राजपथ झाले योगपथ

  • पंतप्रधान मोदींसह ३९ हजार योगसाधकांची योगासने
  • आंतरराष्ट्रीय योगदिनाच्या निमित्ताने झाले दोन विक्रम
  • गिनीज बुकात नोंद

नवी दिल्ली, [२१ जून] – भारताची राजधानी दिल्ली आज रविवारी जागतिक योगाचीही राजधानी झाली. राजधानीतील राजपथ आज खर्‍या अर्थाने योगपथ झाला होता. राजपथावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह ३९ हजार योगसाधकांनी योगाचा अभ्यास केला. यात ५ हजार शाळकरी विद्यार्थ्यांचाही समावेश होता. यानिमित्ताने आज दिल्लीत योगाचे दोन जागतिक विक्रमही झाले.
पंतप्रधान मोदी यांच्या पुढाकाराने आज भारतातच नव्हे, तर संपूर्ण जगात आंतरराष्ट्रीय योगदिनाचे आयोजन करण्यात आले होते. भारतातील मुख्य कार्यक्रम राजपथावर आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला योगगुरू रामदेव बाबा, स्वामी आत्मप्रियानंद, डॉ. एच. आर. नागेंद्र, स्वामिनी हंसा, आयुषचे राज्यमंत्री श्रीपाद नायक, आयुष मंत्रालयाचे सचिव संन्याल यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.
पंतप्रधान मोदी यांचा प्रस्ताव मान्य करून संयुक्त राष्ट्रसंघाने २१ जून हा आंतरराष्ट्रीय योगदिन घोषित केला होता. त्याचा शुभारंभ म्हणून राजपथावर ३९ हजार नागरिकांनी ३५ मिनिटांत २१ योगासने सादर करून दोन जागतिक विक्रमही केले. राजधानीतील आजच्या कार्यक्रमाचे अद्‌भुत, अपूर्व, अविस्मरणीय आणि ऐतिहासिक या शब्दातच वर्णन करावे लागेल.
राजधानी दिल्लीत आज २६ जानेवारीच्या प्रजासत्ताकदिनासारखे उत्साही वातावरण होते. फक्त राजपथावर संचलनाऐवजी योगाची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली, हाच काय तो फरक होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणातून योगाचे महत्त्व विशद केल्यानंतर योगासाठी आतुर झालेल्या हजारो साधकांनी योगाची २१ प्रात्यक्षिके सादर केली. ताडासनापासून योगासनाला सुरुवात करत वज्रासन, वक्रासन, मकर आसन, भुजंगासन, सेतुबंधासन, पवनमुक्तासन आणि शवासन सादर केल्यानंतर कपालभाती, तसेच प्राणायामातील अनुलोम आणि विलोम करण्यात आले. सर्वात शेवटी ध्यानही करण्यात आले.
आपले भाषण संपविल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी व्यासपीठावरून खाली उतरले आणि थेट उपस्थित योगसाधकांमध्ये सहभागी होत त्यांनी अतिशय सफाईने सर्व योगासने केली. व्यासपीठावरील मान्यवरांनीही व्यासपीठावरच योगासने केली. योगासनाच्या माध्यमातून आज मानव कल्याणाच्या नव्या युगाला प्रारंभ झाल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. राजपथ कधी योगपथ होईल, अशी कल्पनाही कुणी केली नव्हती, पण आज हे शक्य झाले आहे, असेही मोदी म्हणाले. योग हा फक्त शारीरिक कसरतींचा भाग नसून, तन, बुद्धी आणि आत्म्याच्या संतुलनाचे माध्यम आहे, असे स्पष्ट करत मोदी म्हणाले की, तसे नसते तर सर्कशीत शारीरिक कसरती सादर करणारे सर्वजण योगगुरू झाले असते.
शरीर लवचिक करणे म्हणजे योग नाही. योग हा मानवाच्या कल्याणाचा कार्यक्रम आहे, याकडे लक्ष वेधत पंतप्रधान म्हणाले की, आजपासून आंतरराष्ट्रीय योगदिनालाच प्रारंभ झाला नाही, तर शांती आणि सौहार्दाच्या नव्या जागतिक पर्वालाही प्रारंभ झाला आहे.
