Home » छायादालन, ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद » रेल्वे अर्थसंकल्प सादर, कोणतीही भाडेवाढ नाही

रेल्वे अर्थसंकल्प सादर, कोणतीही भाडेवाढ नाही

  • पायाभूत सुविधांवर प्रभूंचा भर
  • प्रवासी, मालभाड्यात वाढ नाही
  • तीन नव्या गाड्यांची घोषणा

Suresh-Prabhu-rail-budget-2016नवी दिल्ली, [२५ फेब्रुवारी] – रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी आज गुरुवारी लोकसभेत सादर केलेल्या अर्थसंकल्पात प्रवासी किंवा मालभाड्यात कोणतीही वाढ न करता सर्वसामान्यांना दिलासा दिला असून, येत्या आर्थिक वर्षात पायाभूत सोयीसुविधा वाढविण्यावर भर देणार असल्याचे स्पष्ट केले. प्रभू यांनी तीन नव्या सुपरफास्ट गाड्या सुरू करण्याची घोषणा करतानाच २०१९ पर्यंत उत्तर-दक्षिण, पूर्व-पश्‍चिम आणि पूर्व किनारपट्टी असे फ्रेट कॉरिडोर्स विकसित करण्याचा निर्धार व्यक्त केला.
रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी आपला दुसरा अर्थसंकल्प गुरुवारी लोकसभेत सादर केला. परिवहनाच्या इतर पर्यायांच्या दरांचा अभ्यास करून, स्पर्धात्मक दर ठेवण्यावर भर देण्यासह अतिरिक्त महसूल मिळविण्यासाठी फ्रेट बास्केट तयार करणार असल्याचे त्यांनी सांगितले. गेल्यावर्षी भाषणात शेरोशायरी करणार्‍या प्रभू यांनी यावेळी मात्र तसे न करता रेल्वेने गेल्या वर्षात काय साध्य केले आणि पुढील आर्थिक वर्षासह येणार्‍या काळात भारतीय रेल्वेची दिशा काय असेल, याचा ऊहापोह केला. गेल्यावर्षी प्रभू यांनी प्रवासी आणि मालभाड्यात वाढ केली होती. परंतु, यावर्षी भाडेवाढ न करता प्रवाशांना चांगल्या सोयीसुविधा देण्यावर प्रभूंनी भर दिला.
सुरेश प्रभू यांनी रेल्वे अर्थसंकल्प मांडल्यानंतर सत्ताधारी बाकांवरील सदस्यांनी बाके वाजवून त्यांचे अभिनंदन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी व मंत्रिमंडळातील इतर वरिष्ठ सहकार्‍यांनी सुरेश प्रभू यांचे अभिनंदन केले.
सुरेश प्रभू यांनी तीन नव्या सुपरफास्ट गाड्या सुरू करण्याची घोषणा केली. त्यामध्ये ‘हमसफर’ या थर्ड एसी व जेवणाचा पर्याय असलेल्या संपूर्ण वातानुकूलित गाडीचा समावेश आहे. ‘तेजस’ ही नवी गाडी भारतीय रेल्वेचा भविष्यातील प्रवास कसा असेल, याची निदर्शक असेल आणि ही गाडी मनोरंजन, वायफाय आणि इतर सुविधांसह १३० किमी प्रतितास वेगाने प्रवास करेल. याशिवाय व्यस्त मार्गांवर रात्रभरात प्रवास करणारी ‘उदय’ नावाची वातानुकूलित डबल डेकर गाडी सुरू करण्यात येणार आहे.
अनारक्षित प्रवाशांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी दीन दयालू या नावाचे डबे असलेली अंत्योदय एक्सप्रेस सेवा सुरू करण्यात येणार आहे. यामध्ये पिण्याचे पाणी आणि मोबाईल चार्जिंगची व्यवस्था असेल.
लोअर बर्थच्या संख्येत ५० टक्क्यांनी वाढ करण्याची घोषणा करून प्रभू यांनी ज्येष्ठ नागरिकांना दिलासा दिला. पुढील वर्षात रेल्वे गाड्यांमध्ये ३० हजार बायो टॉयलेट्‌स बसविण्यात येणार आहेत. रेल्वेच्या पायाभूत सुविधांच्या विकासासाठी पाच वर्षात ८.५ लाख खर्च करण्यात येणार असून, २०१६-१७ या आर्थिक वर्षात १.२१ लाख कोटींची गुंतवणूक केली जाणार आहे.
प्रभू यांनी आपले व्हिजन सादर करताना २०२० पर्यंत सामान्य रेल्वे प्रवाशांचे स्वप्न पूर्ण करण्याचा निर्धार व्यक्त केला. यासाठीच्या विविध उपाययोजनांमध्ये मागणीनुसार आरक्षण, मालगाड्यांचे निर्धारित वेळापत्रक, सुरक्षेत वाढ करण्यासाठी उच्च तंत्रज्ञानाचा वापर, मानवरहित रेल्वे फाटकांचे पूर्णपणे उच्चाटन, वेळापत्रकाप्रमाणे वाहतूक आणि प्रवासादरम्यान मलमूत्राचे विसर्जन पूर्णपणे बंद करण्याचा समावेश आहे. प्रवाशांना अधिकाधिक सुविधा देण्यासाठी सोशल मीडिया आणि आयव्हीआरएस यंत्रणेच्या माध्यमातून त्यांच्याशी संवाद साधून आलेल्या सूचनांप्रमाणे त्यामध्ये सुधारणा करण्यात येणार आहे. प्रवास सुखकर होण्यासाठी ६५ हजार अतिरिक्त बर्थ उपलब्ध करून देण्यासह २५०० वॉटर व्हेंडिंग मशिन्स लावण्यात येणार आहेत.
