग मुंडा, चंद्रेश्‍वर प्रसाद सिंग, लुईस मरांडी (सर्व भाजपा) आणि चंद्रप्रकाश चौधरी (एजेएसयु) अशी अन्य चार मंत्र्यांची नावे आहेत. सुधारित कायद्यानुसार मुख्यमंत्र्यांसह केवळ १२ मंत्रीच झारखंड सरकारमध्ये सहभागी होऊ शकतात.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह तसेच अन्य केंद्रीय नेते या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार होते. पण, राजधानी दिल्लीतील तापमान आज रविवारी २.६ अंश सेल्सियसपर्यंत खाली आले होते. सोबतच, दाट धुक्याची चादरही पसरली होती. यामुळे अनेक विमानांचे उड्डाण रद्द करण्यात आले. याच कारणामुळे नरेंद्र मोदी आणि अमित शाह या सोहळ्याला उपस्थित राहू शकले नाहीत. तथापि, केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री एम. व्यंकय्या नायडू, केंद्रीय भूपृष्ठ परिवहन व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, ग्रामीण विकास राज्यमंत्री उपेंद्र कुशवाह, सामाजिक न्याय राज्यमंत्री सुदर्शन भगत, छत्तीसगडचे मुख्यमंत्री डॉ. रमण सिंह, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, झारखंडचे माजी मुख्यमंत्री अर्जुन मुंडा आणि हेमंत सोरेन, बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी, एजेएसयुचे अध्यक्ष सुदेश महतो यांच्यासह अनेक मान्यवर आणि मोठ्या संख्येत नागरिक या सोहळ्याला उपस्थित होते.
रघुवर दास हे झारखंडचे दहावे मुख्यमंत्री आहेत. यापूर्वी, बाबुलाल मरांडी (एकदा), अर्जुन मुंडा (तीनवेळा), शिबू सोरेन (तीन वेळा), मधू कोडा (एकदा) आणि हेमंत सोरेन (एकदा) यांनी झारखंडचे मुख्यमंत्रिपद भूषविले आहे. झारखंडमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपा व ऑल झारखंड स्टुडंट युनियन युतीने ४२ जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळविले. झारखंडमध्ये प्रथमच एखाद्या पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले आहे.
रघुवर दास यांचा अल्पपरिचय
पक्षाचा सामान्य कार्यकर्ता म्हणून भाजपात सहभागी झालेले रघुवर दास यांनी कठोर परिश्रमातून आपल्या राजकीय प्रवासाचा आलेख सातत्याने चढता ठेवला आहे. १९९५ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना भाजपाने जमशेदपूर विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी दिली. या निवडणुकीत ते विजयी झाले. त्यानंतर सातत्याने पाचवेळा त्यांनी या जागेवरून विजय मिळविला आहे. २००० मध्ये अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारने झारखंडला वेगळे राज्य म्हणून ओळख दिली आणि या राज्यात झालेल्या पहिल्याच विधानसभा निवडणुकीत भाजपा सत्तेवर आली. बाबुलाल मरांडी तेव्हा मुख्यमंत्री झाले. त्यांच्या सरकारमध्ये दास यांना मंत्रिपद मिळाले. त्यानंतर, अर्जुन मुंडा सरकारमध्येही ते मंत्री राहिले. २००९ मध्ये झामुमो-भाजपा युती सरकारमध्ये शिबू सोरेन मुख्यमंत्री होते आणि रघुवर दास उपमुख्यमंत्री होते.
‘‘रघुवर दास यांच्या शपथविधी सोहळ्यात उपस्थित राहाण्याची मनापासून इच्छा होती. पण, दाट धुक्यामुळे विमानसेवा विस्कळीत झाली आणि मला रांचीला जाणे शक्य झाले नाही. झारखंडच्या मुख्यमंत्रिपदी आरूढ झाल्याबद्दल मी दास यांचे अभिनंदन करतो आणि हार्दिक शुभेच्छा देतो. या राज्यातील नागरिकांनी स्थिर सरकारसाठी मतदान केले. त्यामुळे मी त्यांचेही अभिनंदन करतो.’’ – नरेंद्र मोदी, पंतप्रधान

Short URL: https://vrittabharati.in/?p=19349

Posted by on Dec 29 2014. Filed under छायादालन, झारखंड, ठळक बातम्या, राज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in छायादालन, झारखंड, ठळक बातम्या, राज्य (2306 of 2477 articles)


=रघुवर दास यांचे मत= रांची, [२८ डिसेंबर] - पंतप्रधान नरेंद्र मोदी हे माझे ‘हिरो’ आहेत आणि त्यांच्याच मार्गदर्शनानुसार झारखंडचा अतिशय ...

×