Home » क्रीडा, छायादालन, ठळक बातम्या » रोहितचे विश्‍वविक्रमी द्विशतक

रोहितचे विश्‍वविक्रमी द्विशतक

rohit-sharma-doubleton-640कोलकाता, [१३ नोव्हेंबर] – सराव सामन्यात झकास फलंदाजी करूनही निवड समितीच्या डोळ्यात न भरलेला शैलीदार फलंदाज रोहित शर्मा याला कोलकाता येथील ऐतिहासिक ईडन गार्डन्सवर श्रीलंकेविरुद्ध खेळण्याची संधी निवड समितीने देताच त्याने तळपत्या बॅटमधून २६४ धावांचा वर्षाव करून विश्‍वविक्रमी द्विशतक साजरे केले. इतकेच नव्हे, तर तो एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वाधिक वैयक्तिक धावा काढणारा विश्‍व विक्रमवीर ठरला. शिवाय वन-डे क्रिकेटमध्ये दोनवेळा द्विशतक साजरा करणारा तो पहिला फलंदाज ठरला आहे.
याअगोदर एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक नाबाद २२९ धावांच्या विश्‍वविक्रमाचा मान ऑस्ट्रेलियाची महिला खेळाडू बेलिंडा जेन क्लार्क हिच्या नावावर होता, हे येथे उल्लेखनीय. एकदिवसीय सामन्यात रोहित शर्माने याआधी आपले पहिले द्विशतक (२०९ धावा) ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळताना काढले होते.
कोलकाता येथील ईडन गार्डन मैदान रोहितसाठी खरोखरच लकी ठरले, असे म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही. रणजी क्रिकेटमध्ये पदार्पणाचा सामना रोहितने याच मैदानावर खेळला होता. त्यानंतर पहिली कसोटी खेळण्याची संधीही याच मैदानावर त्याला मिळाली व त्या कसोटीत त्याने १७६ धावा काढल्या होत्या. याआधी भारताकडून चिन तेंडुलकर आणि वीरेंद्र सेहवाग यांनी एकदिवसीय क्रिकेटमध्ये द्विशतक नोंदविले आहे. सचिनने झळकविलेल्या द्विशतकात २५ चौकार होते, तर रोहितच्या आजच्या विश्‍वविक्रमी द्विशतकातही २५ चौकारच नोंदले गेले.
रोहितने अर्धशतक काढताना ७२ चेंडूंचा सामना केला. त्यानंतर ५१ ते २५० धावांचा पल्ला गाठण्यासाठी त्याला केवळ ९४ चेंडूंचा सामना करावा लागला. श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या तीन एकदिवसीय सामन्यांसाठी रोहितची भारतीय संघात निवड झाली नव्हती. मालिकेतील उर्वरित दोन सामन्यांसाठी शिखर धवनला विश्रांती देण्यात आली व रोहितला संधी मिळाली. त्या संधीचे रोहितने सोने केले.
ट्विटरवर अभिनंदनाचा वर्षाव
गुरुवारी एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक वैयक्तिक धावांचा विक्रम करताना दुसरे द्विशतक ठोकणार्‍या रोहित शर्मावर ट्विटर आणि इतर सोशल मीडियाच्या माध्यमातून अभिनंदनाचा वर्षाव करण्यात आला. भारतीय क्रिकेट संघाचा नियमित कर्णधार महेंद्रसिंह धोनी याच्यासह अनेक आजी-माजी खेळाडू, आजी-माजी पदाधिकारी, आजी-माजी निवड समितीचे सदस्य, बॉलीवूड आणि राजकीय क्षेत्रातील दिग्गजांसह अनेकांनी रोहितचे अभिनंदन केले आणि पुढील कामगिरीसाठी शुभेच्छा दिल्या.
वन-डेमध्ये चारच द्विशतके
आजपर्यंत एकदिवसीय क्रिकेट सामन्यांमध्ये केवळ चारच द्विशतकांची नोंद झाली आहे. त्यातील विक्रमी दोन द्विशतके आता रोहित शर्माच्या नावावर आहेत. वीरेंद्र सेहवाग (२१९, वेस्ट इंडीजविरुद्ध, इंदूर येथे) व सचिन तेंडुलकर (२००, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध, ग्वाल्हेर येथे) या इतर भारतीय फलंदाजांनी प्रत्येकी एक द्विशतक काढले आहे. या चारही द्विशतकांची नोंद भारतीय मैदानांवरच झाली आहेत, हे आणखी एक वैशिष्ट्य. आशिया खंडातील देशाशी खेळताना नोंदले गेलेले वन डे क्रिकेटमधील हे पहिलेच द्विशतक आहे. दोन वर्षांच्या कालावधीतच रोहितने दोनवेळा द्विशतकाचा पल्ला गाठला आहे.
असाही योगायोग
रोहित शर्मा आणि विराट कोहली ही जोडी पुन्हा एकदा दीर्घकाळ स्मरणात राहणार आहे. रोहितने जेव्हा पहिले द्विशतक काढले त्यावेळी विराट कोहलीच त्याला साथ देत होता. साथ देता देता विराट धावबाद झाला. याच दुर्दैवी घटनेची पुनरावृत्ती रोहितच्या ईडन गार्डनवरील गुरुवारच्या द्विशतकाच्या खेळीदरम्यान पुन्हा घडली.
संघाच्या धावसंख्येकडे लक्ष ठेवूनच प्रत्येक खेळाडू डावाला आकार देत असतो. किती धावा झाल्या, किती षटके टाकून झाली व किती राहिली याचा विचार फलंदाजी करताना करावाच लागतो. मात्र, तरीही एक मोठी खेळी करण्याचा निर्धार मी केला होता. खेळपट्टी फलंदाजीसाठी पोषक असल्यामुळे अर्धशतक पूर्ण केल्यानंतर मोठी खेळी करण्याचा विचार मनात आला. शक्य तेवढ्या वेळ खेळपट्टीवर पाय रोवण्याचा माझा प्रयत्न होतात आणि मी आणखी ५० षटके खेळू शकलो असतो
रोहित शर्मा विक्रमी २६४ धावा
रोहितने आज एकदिवसीय क्रिकेटमधील वैयक्तिक सर्वाधिक धावांचाही विक्रम केला. वन-डे क्रिकेटमध्ये एकट्या फलंदाजाने २६४ धावा काढण्याची किमया त्याने केली. रोहितने या धावा १७३ चेंडूंचा सामना करताना ३३ चौकार आणि ९ उत्तुंग षटकारांसह काढल्या.

Short URL: https://vrittabharati.in/?p=18207

Posted by on Nov 14 2014. Filed under क्रीडा, छायादालन, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in क्रीडा, छायादालन, ठळक बातम्या (2353 of 2479 articles)


डार्मस्टॅण्डट, [१३ नोव्हेंबर] - चंद्र, मंगळापर्यंत यशस्वी झेप घेणार्‍या मानवाने आता थेट आपले पाऊल फिरत्या धूमकेतूवर ठेवले आहे. युरोपियन अवकाश ...

×