१०० रेल्वे स्थानकांवर वायफाय सेवा देण्यात आली असून, येणार्‍या वर्षात आणखी ४०० स्थानकांवर ही सेवा देण्यात येणार आहे. सुरक्षेचा भाग म्हणून सुरक्षारक्षक असलेली ३५० आणि मानवरहित एक हजार फाटकं बंद करण्यात आली आहेत. ८२० ओव्हर आणि अंडरब्रिज पूर्ण करण्यात आले आणि आणखी १३५० चे काम सुरू आहे. अजमेर, अमृतसर, बिहार शरीफ, छेंगान्नूर, द्वारका, गया, हरिद्वार, मथुरा, नागापट्टीणम्, नांदेड, नासिक, पाली, पारसनाथ, तिरुपती, व्हैलानकन्नी, वाराणसी आणि वास्को या धार्मिक स्थळांच्या स्थानकांचे प्राधान्याने सौंदर्यीकरण करण्यात येणार आहे.
ठळक वैशिष्ट्ये
– प्रवासी, मालभाड्यात वाढ नाही
– पाच वर्षात आधुनिकीकरणावर ८.५ लाख कोटींचा खर्च
– २०१६-१७ या वर्षात १.२१ लाख कोटींची गुंतवणूक
– हमसफर, तेजस, उदय या तीन नव्या गाड्या
– आस्था सर्किटने धार्मिक स्थळांना जोडणार
– अंत्योदय एक्सप्रेस ही सुपरफास्ट अनारक्षित गाडी सुरू होणार
– दीन दयालू अनारक्षित डब्यांमध्ये पाणी, मोबाईल चार्जिंगची व्यवस्था
– ज्येष्ठ नागरिकांसाठी ५० टक्के अधिक लोअर बर्थ
– २०२० पर्यंत मागणीनुसार आरक्षण
-४०० स्थानकांवर वायफाय सुविधा, चालू वर्षात १०० स्थानकांचा समावेश
– ई-तिकिटिंगची क्षमता दोन हजार वरून सात हजार प्रति मिनिट करणार
– सर्व प्रमुख स्थानकांवर सीसीटीव्ही कॅमेर्‍यांची देखभाल
– पुढील वर्षात ३० हजार बायो टॉयलेट्‌सची व्यवस्था
– मागणीनुसार डबा स्वच्छ करण्याची सोय
– पायलट बेसिसवर बारकोडेड तिकिट्‌स, स्कॅनर्स
– विदेशी डेबिट/क्रेडिट कार्डवरही ई-तिकीट विक्री
– अजमेर, पुरी, वाराणसी, नागापट्टीणम् आदी धार्मिक स्थानकांचे सौंदर्यीकरण
– प्रवासादरम्यान मनोरंजनासाठी एफएम रेडिओची व्यवस्था
– ज्येष्ठ आणि दिव्यांगांसाठी रेल्वेमित्र सेवा
– प्रवाशांना प्रवासी विम्याचा पर्याय देणार
– स्वयंचलित दारांसह स्मार्ट कोचेस व इतर सुविधा
– तिकीट विक्री किंवा इतर समस्या सोडविण्यासाठी ऍप
– रेल्वेगाड्यांमध्ये जीपीएसच्या आधारे माहिती देणारी डिजिटल यंत्रणा
– अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेन योजनेसाठी जपानचे सहकार्य
– प्रवासी भाड्यावर ३० हजार कोटींचा खर्च
सर्वांचे समाधान करणारा अर्थसंकल्प : पंतप्रधान
रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी सादर केलेला अर्थसंकल्प समाजातील सर्वच घटकांचे समाधान करणारा असून, अधिक वेग व सुरक्षेसह प्रवासी वाहतूक करण्याचा निर्धार रेल्वेने केला आहे, या शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रेल्वे अर्थसंकल्पाचे कौतुक केले.
प्रवाशांना केंद्रस्थानी ठेवून हा अर्थसंकल्प तयार करण्यात आला असून, प्रवासी भाडेवाढ न करताही राष्ट्रीय परिवहन सेवेला नवे रूप देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. हा अर्थसंकल्प पायाभूत सुविधांवर केंद्रित असून, यामुळे रोजगार निर्मितीला मोठी मदत होणार आहे. विकासाची दृष्टी असलेल्या या अर्थसंकल्पामुळे रेल्वेचा चेहरामोहरा बदलण्याच्या प्रयत्नांना अधिक गती मिळणार आहे, असे पंतप्रधानांनी आपल्या प्रतिक्रियेत म्हटले आहे. मणिपूर आणि मिझोरम या ईशान्य भारतातील राज्यांमध्ये रेल्वेचे जाळे वाढविण्याची घोषणा करण्यात आली. याला आमच्या सरकारचे प्राधान्य आहे, असेही ते म्हणाले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=26890

Posted by on Feb 25 2016. Filed under छायादालन, ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in छायादालन, ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद (812 of 2477 articles)


=अमित शाह यांचा विश्‍वास= लखनौ, [२५ फेब्रुवारी] - पुढील वर्षी होणार्‍या विधानसभा निवडणुकीनंतर उत्तरप्रदेशात भाजपाचेच सरकार सत्तेत येईल, असा विश्‍वास ...

×