राममंदिराची संकल्पपूर्ती हीच अशोकजींना श्रद्धांजली
Monday, November 23rd, 2015=डॉ. मोहनजी भागवत यांचे आवाहन=
नवी दिल्ली, [२२ नोव्हेंबर] – अयोध्येत भगवान श्रीरामाचे भव्य मंदिर उभारण्याचा संकल्प अशोक सिंघल यांनी केला होता. त्यांचा हा संकल्प पूर्ण करण्यासाठी तो संकल्प आपला म्हणून स्वीकारावा लागेल व त्याची संकल्पपूर्ती करावी लागेल, असे आवाहन रा. स्व. संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी रविवारी येथे केले.
विश्व हिंदू परिषदेचे संरक्षक आणि हिंदुत्वाचे महामानव अशोक सिंघल यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी येथील के. डी. जाधव रेसलिंग स्टेडियममध्ये श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सरसंघचालक बोलत होते.
अशोक सिंघल मेदांता रुग्णालयात भरती असताना त्यांच्याशी झालेल्या आपल्या शेवटच्या भेटीचा उल्लेख करत डॉ. भागवत म्हणाले की, अशोक सिंघल यांनी आपल्या जीवनात दोन संकल्प केले होते. यातील पहिला अयोध्येत भगवान रामाचे भव्य मंदिर उभारण्याचा होता, तर दुसरा संकल्प संपूर्ण जगात वेदांचा प्रचार आणि प्रसार करण्याचा होता. अशोक सिंघल यांचे हे दोन्ही संकल्प पूर्ण करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. त्यासाठी आपल्याला त्यांचे संकल्प आपले म्हणून स्वीकारावे लागतील आणि त्या दिशेने काम करावे लागेल. हे दोन्ही संकल्प म्हणजे ईश्वरीय कार्य आहे. त्यामुळे ते पूर्ण होणारच, फक्त त्यासाठी आम्हाला निमित्तमात्र व्हावे लागेल.
अशोक सिंघल २१ व्या शतकातील विवेकानंद होते, असे विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष राघव रेड्डी यांनी आपल्या भाषणात सांगितले. ते आपले गुरू व मार्गदर्शकही होते, असेही ते म्हणाले.
अशोक सिंघल हे संत-सेनापती आणि भारताच्या राजकीय जीवनात धर्माची पुनर्स्थापना करणारे महामानव होते, असे विहिंपचे कार्याध्यक्ष डॉ. प्रवीण तोगडिया यावेळी म्हणाले. २३ टक्के लोकसंख्येद्वारा ७७ टक्के लोकसंख्येवर व्हिटो पॉवरचा वापर करण्यांवर सिंघल यांनी अंकुश लावला. एवढेच नव्हे तर स्पृश्य-अस्पृश्यतेच्या निर्मूलनासाठी, गोवध बंदीसाठी, तसेच अविरल व निर्मल गंगेच्या प्रवाहासाठी त्यांनी आपले आयुष्य वेचले, याकडेही डॉ. तोगडिया यांनी लक्ष वेधले.
सिंघल यांनी एक लाखापेक्षाही जास्त ब्राह्मणेतरांना पूजा-अर्चा करणारे पुरोहित बनवून हिंदुत्वाच्या विजयाचा संकल्प केला, असेही ते म्हणाले. संसदेने ज्याप्रमाणे सोमनाथ मंदिर उभारणीसाठी पुढाकार घेतला, तसाच पुढाकार घेत राममंदिर उभारणीसाठी कायदा बनवला तर, अयोध्येत भव्य राममंदिर उभारण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो, असेही तोगडिया यांनी स्पष्ट केले.
अशोक सिंघल सर्वधर्मसमभावाचे प्रखर समर्थक होते आणि तेजस्वी प्रकाशपुंज होते. त्यांच्या जीवनापासून प्रकाश घेत आम्ही छोटेछोटे दिवे बनत त्यांनी दाखवलेल्या मार्गावरून चालणे, हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे भाजपाचे ज्येष्ठ नेते डॉ. मुरली मनोहर जोशी म्हणाले.
अशोक सिंघल साहसी, पराक्रमी, अचल आणि विनम्र होते. एकदा घेतलेल्या संकल्पासाठी आपले संपूर्ण आयुष्य त्यांनी वेचले. त्यांच्या निधनाने एका युगाचा अंत झाला आहे, अशा शब्दात भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी आपली श्रद्धांजली अर्पण केली.
देवभूमी आणि वेदभूमीच्या स्वरूपात अशोक सिंघल यांनी संपूर्ण जगाला भारताचा परिचय करून दिला, या शब्दात नेदरलॅण्डवरून आलेले राजा लुईस यांनी आपली श्रद्धांजली वाहिली.
यावेळी साध्वी ऋतंभरा, सतपाल महाराज, स्वामी चिदानंद, वरिष्ठ पत्रकार राम बहादूर राय, खा. तरुण विजय, वीरेश्वर द्विवेदी, नवीन कपूर, विहिंपचे नेते विष्णुहरी दालमिया, सलील सिंघल, महेश भागचंद्रका, भामसंचे रामदास पांडे यांनीही अशोक सिंघल यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी रा. स्व. संघाचे सहसरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे, कृष्णगोपाल, विहिंपचे दिनेशचंद्र, चंपतराय, विनायकराव देशमुख, विज्ञानानंद, भाजपाचे राष्ट्रीय संघटन मंत्री रामलाल, श्याम जाजू, भूपेंद्र यादव, अनिल जैन, दीनानाथ बत्रा, केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद, जे. पी. नड्डा, डॉ. हर्षवर्धन, साध्वी निरंजन ज्योती यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, तिबेटचे धर्मगुरू डॉ. दलाई लामा, आसाराम बापू, सुधांशू महाराज, मुलायमसिंह यादव, शीला दीक्षित, तसेच नेपाळ व भूतान सरकार यांच्याकडून आलेले शोकसंदेश वाचून दाखवण्यात आलेत. शोकसभेला मोठ्या संख्येत नागरिकांचीही उपस्थिती होती.
Short URL: https://vrittabharati.in/?p=25670

Photo Gallery
-
दीर्घकाळ कार्यरत राहिल्याने वाढते आयुष्य
-
इंटरनेटवरील प्रभावी व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी
-
महिला शक्तीला गुगलचा डूडलद्वारे सलाम
-
स्त्रियांच्या भरारीला आकाश देखील ठेंगणे
-
भारतात लवकरच येणार ‘अच्छे दिन’
-
३ वर्षीय डॉलीचा तिरंदाजीत राष्ट्रीय विक्रम
-
ऑस्कर पुरस्कारांमध्ये ‘बर्डमॅन’ची बाजी
-
नोकरी मिळविण्यात आवाजाची भूमिका महत्त्वाची
-
मजबूत राष्ट्राकरिता एकत्र या!
-
खोबरेल तेलावर चालविला मिनी ट्रक
-
लाल द्राक्षे, शेंगदाण्यांमुळे स्मृतिभ्रंश टळतो
-
अमेरिकेत फोफावतेय् भारतीय खाद्य संस्कृती
-
गूगल विकसित करतेय कर्करोग, हृदयविकार डिटेक्टर
-
यंदा ९३ टक्केच पाऊस!