Home » छायादालन, ठळक बातम्या, राष्ट्रीय, सांस्कृतिक » राज्याचा चित्ररथ पथसंचलनात देशात सर्वोत्तम

राज्याचा चित्ररथ पथसंचलनात देशात सर्वोत्तम

chitrarathनवी दिल्ली, [२९ जानेवारी] – प्रजासत्ताक दिन संचलनात यावर्षी राजपथावर सादर करण्यात आलेल्या महाराष्ट्राच्या ‘पंढरीची वारी’ला सर्वोत्तम चित्ररथाचा बहुमान मिळाला आहे तर, नागपूरच्या दक्षिण-मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्रातर्फे विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या लेझिमला प्रोत्साहनपर पारितोषिक मिळाले आहे. महाराष्ट्राच्या चित्ररथाला प्रथम पुरस्कार मिळण्याचे हे सहावे वर्ष आहे. राजपथावर झालेल्या पथसंचलनाचा निकाल संरक्षण मंत्रालयाने आज गुरुवारी जाहीर केला. त्यात महाराष्ट्राच्या ‘पंढरीच्या वारी’ला प्रथम, तर झारखंड आणि कर्नाटकच्या चित्ररथाला अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय पुरस्कार मिळाला आहे. झारखंडच्या चित्ररथावर मलुटी गावाची प्रतिकृती सादर करण्यात आली होती, तर कर्नाटकने चन्नापट्टणम येथील खेळण्याच्या उद्योगावर आधारित चित्ररथ तयार केला होता. महाराष्ट्रातर्फे १९७१ मध्ये वारली दिंडीच्या संकल्पनेवर पहिला चित्ररथ प्रजासत्ताक दिन संचलनात सादर करण्यात आला होता. मात्र, महाराष्ट्राला पारितोषिकासाठी १९८० पर्यंत वाट बघावी लागली. १९८० मध्ये महाराष्ट्राने छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकावर आधारित चित्ररथ सादर केला. त्यालाही पहिले पारितोषिक मिळाले होते. १९८३ मध्ये बैलपोळ्यावरील चित्ररथालाही प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. १९९३ ते १९९५ या तीन वर्षात महाराष्ट्राच्या चित्ररथाला सलग तीन वर्षे पहिले पारितोषिक मिळाले. त्यावेळी महाराष्ट्राने लोकमान्य टिळकांचा सार्वजनिक गणेशोत्सव, हापूस आंबा आणि बापूस्मृतीचा चित्ररथ सादर केला होता. याशिवाय भारतीय स्वातंत्र्यसंग्रामातील महाराष्ट्राचे योगदान, १९८८ मध्ये लोकमान्य टिळकांवरील खटला आणि २००९ मध्ये धनगर, या चित्ररथाला द्वितीय पारितोषिक मिळाले होते. २००७ मध्ये जेजुरीचा खंडेराया या चित्ररथाला तृतीय पुरस्कार मिळाला. यावर्षी महाराष्ट्राने पंढरीची वारी हा चित्ररथ सादर केला. हा विषय धार्मिक असल्याचा प्रारंभी समज झाला. मात्र, पंढरीची वारी हा सर्वधर्मसमभावाचा विषय असल्याचे संरक्षण मंत्रालयाला पटवून द्यावे लागले. त्यानंतर या चित्ररथाला मंजुरी मिळाली. या यात्रेत नवस बोलल्या जात नाही, पशुहत्या केली जात नाही, सर्वधर्माचे, पंथाचे लाखो लोक यात सहभागी होत असतात, पंढरपूरच्या मंदिराच्या कळसाचे दर्शन घेऊनसुद्धा समाधानाने माणसे घरी परततात, अशी आगळीवेगळी पंढरीची वारी असते. या चित्ररथाचे संकल्पनाचित्र तसेच त्रिमिती प्रतिकृती प्रसिद्ध कलादिग्दर्शक चंद्रशेखर मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली कलाकारांनी तयार केली. चित्ररथाच्या प्रारंभी डोक्यावर तुळशीवृंदावन घेतलेली स्त्री दाखविण्यात आली होती. मध्यभागी पंढरपूरच्या विठ्ठल रखुमाई मंदिराची प्रतिकृती होती. अश्‍वाचे रिंगणही दाखविण्यात आले होते. चित्ररथाच्या शेवटच्या भागात संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्‍वर यांच्या प्रतिकृती होत्या. बाजूला पालखी, पताका, टाळ, मृदंग आणि विणेसह १३० वारकर्‍यांच्या प्रतिकृतीही रेखाटण्यात आल्या होत्या. मुंबईचे संतोष भांगरे यांच्या मार्गदर्शनाखाली ३१ कलाकारांच्या चमूने ‘विठ्ठल विठ्ठल विठ्ठल… तुला साद आली, तुझ्या लेकरांची अलंकापुरी आज भारवली, वसा वारीचा घेतला पावलांनी, आम्हा वाळवंटी तुझी सावली’ या अभंगावर पताका, टाळ, मृदंग आणि विणेसह ताल धरत हुबेहुब ‘पंढरीची वारी’ उभी करत लोकांची मने जिंकली. मुख्यमंत्र्यांनी केले कलावंतांचे अभिनंदन मुंबईः पंढरीची वारी चित्ररथाने सर्वोत्तम चित्ररथाचा बहुमान पटकाविल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व कलावंतांचे अभिनंदन केले आहे. या माध्यमातून देशवासीयांना महाराष्ट्राचे लोकदैवत आणि लोकसंस्कृतीचे प्रभावी दर्शन घडविल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी आनंद व्यक्त केला. चित्ररथाची संकल्पना साकारणारे कारागीर तसेच त्यासोबत सहभागी झालेल्या कलावंतांसह सांस्कृतिक विभागाच्या सर्व अधिकारी-कर्मचार्‍यांचेही मुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केले आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=20170

Posted by on Jan 30 2015. Filed under छायादालन, ठळक बातम्या, राष्ट्रीय, सांस्कृतिक. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in छायादालन, ठळक बातम्या, राष्ट्रीय, सांस्कृतिक (2155 of 2477 articles)


नवी दिल्ली, [२९ जानेवारी] - परराष्ट्र सचिव सुजाता सिंह यांनी तडकाफडकी राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या जागी भारताचे अमेरिकेतील राजदूत एस. जयशंकर ...

×