योग ही भारताची प्राचीन परंपरा आणि गौरवशाली संस्कृतीचा वारसा आहे. तणावमुक्त होऊन शांती मिळवण्याचे माध्यम आहे, असे स्पष्ट करीत मोदी म्हणाले की, आज आम्ही सर्व क्षेत्रात प्रगती केली आहे. विकासाची नवी झेप घेतली आहे. तंत्रज्ञान क्षेत्रातही अभूतपूर्व अशी क्रांती झाली आहे. मात्र, मानवाचा शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक विकास झाला नाही, तर नवे संकट निर्माण होईल. त्यामुळे मानवाचा आंतरिक विकास होण्याची गरज आहे. हा आंतरिक विकास योगाच्या माध्यमातूनच होऊ शकतो. आंतरराष्ट्रीय योगदिन साजरा करण्यास सहयोग करणार्‍या १९३ देशांचे मोदी यांनी आभार मानले. आजचा सूर्योदय हा जगात योगाभ्यास करणार्‍यांना आशीर्वाद देण्यासाठी आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. योगाचा देशात आणि जगात प्रचार-प्रसार करण्यासाठी आपले आयुष्य वेचणार्‍या आणि योगदान देणार्‍यांचा गौरवपूर्ण उल्लेख करत मोदी यांनी त्यांचे आभारही मानले. प्रारंभी आयुष राज्यमंत्री श्रीपाद नायक यांनी प्रास्ताविक केले.
राजपथावर योग करणारे पहिले पंतप्रधान
राजपथावर हजारो लोकांच्या उपस्थितीत योगासन करणारे नरेंद्र मोदी हे देशातील पहिले पंतप्रधान आहेत. नरेंद्र मोदी योगासन करण्यासाठी व्यासपीठावरून खाली उतरून उपस्थित योगसाधकांमध्ये सहभागी झाले.
तेव्हा प्रसिद्धीमाध्यमांचे कॅमेरे त्यांच्याकडे वळले. उपस्थितांनीही त्यांना पाहण्यासाठी गर्दी केली. अतिशय सहजपणे मोदी यांनी सर्व आसने केली. यावेळी त्यांच्या भोवती विशेष सुरक्षा दलाच्या जवानांनी दुहेरी कडे केले होते.
विद्यार्थ्यांची केली चौकशी
योगासने संपल्यानंतर सुरक्षा कर्मचार्‍यांना मागे टाकत पंतप्रधान नरेंद्र मोदी पाठीमागे असलेल्या शाळकरी विद्यार्थ्यांकडे गेले आणि त्यांच्याशी हितगुज केले. नरेंद्र मोदी यांना आपल्या दिशेने येताना पाहून विद्यार्थ्यांचा उत्साह वाढला आणि त्यांनी त्याच्याभोवती घोळका केला. अनेक विद्यार्थ्यांनी त्यांना खाली वाकून नमस्कारही केला. पंतप्रधानांना अतिशय जवळून पाहता आल्याने, तसेच त्यांच्याशी सहजपणे बोलता आल्यामुळे विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित झाला होता.
निसर्गाचाही आशीर्वाद
राजधानीत रविवारी सकाळी पाऊस पडेल, असे कोणतेही वातावरण नव्हते. योगदिनाचा कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी आकाश एकदम निरभ्र होते. प्रचंड गर्मीही होती. योगदिनाचा कार्यक्रम संपला आणि काही क्षणातच आकाशात ढगांनी गर्दी केली. वातावरण अंधारून आले. क्षणातच जोरदार पावसाला सुरुवात झाली. पाऊस थोडा आधी आला असता तर योगदिनाच्या संपूर्ण कार्यक्रमाचा विचका झाला असता. त्यामुळे निसर्गाने योगदिनाला आपला आशीर्वाद दिल्याची चर्चा होती.
दोन विक्रम
पहिल्याच आंतरराष्ट्रीय योगदिनी इतक्या मोठ्या संख्येत नागरिक सहभागी झाले आहेत, हे दृश्य खरोखरच अद्‌भूत असेच होते. यावेळी भारताने एकाचवेळी सर्वात जास्त संख्येत सहभागी होण्याचा आणि एकाच कार्यक्रमात अनेक देशांच्या प्रतिनिधींचा सर्वाधिक सहभाग असे दोन विश्‍व विक्रम केले. न्यूयॉर्क येथील संयुक्त राष्ट्र संघाच्या मुख्यालयात या दोन विक्रमांची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉडर्‌‌मध्ये नोंद झाल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली. परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यावेळी उपस्थित होत्या.

Short URL: https://vrittabharati.in/?p=23072

Posted by on Jun 22 2015. Filed under छायादालन, ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in छायादालन, ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (1612 of 2477 articles)


=पाकमध्ये मात्र दूतावासातच केला योग= नवी दिल्ली, [२१ जून] - पहिलाच आंतरराष्ट्रीय योगदिन आज जगाच्या पाठीवरील विविध देशांमध्ये मोठ्या उत्साहात ...

×